प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करत खून करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात तरुणाचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. ही खळबळजनक घटना गुरुवार दिनांक एक जून रोजी समोर आली. आयफोन साठी पैसे मागितल्याने घरात वाद झाला आणि रागाच्या भरात वडील आणि भावानेच खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील तरुणाचा आहे. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापुरातील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अमरसिंह थोरात (वय ३० वर्ष) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे . त्याचा मृतदेह कागल-निढोरी राज्य मार्गावरील बामणी हद्दीतील एका शेतात टाकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
तरुणाला इतर ठिकाणी मारून येथे मृतदेह आणून टाकल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. येथील पोलिस पाटील महादेव कुंभार यांनी काल याबाबतची फिर्याद कागल पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर कागल पोलिस घटनास्थळी येऊन पंचनामा करताना तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले. त्यावरुन त्याचे नाव अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय ३० वर्ष, रा. गोटखिंडी ता. वाळवा) असल्याचे समोर आले.