प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या मद्याची तस्करी सुरु असताना राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकानं हिरलगे फाट्यावर छापा टाक ला. या छाप्यात एक वाहन आणि 8 लाखांच गोवा बनावटीचं मद्य असं सुमारे 12 लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलंय. या कारवाईत एका मद्यतस्कराला अटक करण्यात आली.
- गोवा बनावटीच्या मद्याला असलेली मागणी लक्षात घेऊन, अनेक मद्य तस्करांनी गोव्यातून थेट महाराष्ट्रात मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु केलीय. अशा तस्करांवर राज्य उत्पादन शुल्क आणि कोल्हापूर पोलीस दलाकडून कारवाई केली जाते. मात्र तरीही विविध चोरट्या मार्गावर लाखो रुपयांच्या मद्याची तस्करी सुरुच आहे. आज गोवा राज्यातून आजरा मार्गे मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, जवान राजेंद्र कोळी, विशाल भोई, सचिन लोंढे या पथकासह गडहिंग्लज-आजरा रोडवरील हिरलगे फाटा इथं सापळा लावला. या दरम्यान एक चारचाकी वाहन अडवून, त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मद्याचे 8 लाख रुपये किमतीचे 119 बॉक्स आढळले. या प्रकरणी सावंतवाडी इथला मद्यतस्कर अनंत मिस्त्री याला पथकानं अटक केली. अधिक चौकशीत त्यानं भुदरगड इथल्या रमेश तिकोडे याच्यासाठी मद्याची वाहतूक करत असल्याचं सांगितलं. हे वाहन आणि मद्य असं 12 लाखाचं साहित्य जप्त करण्यात आलं. याप्रकरणी रमेश तिकोडे याचा शोध सुरु आहे.