प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत अग्निशमन सेवा व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेने अग्निशमन साहित्य व मिनी फायर फायटर वाहन खरेदी करणे कामी प्राप्त ५२ लाख रुपये अनुदानातून साहित्य व मिनी फायर फायटरची खरेदी केली आहे. तर अत्याधुनिक पध्दतीचे नविन फायर फायटर वाहन खरेदीसाठी ६५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले असून त्याची खरेदी प्रक्रिया सुरु आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील वस्त्रोद्योग, प्रोसेस, सायझिंग, कारखाने यांची व्याप्ती पाहता आग विझविणे अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील दोन अग्निशमन केंद्रात दोन वाहने कार्यरत आहेत. तथापि शासनाच्या नविन स्क्रॅप पॉलिसीनुसार २ फायर फायटर वाहनांचा पुढील काळात वापर करणे शक्य नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील लहान गल्ली बोळातील आगी तात्काळ विझविणेकामी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ अंतर्गत अग्निशमन सेवा व आणीबाणींच्या सेवांचे बळकटीकरण करणे अंतर्गत ५२ लाखाचे अनुदान मंजूर झाले होते. त्या मधून मिनी फायर फायटरची खरेदी करण्यात आली असून हे वाहन शुक्रवारपासून अग्निशमन सेवेत रुजू झाले आहे. त्याचबरोबर यावर्षी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२२- २३ अंतर्गत अग्निशमन सेवा व आणीबाणींच्या सेवांचे बळकटीकरण अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेस अत्याधुनिक पध्दतीचे नविन फायर फायटर वाहन खरेदीसाठी ६५ लाखाचे अनुदान मंजूर झाले असून.लवकरच नवीन फायर फायटर वाहनअग्निशमन ताफ्यात सामील होणार आहे.