न्हावा शेवा बंदरात २४ कोटींच्या परदेशी सिगारेट पकडल्या !



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

मुंबई- न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून ५ जणांना महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डी. आर्. आय. च्या ) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या अवैध आयातींवर पाळत ठेवली होती.

संबंधित ४० फूट कंटेनर संमतीसाठी 'अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन'मध्ये उतरवला जाणार असल्याची माहिती मिळाली होती; परंतु तो एका खासगी गोदामामध्ये नेण्यात आला. या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणार्‍या अधिकार्‍यांना हे संशयास्पद वाटल्याने आणि त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. संपूर्ण कंटेनरमध्ये एस्से, मॉन्ड, डनहिल आणि गुडंग गरम या विदेशी आस्थापनांच्या सिगारेट होत्या. या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे. या खासगी गोदामात सिगारेट काढून त्यात कागदपत्रानुसार असणार्‍या वस्तू भरण्यात येणार होत्या.

या कारवाईत एकूण १ कोटी २० लाख सिगारेट जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. गेल्या २ मासांत ३० कोटी रुपयांच्या सिगारेट न्हावा शेवा बंदरातून पकडण्यात आल्या होत्या; पण त्यानंतरही या तस्करीत घट झालेली नाही. दुबईतून मोठ्या प्रमाणात सिगारेटची भारतात तस्करी केली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post