प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
prasad.kulkarni65@gmail.com
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील एक अग्रगण्य समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे पहावे लागेल.ते अनेक अर्थानी सुधारकाग्रणी होते.१४ जुलै १८५६ रोजी जन्मलेले आगरकर १७ जून १८९५ रोजी कालवश झाले.अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,पत्रकार,संपादक,शिक्षक अशा बहूपेडी व बहुगुणी व्यक्तिमत्वाला १२८ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड जवळील टेंभू या गावी अगरकरांचा जन्म झाला.कऱ्हाड ,रत्नागिरी,अकोला,पुणे आदी गावी ते शिकले.घरची परिस्थिती अतिशय बिकट असूनही हे परिस्थितीशी संघर्ष करत शिकले.अकोल्यात असल्यापासूनच त्यांनी ‘वऱ्हाड समाचार ‘ या वृत्तपत्रात लेखन सुरू केले.पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर आपला चरितार्थ व शिक्षण यासाठी मासिकात लेख लिहायला व निबंध स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.त्यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा.केरो लक्ष्मण छत्रे यांनी त्यांना मार्गदर्शन व आर्थिक मदतही केली.
आगरकर एम.ए.झाल्यावर त्यांना लठ्ठ पगाराची नोकरी चालून येणे आणि ती त्यांनी करावे असे कुटुंबियाना वाटणे स्वाभाविक होते.पण आगरकरांनी आपल्या आईला सांगितले,”मी शिक्षक होऊ इच्छितो.लोकांत स्वतंत्र विचार उत्पन्न होऊन स्वउन्नतीचे मार्ग लोकांना दिसू लागतील अशा प्रकारच्या शिक्षकाचे काम मला करायचे आहे.मी मोठ्या पगाराची नोकरी करावी अशी अपेक्षा तू धरू नको.” अर्थात आज शिक्षक म्हणवून घेणाऱ्यांचे पगार मोठे झाले आहेत पण माणूस घडवण्याची ती बांधिलकी काही सन्माननीय अपवाद वगळता शोधावी लागेल हे कटू वास्तव आहे यात शंका नाही.
पुण्यात १८८० साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली.आगरकर,टिळक आणि चिपळूणकर हे तिघे तेथे शिक्षक होते.स्कूलचा व्याप वाढला आणि चार वर्षातच म्हणजे १८८४ साली त्याचे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी ‘मध्ये रूपांतर झाले.१८८५ पासून संस्थेचे फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले.आगरकर नंतर तेथे प्राचार्य झाले.दहा- बारा वर्षे शिक्षकी पेशात आणि चौदा वर्षे पत्रकारितेत काम करणाऱ्या अगरकरांचा मूळ पिंड समाजसुधारकाचाच होता.त्याकाळातही त्यांनी शिक्षणासाठी मातृभाषेचाच आग्रह धरला होता.त्याविषयी ते म्हणाले होते,”अगोदर देशी भाषांचा अभ्यास होऊ लागण्यात व पुढे त्या भाषांतच अभ्यास होऊ लागण्यात या देशाचे खरे हित आहे अशी तुमची पक्की खात्री असेल तर विद्यापीठांचे नाक धरून त्यांच्याकडून या अप्रिय औषधांचा स्वीकार करविणे अशक्य आहे का ?
टिळक व आगरकर समवयस्क होते.आगरकर फक्त एक महिन्यानी मोठे होते.एकमेकांचा आदर करणारे ते घनिष्ठ मित्र होते.केसरी व मराठा मध्ये त्यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले.अर्थात दोघेही आपापल्या विचारांशी ,तत्वांशी प्रामाणिक होते.त्यांच्यात मोठा वैचारिक संघर्ष झाला ,तो गाजलाही. नंतरच्या काळात अगदी प्रतिभावंत लेखक विश्राम बेडेकर यांच्यापासून अनेकांच्या नाटक वा अन्य साहित्यकृतीचा तो विषय झाला.हा वाद अर्थातच व्यक्तिगत,संस्थात्मक नव्हता तर ‘ स्वराज्य आधी की सुधारणा आधी’ हा होता.आगरकर म्हणत,”हा देश सडलेला,ना बुद्धी ना विवेक,रूढी व अज्ञानग्रस्त अशांना कोणते स्वराज्य ? श्रेष्ठ – कनिष्ठपणाची थोतांडे,शिवू नका धर्म,स्त्रियांची दुर्दशा येथे आहे.” तर टिळक म्हणायचे,” हे सारे सुधारू तोवर देश आर्थिक शोषणाने मृतप्राय होईल.आधी परके चोर घालवू मग देश सुधारू.” हा संघर्ष वैचारिक होता,मत्सरी नव्हता.याबद्दल आगरकरांनी ‘महाराष्ट्रीयास अनावृत्त पत्र ‘लिहिले होते.त्यात ते म्हणतात,”एकाला दुसऱ्याचा मत्सर उत्पन्न झाला आहे असा कुतर्क करणे अत्यन्त अनुदार होय.बांधवांनो,विचार कलहाला इतके का भीता ?दुष्ट आचाराचे निर्मूलन,सदाचाराचा प्रसार,ज्ञानवृद्धी,सत्य संशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचार कलहाखेरीज होत नाहीत “.
