पुणे : फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका फाईव्ह स्टार  हॉटेल मध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला . या कारवाईत चार परप्रांतीय तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी तीन दलालांना अटक करण्यात आली आहे.

ताब्यात घेतलेल्या तरुणी दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. समाजविघातक असलेले हे दलाल समाजमाध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमधील खोली घेऊन दलाल परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घ्यायचे. ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने सर्व व्यवहार करत होते. ऑनलाइन वेश्या व्यवसायाची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचार्यांना मिळाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधला आणि सापळा लावला. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये दलालांनी दोन खोल्या आरक्षित करुन ठेवल्या होत्या. या ठिकाणी दोन तरुणींना बोलविण्यात आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, येरवड्यातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातून तीन दलाल तसेच दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post