प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ /प्रतिनिधी:
शेतकरी हा शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांमधील संशोधक जागा झाला पाहिजे. या प्रयोगांची माहिती विद्यापीठाच्या संशोधकापर्यंत पोहोचून ज्ञानाची देवाणघेवाण झाली पाहिजे. यामधूनच उत्पादन क्षमता कसे वाढवता येईल, चांगले तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याचे ज्ञान विकसित होऊ शकते. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि पारंपरिकता याची सांगड घालणे गरजेचे आहे, असे मत ऍग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संग्राम साहेबराव धुमाळ यांनी व्यक्त केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज, दत्तनगर शिरोळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये शेतीमधील सेन्सर तंत्रज्ञान माहिती याविषयी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई होते.
डॉ. संग्राम धुमाळ पुढे म्हणाले, खायाच्या अन्नाचे महत्त्व आपणाला अजूनही कळालेले नाही. रस्त्याकडचे आपण अन्न खातो. 35 ते 40 टक्के अन्नाची नासाडी होते. यापैकी दहा टक्केने नासाडी कमी केली तर आपण जगावर राज्य करू शकतो. ए. आय. (आरटीफिशियल इंटेलिजन्स), चॅट जीपीटी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर तत्काळ जशी हवी तशी मिळू शकते. श्री दत्त कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असणाऱ्या सुपरकेन नर्सरी याची नाविन्यपूर्ण माहिती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवू शकतो. शेतातील तण काढणे, पाणी देणे, भांगलन करणे, नत्र पुरविणे,औषधे फवारणी आधी सर्व माहिती एकत्रित करून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती आणखी सोपी करू शकतो. आपल्या शेती संदर्भात सर्व ती माहिती तसेच अक्षांश, रेखांश याची माहिती आणि आज्ञा दिल्यास कमी वेळात त्याचे पृथक्करण करून काय केले पाहिजे याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर तत्काळ येते. या नवीन बदलांना, नवीन तंत्रज्ञानांना स्वीकारणे अत्यावश्यक बनले आहे. भारतामध्ये बायोडायव्हर्सिटी अर्थात जैवविविधता आणि बिग डाटा अर्थात प्रचंड माहिती हे स्त्रोत आपोआपच उपलब्ध आहे. भारतातील 142 कोटी लोकसंख्येपैकी 70 टक्के लोक शेतीशी निगडित कामे करतात. त्यांच्याकडील माहिती कळाली तर आपण जगावर राज्य करू शकतो, वैश्विक गुरु म्हणून समोर येऊ शकतो. येणाऱ्या जगात बदलाबरोबर जावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सेन्सरचे प्रकार, त्यांचे फायदे प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना यांनी केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील, इंद्रजीत पाटील, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, संजय पाटील, शरदचंद्र पाठक, भैय्यासो पाटील, रावसो नाईक, दरगू गावडे, यांच्यासह सर्व संचालक, धनाजी पाटील नरदेकर, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, माती परीक्षणचे ए. एस. पाटील, वरूण पाटील, विविध विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.