प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१५,परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत धोरण एकमेकांना पूरक असून आर्थिक विकास आणि देशांतर्गत स्थिरता यावरून परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करणे गरजेचे आहे. या पातळीवर मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरले आहे. बेरोजगारी, आर्थिक महामंदी, धार्मिक तणाव, यामुळे सर्वात जास्त तरूण लोकसंख्येचा देश असून देखील भारताची प्रतिमा जगभरात नकारात्मक होत चालली आहे. इतर देशांतील सरकारे मोदींचे कौतुक राजकारणातील संकेत म्हणून करत असून जगातील नागरी समाजामध्ये वास्तव नेमके उलटे आहे. स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नात मोदी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची प्रतिमा मलिन केली आहे. भारताने जागतिक राजकारणाचे नेतृत्व करावे ही इच्छा नवीन नसून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्यपूर्वीपासून होती. भारत- अमेरिका अणुकरार हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला मैलाचा दगड असून भारतीय मुत्सद्देगिरीची झलक सर्व जगाने पाहिली आहे. २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्यांच्या प्रमुखांनी भारताला भेट देऊन भारताचे जागतिक राजकारणातील महत्व अधोरेखित केले होते. २०१४ नंतर भारतीय परराष्ट्र धोरण हे भारताचे नसून एका पक्षाचे- एका व्यक्तीचे धोरण बनले. असे मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे व्यासंगी अभ्यासक प्रा.डॉ.रोहन चौधरी( पुणे) यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात " भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण : आव्हाने आणि संधी "या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. भारती पाटील ( कोल्हापूर )होत्या.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.प्राचार्य ए.बी.पाटील यांनी पाहुण्यांचे ग्रंथ देऊन स्वागत केले.यावेळी गेली चौतीस वर्षे नियमित प्रकाशित होणाऱ्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाच्या जून -जुलै २०२३ या जोड अंकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. डॉ.रोहन चौधरी म्हणाले,गेल्या दशकात जगभरात उजव्या विचारसरणीचे सरकारे आली असून या देशात इतिहासाचा वापर पक्षीय स्वार्थासाठी करण्यात येत आहे. चीन, भारत आणि रशिया हे यात आघाडीवर असून जगाला भेडसावत असणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर ठोस भुमिका घेण्यात हे देश अपयशी ठरले आहेत. इतिहासाचे उद्दतिकरण करण्याच्या प्रयत्नात या देशांनी जगाला अस्थिरतेच्या गर्तेत ढकलले आहे. चीनचे तैवान धोरण, रशिया-युक्रेन युद्ध आणि एनआरसी ही त्यांची ज्वलंत उदाहरणे आहेत.
अंतर्गत सुरक्षा हे परराष्ट्र धोरणासमोरील सर्वात मोठे आव्हान असून नक्सलवाद, दहशतवाद, फुटीरतावाद या समस्येकडे सगळ्याच सरकारांचे दुर्लक्ष झाले आहे. मणिपूरमधील अशांतता किंवा पंजाबमधील अस्वस्थता यामुळे जागतिक राजकारणात भारत या समस्येचे व्यवस्थापन करु शकत नाही असा संदेश जात आहे. भारताच्या जागतिक नेतृत्वातील हा सर्वात मोठा अडथळा आहे.
डॉ.रोहन चौधरी पुढे म्हणाले,जी २० च्या माध्यमातून पंतप्रधानांची प्रतिमा विनाकारण रंगवली जात आहे. जी २० ही अनौपचारीक संघटना असून जागतिक समस्यांचे निराकरण करण्यास ती समर्थ नाही . रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यात आलेले अपयश, श्रीलंका- पाकिस्तान या देशांना अर्थिक संकटातून बाहेर काढण्यात आलेले अपयश यातून जी २० च्या मर्यादा अधोरेखीत होतात भारतात तिचा गाजावजा पक्षीय हित साध्य करण्यासाठी केला जात आहे.
अमेरिकाकेंद्रित परराष्ट्र धोरण देशासाठी धोकादायक असून परराष्ट्र धोरणाचे यश हे अमेरिका बरोबरच्या संबंधांवरून ठरवले जात आहे. रशिया-यूक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणाची गणिते बदलत असून चीन -रशिया-पाकिस्तान असे नवे समीकरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेशी गरजेपेक्षा जास्त सलगी भारतीय परराष्ट्र धोरणासाठी धोकादायक ठरू शकते. अमेरिकेचा इतिहास हा विश्वासघाताचा राहिला असून भारताला भविष्यात जास्त सजग राहावे लागेल. यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा अलिप्ततावादाची कास धरावी लागणार असून रशिया- युक्रेन युद्धात त्याचा फायदा भारताला मिळालेला आहे. आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी नंतर डॉ. चौधरी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसनही केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.डॉ. भारती पाटील म्हणाल्या, पंडित नेहरू यांनी अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व करून आणि इंदिरा गांधी यांनी बांगलाच्या युद्धातून आपले खरे नेतृत्व जागतिक पातळीवर प्रस्थापित केले होते.या नेतृत्वात फसवेगिरी नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उजळली की त्याचा देशांतर्गत प्रतिमा संवर्धनाला उपयोग होतो हे इतिहासाने दाखवून दिलेले आहे. पण सध्या परराष्ट्र धोरणातील सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताच्या नव्या संसदेच्या उद्घाटनाची छायाचित्रे व बातम्या जगाने पाहिलेली आहेत. त्याचा परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणावर होऊ शकतो. जे राष्ट्रबांधणी करते ते परराष्ट्र धोरण महत्त्वाचे असते.
या व्याख्यानास श्रोत्यांच्या चांगला प्रतिसाद होता. अन्वर पटेल यांनी आभार मानले.