महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म.जोशी यांना " जीवनसाधना " पुरस्कार जाहीर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

       महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखे तर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म.जोशी यांना " जीवनसाधना " पुरस्कार जाहीर झाला.मला मनस्वी आनंद झाला.ह्या अभूतपूर्व आनंददायी सोहळ्याचे आयोजन मसापचे अध्यक्ष श्री. राजनजी लाखे यांनी केले होते.

     कार्यक्रम संपला अन् माझे मन भूतकाळात विसावले.मी पुण्याच्या टिळक प्रशिक्षण महाविद्यालयात M.Ed. करण्यासाठी प्रवेश घेतला होता.तेव्हा आम्हाला शिकवण्यासाठी डॉ. न. म. जोशी सर वर्गात आले की जादू होत असे.शब्दामधून दृश्य निर्माण करण्याची किमया सरांमध्ये आहे.सर्व विद्यार्थी सरांचा प्रत्येक शब्द तल्लीन होऊन ऐकत असत व कानात साठवून ठेवत असत.सर शिकवायचे तेव्हा असे वाटायचे," वर्गाचे मखर झाले आहे व साक्षात श्री शारदा देवी प्रगट झाली आहे.अशा वर्गात अध्यापनाचीही आनंदयात्रा आम्हाला पहायला मिळायची हे मात्र खरे ".मधली सुट्टी झाली की अनेक विद्यार्थी त्यांच्याभोवती गराडा घालत असत.तेव्हा त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम पाहून मला त्यांच्यामध्ये एक शिल्पकार दडलेला दिसला.त्यांनी विद्यार्थीवर्गाला योग्य मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांना मानसिक व आर्थिक बळ दिले.यामागे हेतू एकच आजचा तरुण हा आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे. ज्ञानार्जनाचे व्रत घेतलेल्या या शिल्पकाराने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले.आज ते समाजात यशवंत व कीर्तिवंत म्हणून मान मिळवत आहेत.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच देशाचा एक नागरिक म्हणून माणुसकीचे धडे दिले.ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांविषयी सतत तळमळीने विचारपूस करून त्यांना सर्वतोपरी मदत केली.

               सरांनी एकूण ७० पुस्तकांचे लेखन केले आहे.त्यापैकी २७ पुस्तके मुलांसाठी लिहिली ही त्यांची साहित्य क्षेत्रातील भरारी आहे.मुलांसाठी त्यांनी चरित्रकथा,बोधकथा,मूल्यकथा, एकांकिका,बालनाट्य लिहिली.अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत.प्रौढांसाठी त्यांनी " प्रेषित ", " निःस्पृह " आणि " निष्प्रेम " या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांचा " पत्रकारांचा शिक्षण _ विचार " हा ग्रंथ खूप चर्चेत राहिला.त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत.अनेक ठिकाणी सर व्याख्याने देतात तेव्हा श्रोत्यांचे कान धन्य होतात.मुलांसाठी कथाकथन करण्यात त्यांचा हातखंडा आहे." जेव्हा देव अवतरतात ", " एक आठवण कर्मवीरांची "," चार साथीदार " ( एक छोटा क्रांतिकारक हेमू कलानी याची चित्तथरारक धगधगती कथा )अशा अनेक आठवणी सरांकडून पुन्हा पुन्हा ऐकावयास आवडतात.कान तृप्त होतात.

                   सरांचा जन्म ११ जानेवारी १९३६ रोजी पाटण तालुक्यातील गारवडे या सातारा जिल्ह्यातील छोट्या दुर्गम गावी झाला.सरांचे नाव नरसिंह महादेव जोशी असे आहे.पोटासाठी व शिक्षणासाठी त्यांना भटकंती करावी लागली.त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावातून झाले.त्यांनी आवडीने शिक्षण क्षेत्र निवडले. हयातभर त्यात रममाण होऊन कर्म करणे ही एक साधनाच आहे.अशी साधना त्यांनी पाच तपांहून अधिक काळ केली आहे.मराठी,हिंदी, इंग्रजी व सिंधी या चार भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

               थेट अटल बिहारी वाजपेयी,यांच्यापासून अण्णाभाऊ साठे,भीमसेन जोशी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रत्यक्ष भेटींचे योग सरांना जीवनामध्ये आलेले आहेत. खरंच असे भाग्य अगदी थोड्या लोकांनाच लाभते.

               २०२१ साली सरांना लागोपाठ तीन जीवनगौरव पुरस्कार मिळाले.१.अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचा, २.सावित्री बाई फुले,पुणे विद्यापीठाचा, ३.महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे यांचा.एकच वर्षात जीवनगौरव पुरस्काराची हॅट्रिक झाली.सरांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला मराठी भाषा संवर्धनासाठी तीन लाख रुपयांची देणगी दिलेली आहे.एका व्रतस्थ सामान्य शिक्षकाने एवढी मोठी देणगी देणं,यातूनच त्यांची मराठी भाषेवरील भक्ती दिसून येते.सरांनी २००३ साली निगडी ( पुणे ) येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.वयाच्या ८८ व्या वर्षी कोणत्याही कार्यक्रमात खणखणीत आवाजात सर त्यांचे विचार मांडतात तेव्हा सभा मंडप प्रसन्न होऊन श्रोते मंत्रमुग्ध होतात. सरांना पद्मश्री मा.गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते " जीवनसाधना " पुरस्कार मिळाला.या दिमाखदार सोहळ्याचे मला साक्षीदार होता आले,म्हणून मी स्वतः ला  खूप भाग्यवान समजते.    

  सौ. सीमा पोपटराव चव्हाण

     वाळवेकर नगर, पुणे.

     मो. नंबर : ७५८८२८०९०९

Post a Comment

Previous Post Next Post