प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
तारदाळ येथील रेल्वे फाटक परिसरात वडिलांनीच स्वतःच्या मुलाचा खून करून मृतदेह टाकला असल्याचे आज गुरुवारी सकाळी उघडकीस आले. राहुल दीपक कोळी ( वय 30 रा. तारदाळ ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा खून वडील दीपक कोळी यांनी भाडोत्री मारेकऱ्यांकडून केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून आर्थिक कारणावरून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून संशयित म्हणून मयताचे वडील दीपक कोळी यांच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत शहापूर पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , तारदाळ येथील बिरदेव मंदिर पाठीमागे कोळी कुटुंब राहतात.यातील राहुल कोळी याला दारूचे व्यसन होते. त्याचा गुरुवारी सकाळी रेल्वे फाटक परिसरात मृतदेह आढळून आला. त्याची माहिती शहापूर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्याच्या डोक्यात गंभीर वार व हाताला इजा होती. तसेच रेल्वे फटकावर व फाटकापासून खाली दहा दहा फूट अंतरावर रक्ताचे ठसे आढळून आले. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता काहीच सापडून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी राहुल याच्या वडिलांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता भाडोत्री मारेकऱ्यांकडून मुलाचा खून केल्याची कबुली दीपक यांनी पोलिसांना दिली. हा खून आर्थिक कारणावरून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवी , शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी भेट दिली.या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.संशयित म्हणून मयताचे वडील दीपक कोळी यांच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती देखील शहापूर पोलिसांनी दिली आहे.