महावितरण कंपनीच्या बेकायदेशीर थकबाकी वसुलीबाबत ग्राहकांनी जागरुक रहावे - प्रताप होगाडे


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

महाराष्ट्रातील राज्य महावितरण कंपनीने बेकायदेशीर थकबाकी वसुली मोहीम सुरु केली असून याबाबत वीज ग्राहकांनी जागरूक रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या पञकात म्हटले आहे की ,महावितरण कंपनीच्या वतीने सध्या राज्यातील २००४ - ०५ अथवा त्यापूर्वी ज्यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा पूर्वीच्या काही वीज ग्राहकांना थकबाकी नसतानाही थकबाकी वसुलीच्या नोटीसा कंपनीतर्फे अथवा विधी अधिकारी यांच्यामार्फत लागू केल्या आहेत. काही वीज ग्राहकांना त्यांच्या बिलांमध्ये १५-२० वर्षांच्या मागील थकबाकी  टाकून वाढीव वीज बिले लागू करण्यात आली आहेत. तर काही वीज ग्राहकांच्या बाबतीत कंपनीचे कर्मचारी त्या ग्राहकांना भेटून त्यांना "तुमच्या जागेतील मागील थकबाकी भरावी अन्यथा तुमच्या बिलामध्ये टाकण्यात येईल" अशा स्वरूपाच्या धमकीवजा सूचना देत आहेत. महावितरण कंपनीची ही कारवाई संपूर्णपणे बेकायदेशीर असून अशा चुकीच्या वसुली कारवाईला कोणीही दाद देऊ नये. यासाठी सर्व कायदेशीर सल्ला, माहिती व मदत यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या इचलकरंजी कार्यालयाशी संपर्क साधावा" असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.

यासंदर्भात रितसर उत्तर देण्यासाठी अथवा तक्रार दाखल करण्यासाठी इचलकरंजी येथे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व जनता दल कार्यालय,अथवा संघटना सचिव व जनता दलाचे शहराध्यक्ष जाविद मोमीन (मोबाईल क्र. ९२२६२९७७७१) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन पत्रकात शेवटी करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post