सोमवार ता.१२जून म्हणजे पुलंचा स्मृतिदिन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)
पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्यांना दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने घेरले होते. त्यांना जाऊन तेवीस वर्षे झाली तरीही त्यांच साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील गारुड अद्याप ओसरलेल नाही.त्यांच्यावर दोन भागात चित्रपट काढावा लागणे हे त्याचे द्योतक आहे. ‘ समाजाच्या समग्र संस्कृतीला व्यापुन उरणारा कलावंत’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला गेला होता.
पुलंचे वडील हे नाट्य – संगीत प्रेमी होते. तर त्यांच्या आईचे वडील म्हणजे पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे लेखक होते. पुलंचे प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले.तर इस्माईल युसुफ कॉलेज (मुंबई), फर्ग्युसन कॉलेज ( पुणे) आणि विलिंग्डन महाविद्यालय (सांगली )याठिकाणी पुलंनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी बेळगाव मालेगाव आणि मुंबई येथे अध्यापनाचे काम केले १९५५ साली भारत सरकारच्या आकाशवाणीमध्ये त्यांची निर्माते आणि नाट्य विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. दूरचित्रवाणीच्या प्रसारणाचे विशेष ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना युनेस्कोचे शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्यांनी त्याचे लंडनमध्ये रीतसर प्रशिक्षण घेतले.
दूरदर्शन आणि त्याची शेकडो चॅनल यांचे आज आपल्याला नावीन्य राहिलेले नाही. पण दूरदर्शनच्या दिल्ली प्रसारण केंद्रावरून प्रसारित झालेला पहिला कार्यक्रम ही पुलंचे निर्मिती होती. दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या ऐतिहासिक वाटचालीत पुलंचे योगदान फार मोठे आहे.हे करत असताना हा अष्टपैलू कलावंत चित्रपट क्षेत्रातही अभिनेता ,संगीतकार, निर्माता म्हणून कार्यरत होता. पुढचं पाऊल, कुबेर ,भाग्यरेखा, वंदे मातरम ,संत चोखामेळा, अंमलदार इत्यादी चित्रपटातून त्यांनी अभिनय केला.देवबाप्पा, मानाचं पान वगैरे चित्रपटांना संगीत दिले. गुळाचा गणपती हा गाजलेला चित्रपट तर सबकुछ पुलं होता. कथा, संगीत ,दिग्दर्शन भूमिका या साऱ्या बाजू त्यांनी सांभाळल्या होत्या. याशिवाय पुलंनी अनेक नाटके लिहिली व दिग्दर्शित केली?आणि विविध स्वरूपाचं प्रचंड असे लेखन त्यांनी केले.
पु ल देशपांडे हे करू शकले याचे कारण त्यांच कलेवर अस्सल व अव्वल प्रेम होतं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले होते, ” -कलावंताच्या श्रेध्येच स्थान एकच असायला हवं ते म्हणजे कला. गाण्याऱ्यांची संगीतावरची कला उडून सरकारी सन्मानावर श्रद्धां जडली की तो त्याचं स्वतःचच नव्हे तर साऱ्या रसिकांच जीवन बेसूर करतो. प्राध्यापकांची श्रद्धा शिक्षणावरून उडून विद्यापिठात उपकुलगुरू होण्यावर जडली तर त्यांच्यात आणि हेडक्लार्क कधी मारतो याची वाट पाहत बसलेल्या बुभुक्षित कारकुनात काहीही फरक नाही.” पुलं आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी अनेक उत्तमोत्तम कवींच्या कविता काव्यवाचनाच्या कार्यक्रमाद्वारे रसिकांपर्यंत नेल्या. स्वतः पुलंनी विविध प्रकारच्या एकपात्री कार्यक्रमांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. आपल्या विविध विषयांवरच्या भाषणांनी महाराष्ट्राला विचार प्रवृत्त करत करत रिझवले. मनोरंजनातून प्रबोधन करण्याची त्यांची हातोटी दुर्मिळ होती. त्यांचे लेखन, भाषण हे एकीकडे हसवत होते,तर दुसरीकडे श्रोत्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडत होते.
वयाच्या चोविसाव्या वर्षी लेखनाला सुरुवात केलेल्या पुलंनी नाटक ,एकांकिका ,लोकनाट्य ,अनुवाद ,प्रवास वर्णन ,विनोदी लेख, व्यक्तिचित्रणे अशा स्वरूपाचे विविधांगी लेखन केले.तुका म्हणे आता ,अंमलदार ,भाग्यवान ,तुझे आहे तुजपाशी ,सुंदर मी होणार ,तीन पैशाचा तमाशा ,राजा ओयरी पौस, ती फुलराणी यासारखी स्वतंत्र आणि आधारित नाटके त्यांनी लिहिली. एका कोळीयाने ,काय वाट्टेल ते होईल या सारख्या कादंबऱ्या अनुवाद करून पुढे आणल्या. पुढारी पाहिजे सारखे लोकनाट्य लिहीले. मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला ,आम्ही लटिके ना बोलू यासारखे एकांकिका संग्रह त्यांनी लिहिले. नसती उठाठेव, खोगीरभरती, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज हे त्यांचे विनोदी लेख संग्रह आणि व्यक्ती आणि वल्ली हा व्यक्तिचित्रसंग्रह ,अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवासवर्णने म्हणजे मराठी साहित्य रसिकांच्या अनेक पिढ्यांची मन प्रफुल्लित करणारी आनंद स्थाने, विरंगुळा केंद्रे,चैतन्य थांबे ठरलेली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चरित्र ही पुलंनी लिहिले.