टिळक व आगरकर यांच्यातील वैचारिक संघर्ष ते डेक्कन एज्युकेशन संस्थेत काम करतानाच सुरू झाला होता.वेळोवेळी विविध कारणांनी तो वाढतच गेला.पुढे आगरकरांनी स्वतःचे ‘सुधारक ‘ काढले आणि ही जखम वाहायला लागली.आगरकरांच्या पत्नी यशोधाबाईंनी आपल्या आठवणीत म्हटले आहे की,”या दोन जिवलग मित्रांच्या खाजगी भांडणाचा परिणाम इतका विकोपाला जावा व शहाणे म्हणवणाऱ्यानी आगीत तेल ओतण्याचा क्रम सतत चालू ठेवावा ही खरोखर खेदाची गोष्ट आहे.”शिवाय या वादात अधिकारवाणीने जे मध्यस्थी करू शकले असते अशा विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे १८८२ साली निधन झाले होते.अर्थात अगरकरानी टिळकांवर एकदा चुकीची टीका केली तेंव्हा त्यांनी ‘बोलणे फोल झाले ‘ हा लेख लिहून प्रांजळपणे आपली चूक कबूल केली होती.आणि आगरकर गेले तेंव्हा टिळक ढसाढसा रडले व त्यांना अग्रलेख लिहायला चार तास लागले होते.त्यांच्यात वाद होता पण एकमेकांप्रती आदरही होता.टिळकांशी वैर धरून आपल्याला शांतपणे मरण येणार नाही असे म्हणणाऱ्या आगरकरांच्या घरी टिळक भेटायला आले होते त्यामागे ही अदम्य ओढच होती.
आगरकरांच्यातील सुधारकाची खरी ओळख त्यांच्या पत्रकारितेतून होते.केसरी – सुधाकरातून त्यांनी चौदा वर्षे लेखन केले.सातशेच्यावर लेख लिहिले.धारदार शैली,झुंझार वृत्ती,मृदुता,ओघवत्या नर्म विनोदाने युक्त असलेल्या त्यांच्या लेखणीने बुरसटलेले विचार ,असंस्कृत परंपरा ,बालविवाह,केशवपन,जातीभेद,अस्पृश्यता आदी विषयांवर सडेतोड लिखाण केले. ते म्हणाले होते ,”मी जर एक गोष्ट प्रतिपादन करणारा आणि दुसरी गोष्ट आचारणारा असेन तर शिक्षक व पत्रकार होण्यास नालायक आहे.”
केशवपनाची रूढी त्यावेळी होती त्याबाबत त्यांनी लिहिले,”बायकांच्या केसांचा जर मेलेल्या नवऱ्याच्या गळ्याला फास बसतो तर पुरुषांच्या शेंडीचाही मेलेल्या स्त्रीस का फास बसू नये ? एकास जर कोणी संन्यासी बनवत नाही तर दुसरीला मात्र नाभिकापुढे का बसवावे ? “तसेच बालविवाहाबाबत ते म्हणतात,”जी स्वयंवरे नाहीत त्या सर्वाना आम्ही बालविवाहच समजतो.ज्याचे त्याने लग्न करणे म्हणजे स्वयंवर.एकाने दुसऱ्याचे करणे म्हणजे बालविवाह.अर्धे स्वयंवर व अर्धा बालविवाह अशी पद्धती शक्य नाही “.धर्मकल्पना ही माणसाच्या अनेक मनोवृत्तीपैकी एक आहे.या मनोवृत्तीने माणूस जसा सद्गुणी होतो तसाच दुर्गुणीही होतो.धर्मकल्पनेचे स्वरूप जितके मनोहारी आहे तितकेच बीभत्सही आहे.त्याआधारे सुरू झालेल्या अनिष्ट रूढी ,परंपरांचा मूर्ख व भंपक असा उल्लेख करत आगरकरांनी तीव्र धिक्कार केला.
