महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने "अवयवदान व देहदान" याबाबत जनजागृती

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है ! असे भावनीक आवाहन यशोदर्शन फाउंडेशनचे प्रमुख व शिखरावरी मासिकाचे संपादक योगेश अग्रवाल यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सातत्याने नाविण्यपूर्ण व प्रबोधनात्मक विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून अवयवदान, त्वचादान, देहदान, नेत्रदान, रक्तदान हे दान करणे सद्यस्थितीत किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व जाणून सदर व्याख्यानाचे एल्कॉम इंटरनॅशनल प्रा. लि. 5 स्टार MIDC कागल, कोल्हापूर येथे आयोजन करणेत आले होते. 

यावेळी प्रमुख व्याख्याते योगेश अग्रवाल यांनी अवयवदान आणि देहदान असे या विषयाचे दोन भाग असून अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते. तर देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदय क्रिया बंद पडून झालेल्या मृत्यूनंतर करता येते. अशावेळी देहदान करण्यासाठी मृत देह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान, त्वचादान होऊ शकते. जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते. म्हणजे दोन पैकी एक किडनी, यकृताचा कांही भाग, फुफ्फुसाचा काही भाग, स्वादुपिंडाचा कांही भाग, आतड्याचा कांही भाग, गर्भाशय आदी. 

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनीवर व्यवस्थितपणे व्यतीत होऊ शकते. एका शरीरातून दुसर्‍या शरीरात एखादा अवयव प्रत्यारोपित केला जातो, त्यावेळी तो अवयव दोन्ही शरीरात ठरावीक कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्णपणे कार्यरत होत असतो. त्यामुळे शरीराला कोणताही धोका संभवत नाही. जिवंतपणे वरील अवयवदान करून, गरजू रुग्णांच्या आयुष्यात आनंद फुलविता येतो आणि त्याला कोणताही शारीरिक धोका उद्‌भवत नाही. मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेन डेड झाल्यानंतर त्या व्यक्तीला वेंटीलेटरवर ठेवले जाते. त्यावेळी विशिष्ट परीक्षणाद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करण्याचे थांबलेला आहे, हे निश्चित करता येते. त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. 

सुमारे ४० ते ५० अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवांची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अथवा अवयवांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी, प्रत्यारोपित करता येतात. यामध्ये प्रामुख्याने दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, आतडी, डोळे तर कांही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात. (हात, पाय, गर्भाशय, कानाचे पडदे, हाडे, झडपा वगैरे.) कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान यास संमती दिली तर, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. सदर बाब इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. यातील कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी आपण केलेल्या संकल्प पुर्तीने आपण वाचवू शकतो. देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाईटवरती असे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकेल. ते संकल्प पत्र भरून आपण देहदानाचा संकल्प करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. अशी इत्यंभूत व महत्त्वपूर्ण माहिती योगेश अग्रवाल यांनी देऊन उपस्थित सर्वांचेच प्रबोधन केले. अवयवदान व देहदान याबाबत पदयात्रा, पथनाट्ये, पत्रके व मेळावे घेऊन जनजागृती करीत असल्याचे सांगितले.

यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मरावे परी, अवयव रूपी उरावे !असे सांगत, आज देशासमोर अवयवदान व देहदानाच्या माध्यमातून ज्या गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, याबाबत सर्व जनतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या जनहितार्थ कार्यास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, विभागीय आयुक्त समाधान भोसले, कोल्हापूरचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी मंडळाच्यावतीने समाजाचे प्रबोधन करण्यास परवानगी दिल्याबद्द्ल त्यांना धन्यवाद दिले.

या जगात अनेक प्रकारचे दान फक्त पैसेवाले लोक करू शकतात. पण अवयवदान, नेत्रदान, देहदान, त्वचादान, रक्तदान हे असे दान आहे जे प्रत्येक व्यक्ती करू शकते. आपण भाग्यवान आहोत की आपण दात्यांच्या यादी मध्ये आहोत. कल्पना करा की आपण याचिकाकर्ते (गरजूंच्या यादीत) असतो तर, आपली काय अवस्था झाली असती ? आपल्या देशामध्ये लाखो लोक अवयवांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांचा मृत्यू होतो. पण अवयव मिळत नाही. कांही गंभीर भाजून जखमी झालेले असतात त्यांच्या जखमांवर दुसरी त्वचा लावल्याशिवाय जखमा भरत नाहीत. या जखमांतुन होत असलेल्या वेदनांचा विचार करून अंगावर शहारे येतात. आज भारतात अवयवदानाचे प्रमाण ०.१६  इतके आहे त्यामुळे अवयवदान ही काळाची गरज आहे. याबाबत जरी एखाद्या दात्याने आपले नाव संबंधित यंत्रणेकडे नोंद केले असले तरी, त्याच्या मृत्यू पश्चात संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी जर या गोष्टीस नकार दर्शवला तरी याबाबत कोणतीही जबरदस्ती अगर सक्ती केली जात नाही. त्यामुळे सामाजिक संस्था त्याचबरोबर शासनाने सुद्धा योग्य ते सहकार्य करून ही चळवळ जनताभिमुख होणेसाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनहितार्थ ही जनजागृत्ती व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातील केंद्र संचालक चंद्रकात घारगे यांनी दिपक पाटील (आय अँड आर ॲडमिन मॅनेजर), सुरेश केसरकर (अध्यक्ष, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन)

योगेश अग्रवाल (यशोदर्शन फाऊंडेशन) राजमहंमद मुल्ला (एच. आर. मॅनेजर) प्रकाश पाटील (प्रोडक्शन मॅनेजर) सागर जोके (एच. आर. ऑफीसर) अपर्णा माळी (ज्युनिअर एच. आर. ऑफीसर) आदींचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले व मंडळाच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांसाठी एल्कॉम कंपनीचे सर्वच व्यवस्थापकीय अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असलेबद्दल धन्यवाद मानले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राजमहंमद मुल्ला यांनी आभार मानून आजचे प्रबोधनपर व्याख्यान संपलेचे जाहिर केले.

Post a Comment

Previous Post Next Post