पुण्याच्या व्हायोलिन वादक बालकलाकारांनी जर्मनीत प्रेक्षकांना जिंकले !



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, अभंग, देशभक्तीची गीते, भावगीत, भक्तीगीत, हिंदी चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित जुनी गाणी, महाराष्ट्राची लावणी आणि गुजरात, बंगाल, काश्मीर, राजस्थान, गोवा या राज्यांमधील लोकसंगीत हे सारे व्हायोलिनवर चक्क जर्मन देशात सादर करून पुण्याच्या ‘स्वरस्वप्न’च्या बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. १३-१४ वर्षाची १० मुले-मुली व २० वर्षांची २ मुले यांच्या या  व्हायोलिन वाद्यवृंदाने जर्मनीतील स्टुटगार्ट आणि म्युनिक येथे बहारदार कार्यक्रम सादर केले. व्हायोलिन गुरु स्वप्ना दातार यांच्याकडे हे बालकलाकार व्हायोलिनचे शिक्षण घेत आहेत.  


जर्मनीतील स्टुटगार्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन व म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ यांच्या निमंत्रणावरून तेथे हे बालकलाकार गेले होते. स्टुटगार्ट येथील संगीत विद्यालयाच्या श्रीमती स्टेफी ब्रॉयनिंग यांच्या ‘दि टेलीमॅनर’ या ऑर्केस्ट्रा वाद्यवृंदाने ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदासमवेत आपली कला सादर केली.  मोझार्ट या विश्वविख्यात व्हायोलिन वादकाच्या नावाने स्टुटगार्ट येथे उभारण्यात आलेल्या भव्य मोझार्ट अॅम्फीथिएटरमध्ये मोझार्ट यांची जगप्रसिद्ध ‘टर्किश मार्च’ ही धून स्वरस्वप्नच्या बालचमुंनी सादर करून सर्वांना अचंबित केले व टाळ्या वसूल केल्या. स्टुटगार्टमध्ये सौ. व श्री. सारोळकर व स्टुटगार्ट महाराष्ट्र  मंडळाचे  महेंद्रकर  यांनी  याचे आयोजन केले होते. म्युनिकमध्ये म्युनिक महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष  योगेश  वाडकर  आणि सहकाऱ्यांनी उत्तम आयोजन केले. म्युनिक येथे गार्शिगचे  महापौर जर्गन आशेरल आणि  म्युनिकचे महापौर एचिंग सेबास्टियन थालेर हे आवर्जून उपस्थित होते.   


‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदात १२ लहान व्हायोलिन वादक मुले-मुली, २ तबला वादक, १ पखवाज वादक, १ साईड रिदम, २ ड्रम वादक यांचा समावेश होता. स्वप्ना दातार यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन हिंदी व इंग्रेजीतून केले. दि. २९ एप्रिल रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट आणि दि. १ मे या महाराष्ट्र दिनी जर्मनीतील म्युनिक येथे या वाद्यवृंदाने आपली कला सादर केली. या दोन्ही ठिकाणी भव्य अॅम्फीथिएटरमध्ये झालेले कार्यक्रम हाउसफुल झाले होते. ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा 2 तासांचा हा कार्यक्रम दोन भागात सादर करण्यात आला. ‘संधीकाली या अशा’, ‘असा बेभान हा वारा’, ‘सावरे’ अशा अनेक गाण्यांना वन्समोअर मिळाले. देशात अनेक ठिकाणी ‘स्वरस्वप्न’ वाद्यवृंदाचा बाल कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. नुकताच हा वाद्यवृंद पुण्यात परतला अशी माहिती ‘स्वरस्वप्न’च्या संचालिका स्वप्ना दातार यांनी दिली.


स्वप्ना दातार

9359662567


प्रवीण प्र. वाळिंबे

९८२२४५४२३४

७३८७००२०९७ 




Post a Comment

Previous Post Next Post