' चित्रकला ही स्वतंत्र भाषा : चंद्रमोहन कुलकर्णी

प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ चित्र प्रदर्शनात प्रकट मुलाखत

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या - कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने  ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने   आयोजित केलेल्या   'प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनात शुक्रवारी सायंकाळी  ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.आदिती जोगळेकर - हर्डीकर , अस्मिता अत्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीतून चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चित्रकला, अभिव्यक्ती, कलेची माध्यमं, चित्रकला प्रशिक्षण अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकला.ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, चारुहास पंडीत , चित्रकार  विलास कुलकर्णी उपस्थित होते.चारुहास पंडीत यांच्या हस्ते चंद्रमोहन कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.  

चंद्रमोहन कुलकर्णी  म्हणाले, ' माझ्या आयुष्यात वाचनामुळे अनेक दरवाजे उघडे झाले . अनेक कलाप्रकार हाताळताना त्याचा उपयोग झाला. अनेक प्रतिभावंतांशी जोडला गेलो. लेखन, चित्रकला हे अभिव्यक्तीचे प्रकार हाताळले. गाणं कळावं म्हणून मी त्यातील गोष्टी शिकलो. पुस्तकांची कव्हर्स करताना त्याचा उपयोग झाला. नृत्याची प्रॅक्टीस पाहत गेलो. तरूणांना सोशल मीडियावर फॉलो करतो, याचाही मला फायदा झाला.

छोट्या, मोठ्या लोकांशी कनेक्ट होण्यासाठी लोकसंग्रह वाढत नेला. त्याचे प्रतिबिंब चित्रात उमटत गेली.

पोट्रेट करताना ते व्यक्तीचित्र करण्यापेक्षा व्यक्तिमत्व चित्र झाले पाहिजे, असं मला वाटतं.कवितेचे शब्द हरवतात, तसे चित्राच्या संकल्पनाही हरवतात, चित्रकार हैराण होतो, असाही अनुभव मला येतो. चित्रं पाहता पाहता आपली समज वाढत जाते. चित्रकला ही स्वतंत्र भाषा आहे, ती शिकता येते. शास्त्रीय संगीत ऐकत ऐकत कळू लागतं. तसं चित्र पाहून पाहून कळायला लागतं. चित्रानं चित्रकाराला काही दिलं पाहिजं, तसं चित्रकारालाही चित्राला स्वतःजवळचं देता येतं. ते देत राहिलं पाहिजे, असे कुलकर्णि यांनी सांगितलं.

नवी माध्यमं आणि प्रशिक्षणाबद्दल बोलताना चंद्रमोहन कुलकर्णी  म्हणाले, 'मिक्स मीडिया शब्द चांगला वाटला तरी कॉफी पेंटींग सारख्या गोष्टी मला कळत नाहीत. चित्रकला प्रशिक्षणात पुस्तकांचं वाचन होत नसेल तर शिकता कसे येईल. उदाहरण द्यायचं तर व्यंगचित्रकला ही कला महाविद्यालयात शिकता येईल का? रंगांचे आणि विविध माध्यमांचे मिश्रण करताना आपण पाश्चिमात्य लोकांनी लिहिलेली प्रमाण फॉलो करतो. पण स्वतः प्रयोग करून त्याचा चित्रावर काय परिणाम होतो, हे पाहिलं पाहिजे. कविता वाचल्या नाहीत, तर कवितांच्या पुस्तकांना रेखाटने करता येणार नाहीत.

अॅड एजन्सीमध्ये आता चित्रकारांची गरज राहिली नाही. असे अनेक बदल झाले आहेत. चित्रकला महाविद्यालयांनी या बदलाची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक चित्रकाराचं व्याकरण वेगळं असतं, चित्रकलेचं स्वतःचं व्याकरण वेगळं असतं. चित्रकला स्पर्धा ही न कळणारी गोष्ट आहे.हे सर्व ध्यानी घेतलं पाहिजे.

स्टिल लाईफ ' ( स्थिर चित्र ) प्रात्यक्षिकाला प्रतिसाद..

९ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरभी गुळवेलकर-साठे यांचे ' स्टिल लाईफ ( स्थिरचित्र ) विषयावरील प्रात्यक्षिकाला चांगला प्रतिसाद मिळाला. मिलिंद संत यांनी गुळवेलकर यांचे स्वागत केले. अस्मिता अत्रे यांनी प्रास्ताविक केले.

गुळवेलकर म्हणाल्या, ' स्टिल लाईफ( स्थिर चित्र) प्रकारात ठेवलेल्या स्टीलचे भांडे, सिरॅमिक भांडे, फळ, कापड या प्रत्येकातून प्रकाशाचे होणारे परावर्तन टिपणे हे कलाकाराचे कौशल्य असते.स्थिरचित्रात त्रिमिती रचनेचे रेखाटन महत्वाचे असते, नंतर छाया -प्रकाशाचे काम आधी करणे आणि नंतर डिटेलिंग करणे महत्वाचे ठरते.

'प्रतिमा उत्कट- रंगकथा २३'  हे चित्र प्रदर्शन दि.८ ते ११ जून २०२३ या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली  आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे १० ते ८५ अशा विविध वयोगटातील आहेत. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.

याशिवाय प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची  प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत.  १० जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक आणि मंजिरी मोरे यांच्याबरोबर संवाद, ११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशी विविध सत्रे होणार आहेत. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post