संभाजीराजेंचे कार्य सुवर्णअक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे ----प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

रामानंदनगर ता.१६, स्वराज्याच्या संरक्षणासाठी आत्मबलिदान करणारे संभाजीराजे अतिशय शुर,पराक्रमी व बुद्धिमंत राजे होते. अवघ्या बत्तीस वर्षाचे आयुष्य लाभलेल्या संभाजीराजांना स्वकीयांशी आणि मुघल सत्तेशी सातत्याने संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या लोकहितदक्ष व धर्मनिरपेक्ष राज्याच्या रक्षणासाठी त्याचा विस्तार करतच गादीवर आल्यापासून  संभाजीराजांना अखंड संघर्ष करावा लागला.



आपल्या माणसांच्याच कपटकारस्थानाला व दागाबाजीला त्यांना तोंड द्यावे लागले. औरंगजेबाने संभाजीराजांची केलेली हत्या राजकीय सुडबुध्दीने केली होत. ते युद्ध साम्राज्य विस्तारी युद्ध होते. मराठेशाहीतील छत्रपती शिवरायानंतरचे महान योद्धे म्हणून संभाजीराजांकडे पाहावे लागते. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून संभाजी राजेंनी केलेले काम सुवर्णअक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी, व्ही. वाय. पाटील समाज प्रबोधन अकादमी आणि पलूस तालुक्यातील सर्व पुरोगामी संघटना व गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघ ,रामानंदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात " संघर्ष संभाजी राजांचा, लोकशाहीपुढील आव्हानांचा "या विषयावर  बोलत होते.छत्रपती संभाजीराजे यांचा ३६६ वा जन्मदिन आणि समाजवादी प्रबोधिनीचा ४६ वा वर्धापनदिन यानिमित्ताने हे व्याख्यान आयोजित केले होते.अध्यक्षस्थानी व्ही. वाय.(आबा) पाटील होते. समाजवादी प्रबोधिनीचे समन्वयक आदम पठाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

प्रारंभी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्कॉम) यांच्या वतीने प्रसाद कुलकर्णी यांना ' समाजभूषण पुरस्कार 'आणि आंतरराष्ट्रीय धावपटू  ज्येष्ठ नागरिक तुकाराम अनुगडे यांना ' अमृत महोत्सवी आदर्श नागरिक ' हा पुरस्कार प्रदान करण्यात.तसेच मान्यवरांच्या हस्ते ' प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकाच्या 'मे २३' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.ज्येष्ठ नागरिक अण्णा दादू यमगर यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, संभाजीराजे यांचे पालनपोषण राजमाता जिजाऊ आणि वडील शिवराय यांनी अतिशय भक्कमपणे केलेले होते. प्रचंड बुद्धिमान असलेल्या संभाजीराजांनी संस्कृत मध्ये ग्रंथही लिहिले. महापराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी संभाजी राजांना मोठी साथ दिली.संभाजीराजांनी गोव्यात पोर्तुगीजांचा पराभव करून फोंडा किल्ला वाचवला होता. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही यांचा बिमोड केल्यानंतर  औरंगजेबाला मराठेशाही हातात येईल असे वाटले होते. त्याच बेहोशीमध्ये त्याने संभाजीराजे हाती आल्यानंतर त्यांचा हरप्रकारे छळ केला. बालपणी शिवरायांसह आग्र्यामधून ,नंतर मोगल सुभेदार शहजादा मुअज्जम आणि मोगल सेनापती दिलेरखान यांच्या छावणीतून असे तीन वेळा संभाजीराजे औरंगजेबाच्या हातून निसटून गेले होते. त्याचाही राग औरंगजेबाला होता. संभाजी राजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी दोन दशके संघर्ष केला. औरंगजेबाला पराभूत केले आणि त्याला भिंगार येथेच दफन व्हावे लागले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, शिवाजीराजे, संभाजीराजेनी राजेशाहीतही लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार केला. धर्मनिरपेक्ष पद्धतीची राज्यव्यवस्था स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वी असा प्रगल्भ विचार अमलात आणणे यातच त्यांचे दूरदर्शित्व दिसून येते. त्या आदर्श राज्यपद्धतीतील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतावादी विचारांची जपणूक करणे हेच त्यांना खरी अभिवादन आहे.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या छत्रपती संभाजीराजांचा ऐतिहासिक संघर्ष आणि वर्तमानात निर्माण झालेली आव्हाने यांची अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सांगड घालून ओघावत्या शैलीतील सव्वा तास विवेचन केले. तसेच व त्यांच्या प्रश्नाला - शंकांना उत्तरेही दिली.रामानंदनगर ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मारुती शिरतोडे, भीमराव मोहिते, शिवाजीराव इंगळे, रामचंद्र लाड ,लक्ष्मण सूर्यवंशी ,प्रा.उत्तम सदामते, नागेश मदने, रामचंद्र कोरे, पांडुरंग भाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिम्मतराव मलमे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post