प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे (मुंबई) यांना ‘स्वरप्रतिभा – कोहिनूर’ पुरस्कार बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परीषद, टिळक मार्ग, पुणे येथे देऊन गौरवले जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार भूषवणार असून पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ११,००० रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘इतनी शक्ती हमे देना दाता.....’ हे गाणे गायिका पुष्पा पागधरे आणि नेपाळी गायिका सुषमा श्रेष्ठ यांनी गाऊन अजरामर केले. १९८६मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटातील या गाण्याचे गीतकार अभिलाष असून संगीतकार कुलदीप सिंग आहेत. आजपर्यंत जगात युट्युबवर हे गाणे सुमारे पावणे दोन कोटी रसिक श्रोत्यांनी ऐकले आहे ही निश्चितच विशेष बाब मानावी लागेल. हे गाणे ८ भाषांमध्ये अनुवादित केले गेले आहे. देशात हजारो शाळांमध्ये हे प्रार्थनागीत म्हणून ऐकवले जात असते. मनावर उत्तम संस्कार करणारे प्रार्थनागीत समाजाला दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा त्यांचा सन्मान केला जात आहे. याप्रसंगी तन्मयी मेहेंदळे यांची प्रार्थना व त्यानंतर पुष्पा पागधरे यांची प्रकट मुलाखत नीलिमा बोरवणकर घेतील असे संयोजक व स्वरप्रतिभा या संगीताला समर्पित दिवाळी अंकाचे संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.