प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी: प्रतिनिधी :
येथील राजहंस फौंडेशन व हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मुलांसाठी मोफत ज्ञान संस्कार शिबिराचा शुभारंभ सोमवारी पञकार सुभाष भस्मे यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर तेजश्री प्रकाशनचे प्रकाशक दादासाहेब जगदाळे,सौ.विमल जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होते.
प्रारंभी राजहंस फौंडेशनच्या प्रमुख डॉ.प्रतिभा पैलवान यांनी स्वागत व प्रास्ताविकात फौंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.तसेच आजच्या काळात ज्ञान संस्कार शिबिराचे महत्व विषद करुन केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व उदात्त हेतूने सर्वाधिक कामगार वस्ती असलेल्या परिसरात सदरचे शिबिर आयोजित केल्याचे सांगितले.
यानंतर प्रमुख पाहुणे पञकार सुभाष भस्मे यांनी सध्याची बदलती जीवनशैली व त्याचे भावी पिढीवर होणारे दुष्परिणाम विविध उदाहरणांव्दारे स्पष्ट करुन निकोप समाज निर्मितीसाठी ज्ञान संस्काराची गरज असल्याचे सांगितले.तसेच राजहंस फौंडेशन व हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरने सुरु केलेल्या ज्ञान संस्कार शिबिर उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी तेजश्री प्रकाशनचे प्रकाशक दादासाहेब जगदाळे यांनी देखील आपल्या मनोगतात लहान मुलांसाठी आयोजित केलेले ज्ञान संस्कार शिबिर हे समाज विकासात मोलाची भर घालणारे असून अशा उपक्रमांचे सामाजिक, संस्था संघटनांनी अनुकरण करुन समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे ,असे आवाहन केले. कु.प्रतिमा चंदनशिवे हिने विविध कथांच्या माध्यमातून प्रबोधन केले.
यावेळी प्रशिक्षिका युवतींनी शिबिरार्थींकडून विविध खेळ , प्रार्थना ,जय जय रामकृष्ण हरी मंञ व व्यक्तीमत्व विकासासाठी उपयुक्त प्रात्यक्षिके करुन घेतली.यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसंडून वहात होता.त्यात मुलांना बालोपासना पुस्तक व खाऊ वाटप झाल्याने तो आनंद आणखी व्दिगुणीत झाल्याचे अनुभवायला मिळाले. पहिल्या दिवशी जवळजवळ साठ विद्यार्थी उपस्थित होते.
सदरचे शिबिर दररोज सायंकाळी पाच ते सात वाजता या वेळेत १० मे पर्यंत हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ च्या पटांगणात चालणार असल्याचे प्रशिक्षिका युवतींनी सांगितले
यावेळी हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.कुंभार यांच्यासह पालक उपस्थित होते.शिबिराच्या संयोजनात पञकार सागर बाणदार यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशिक्षिका कु.वैष्णवी सोनटक्के ,कु.लक्ष्मी कोटगी ,कु.मिनल पाटील यांच्यासह शिबिरार्थी मुले उपस्थित होती.