आज धर्मवादाचे ढोल अधर्मी सत्ताकरणासाठी वाजवले जात आहेत.त्यांनी आगरकरांचे विचार समजून घेतले पाहिजेत. ते म्हणतात,”वारा,पाऊस,पूर,चंद्रसूर्याच्या गती वगैरे गोष्टींची कारणे व त्या घडून येण्याचे प्रसंग नीट काबूत येऊ लागले म्हणजे त्या वस्तूंवरील धर्मश्रद्धा हळूहळू उडू लागते व तसाच प्रकार देव मानलेल्या वनस्पतींच्या व जनावरांच्या संबंधाने हळूहळू घडून येतो.हे सर्व विचारांतर होण्यास विशेषतः कार्यकरणांचे ज्ञान कारण होते.अशा रीतीने मनुष्याच्या धर्मकल्पनात थोडा थोडा फरक होता होता बहुतेक अचेतन व सचेतन पदार्थातील देवतत्व नाहीसे होऊन त्या सर्वांचे आदिकारण एक परमेश्वर आहे असा बुद्धीचा ग्रह होतो.नंतर त्या परमेश्वराच्या गुणांविषयी व स्वरूपांविषयी नाना तऱ्हेच्या कल्पना निघू लागतात.पहिल्या मूर्तिपूजेचा अंमल अगदी नाहीसा न होता एकेश्वरापर्यंत धर्मकल्पना येऊन थडकली.तर आचार व विचार यांचे द्वंद्व लागून विलक्षण तर्हेचा धर्म उत्पन्न होतो.तोंडाने वारंवार परमेश्वर निर्गुण आहे असे म्हणत असावे व हाताने पार्थिव करून त्याची अक्षतानी ,बिल्वपत्रानी व पंचामृताने पूजा करीत असावे.जो मेला तो पंचत्वाप्रत मिळाला असे मनात असावे पण सपिंडी,क्षोर,शय्यादान केल्याशिवाय स्वास्थ्य वाटू नये,वर्णव्यवस्था मनुष्यकृत आहे अशी खात्री होऊन जावी पण अतिशूद्राचा स्पर्श झाला असता सचैल स्नान करण्याची बुद्धी व्हावी .बहुतेक व्यवहार सृष्टी नियमाप्रमाणे चालत आहेत असे एकीकडे वाटत असून तदनुसार वर्तन होत असावे पण कोणत्याही अडचणीत साधारण उपाय चालत नाहीत असे दिसल्याबरोबर ज्योतिषांच्या व मंत्राक्षऱ्यांच्या घरी खेटे घालावे किंवा देवांच्या मूर्ती पाण्यात कोंडून ठेवाव्या अथवा त्यावर अभिषेकाची धार धरावी अशी इच्छा उत्पन्न व्हावी.”
आगरकरांनी राज्यकल्पना व धर्मकल्पना यातील फरक स्पष्ट केला.ते म्हणतात,”राज्यकल्पना व धर्मकल्पना यांच्या अभिवृद्धीत बराच फरक आहे.राजकीय संबंधाने राजसत्ता प्रथम एकाकडे असणे योग्य वाटत असून हळूहळू ती अनेकांकडे असणे योग्य वाटू लागते.एक सत्तात्मक,अनेक सत्तात्मक व सर्व सत्तात्मक अशी राजकीय कल्पनेची वाढ आहे.धर्मकल्पनेचा विचार हिच्या उलट आहे.देवतातत्व प्रथम विश्वातील सर्व वस्तूत भासते.नंतर ते त्यातील ठळक ठळक वस्तूत भासू लागते.आणि अखेरीस ते फक्त एका वस्तूत गोळा होते.” मनुष्याची वन्यावस्था सुटत त्यांची सुधारणा होऊ लागणे म्हणजेच त्यामध्ये धर्म आणि राज्य या संस्थांची स्थापना होणे होय असे आगरकर मानत होते.आगरकरांनी व्यापारापासून शिक्षणापर्यंत आणि अंधश्रद्धेपासून इहवादापर्यंत अनेक विषयांवर मूलभूत स्वरूपाचे लेखन केले आहे.
केसरीचे सात वर्षे संपादक असलेल्या आगरकरांनी २८ ऑक्टोबर १८८७ रोजी ते पद सोडले.आणि १५ ऑक्टोबर १८८८ रोजी दसऱ्याच्या दिवशी ‘सुधारक ‘सुरू केले.त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनाला एक नवी उभारी आली.तत्कालीन समाजाला न रुचणारे,न पटणारे विचार ते मांडत असल्याने त्यांना नेहमीच समाजाशी वैर पत्करत,प्रतिकुलतेशी झगडत काम करावे लागले.समकालीन समाजाशी संघर्ष करण्यातच त्यांचे मोठेपण लपले होते.अंगिकारलेल्या कामाबद्दल त्यांची प्रामाणिकता व जिद्द मोठी होती.
सामाजिक चळवळीबद्दल त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे,”जुन्या परंपरांवर कंटाळा येईल इतकी टीका करीत बसण्यात अर्थ नाही.परंपरागत विचार मानणाऱ्यांवर टीका करायची ती त्यांना भडकवण्यासाठी नव्हे तर त्यातीलअसंबद्धता,दोष त्यांच्या नजरेत आणून त्यांनी तो दूर करावा . याबरोबरच विचार सभागृहात ,बाजारात,चव्हाट्यावर,व्यसपीठावर,कीर्तनात,ग्रंथालयात जिकडे तिकडे सतत बोलले गेले पाहिजेत,त्याशिवाय सामाजिक सुधारणेची चळवळ यशस्वी होणार नाही.’माझ्या पावशेर मिशा फिल्टरसाठी उपयोगी पडतात ‘,असे विनोदाने म्हणणारे आगरकर गेले तेंव्हा त्यांच्या उशाशी एक पुरचुंडी होती.त्यात थोडे पैसे आणि एक चिट्ठी होती.त्यात लिहिले होते,” माझ्या प्रेतदहनार्थ मुठमातीची पत्नीस पंचाईत पडू नये म्हणून व्यवस्था “.अशा या थोर सुधारकाग्रणी आगरकरांना विनम्र अभिवादन..!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)