आमदार शहाजीबापू पाटील व मा.आ दीपकआबा साळुंखे पाटील लक्ष देणार का..?
डॉ. बाबासाहेब देशमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणार का..?
प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगोला/प्रतिनिधी :
लोकप्रतिनिधींचा तालुक्यातील प्रशासनावरचा वचक संपल्याने उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात दररोज लाखो रुपये घेऊन कोणाच्याही जमिनी व प्लॉट कोणाच्याही ताब्यात देण्याचा व बोगस उतारे, नकाशे व मोजण्या करण्याचा घाट या कार्यालयातील अधिकार्यांनी घातला आहे. सांगोला शहराचे परीक्षण भूमापक योगेश पाटील हे तर लाखो रुपये घेऊन शहरात घराघरात भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात. गटातील सहधारक व लगत सहधारकाला नोटिसा न देता मॅनेज करून कार्यालयातच बसून मोजण्या करीत आहेत. कसेही नकाशे तयार करून बोगस नकाशे करतात व वाड्यावस्त्यांवर नोटीस न देता शेतकरी नसल्यावर चोरासारखे जाऊन हद्दीकरणाचे दगडे रोवली जातात. योगेश पाटील यांनी शहरात प्रचंड प्रमाणात अनागोंदी कारभार केला आहे. ज्यांचे पैसे घेतले जातात त्यांचीच कामे केली जातात. प्रचंड प्रमाणात तक्रारी असताना सत्ताधारी व विरोधक अजिबात आवाज उठवत नाहीत.
नंबर प्रमाणे मोजणीच्या नोटिसा न देता जे पैसे देतात त्यांचीच मोजणी केली जाते. या कार्यालयातील शहराचा प्रमुख असलेला योगेश पाटील हा भ्रष्ट अधिकारी शहरात हद्दी दाखवताना चुकीच्या दाखवतात व वारसाच्या नोंदी, बँकेचा बोजा, खरेदी दस्ताच्या नोंदी यासाठी हजारो रुपये घेऊन सहा-सहा महिने नोंदी धरल्या जात नाहीत. योगेश पाटील यांनी झिरो कर्मचार्यांची व एजंटाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत पैसे घेतले जातात हा अधिकारी कार्यालयीन वेळेत कधीच थांबत नाही. नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. नगरपालिकेला गुंठेवारीसाठी केलेल्या मोजण्याचे नकाशे जागेवर न जाता कार्यालयात बसून दिले जात आहेत. ते सर्व नकाशे शेजार्यांच्या तक्रारी असतानाही नोटीसा न देता लाखो रुपये घेऊन बोगस मोजण्या केल्या आहेत. नगरपालिकेतील नगरअभियंता आकाश गोडसे यांच्याबरोबर अर्थपूर्ण वाटाघाटी करून नगरपालिकेला नकाशे दिले आहेत. नगरअभियंता गोडसे यांनी जागेवर न जाता भूमी अभिलेख कार्यालयाच्या बोगस नकाशावर तात्पुरती गुंठेवारीचे प्रमाणपत्र देण्याऐवजी शासनाचे नियम सोडून कायम गुंठेवारीचे प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली आहे. आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा प्रशासनावर कसलाच वचक राहिला नाही. प्रचंड प्रमाणात पैशाची मागणी करून नागरिकांची लूट होत असताना हे तीन्ही नेते दखल घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी पसरली आहे.