नव्याने निर्माण होणाऱ्या साहित्याबद्दल आणि तरुण लेखकांबद्दल पुलं कमालीचे आशावादी होते. म्हणून तर त्यांनी १९७४ साली इचलकरंजी येथे झालेल्या पन्नासाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात त्या काळात नव्याने लिहिणाऱ्या विजय तेंडुलकरांपासून नारायण सुर्वे यांच्या
पर्यंत ,दया पवारांपासून अरुण साधू यांच्या पर्यंत, चारुता सागर यांच्या पासून वसंत आबाजी डहाके यांच्या पर्यंत अनेकांचा उल्लेख केलेला दिसतो. त्यांनी उल्लेखलेल्या सर्वांनी पुढे मराठी साहित्यात मौलिक भर घातली हे आपण पाहतो. पुलंची ही गुणग्राहकता व द्रष्टेपण लक्षात घेतले पाहिजे. अध्यक्षीय भाषणाच्या समारोपात ते म्हणाले होते ‘ गुण गाईन आवडी ,हेचि माझे सर्व जोडी ‘ हीच माझी साहित्य ,संगीत, नाट्य या कलेच्या क्षेत्रातील भूमिका आहे.असे गुण गात एखाद्या लेखाच्या किंवा पुस्तकाच्या रूपाने आपल्या भेटीला यायची ओढ तरुण राहो,हा आशीर्वाद मी आपणास ,सर्व वाचकांना आणि त्यात ज्येष्ठ व तरुण सर्व साहित्यिकांकडे मागतो. “
पुलंच्या लेखनाबाबत भाष्य करताना मराठी वाङ्मय कोशात म्हटले आहे, ” पुलंचे लेखन मध्यमवर्गीय मराठी माणसाने उचलून धरले ,कारण त्यांच्या लेखनात मध्यमवर्गीय माणसाची सुखदुःखे ,बदलत्या सामाजिक – आर्थिक परिस्थितीने त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम ,त्यांच्या वागण्यातील अंतर्विरोध आणि विचारातील विसंगती त्यांच्या विनोदी लेखनाने टिपल्या. पुलंच्या विनोदात उपरोध वा उपहास नाही. त्यांचा विनोद मिश्कील अवखळ ,निरामय आहे. कोट्या ,श्लेष ,अतिशयोक्ती, विलक्षण कल्पकता हे त्यांच्या विनोदाचे विशेष आहेत.त्यांची रसिकता ,अभिजात सौंदर्यदृष्टी ,गुणग्राहकता, इतरांच्या कलागुणांनी वेडावून जाणारी विभोर होणारी वृत्ती आणि जीवनाकडे पाहणारा निर्मळ ,प्रसन्न दृष्टीकोण हे सारे त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होते. त्यांनी वाचक अभिमंत्रित होतो. जगण्यातले सारे प्रश्न सदस्य विसरून निर्मळ वाङ्मयात बुडून जातो.”
अतिशय उत्तम प्रकारची साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात करूनही,” फारतर दोन चार विनोदी पुस्तके ,काही प्रवासवर्णने न काही व्यक्तिचित्रे एवढीच माझी साहित्यनिर्मिती. माझ्यापासून कुठला कालखंड सुरू झाला नाही ती संपला नाही नाही ” असे नम्रपणे म्हणणारे पुलं महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव होते. सर्वांना खळखळून हसायला लावणारा ,अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा, जीवन विषयक व कलाविषयक जाणिवा समृद्ध असलेला हा माणूस सर्वार्थाने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होता. त्यांनी शेकडो लेखकांना प्रेरणा दिली.शेकडो संस्थांना कोट्यावधी रुपयांची मदत केली. पु ल देशपांडे प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी व सुनीताबाईंनी महाराष्ट्राच्या सामाजिक ,सांस्कृतिक, कलाविषयक कार्याला फार मोठी गती दिली.भारत सरकारने १९६६ साली पद्मश्री आणि १९९० साली पद्मभूषण किताब देऊन त्यांना गौरविले. त्याचबरोबर देशभरात इतरही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. अशा या थोर कलावंताला तेविसाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेली अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
----------------------------------------