महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राज्य व राष्ट्रीय पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,साहित्यिक, कला, क्रीडा व कामगार क्षेत्रात तसेच समजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरतपणे कार्य करीत असलेल्या राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य अधिवेशन सोमवार दि. ८ मे २०२३ रोजी सकाळी १०:०० ते सायं. ६:०० वाजेपर्यंत राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सुरेश केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदर राज्य अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री मा. ना. सुरेश (भाऊ) खाडे, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, मुंबईचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्रधान सचिव कामगार विनिता वेद सिंघल, कल्याण आयुक्त म. का. क. मंडळ, मुंबई चे रविराज इळवे, विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त म. का. क. मंडळ, पुणेचे समाधान भोसले, सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूरचे विशाल घोडके आदी. प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशनास महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विभागीय सदस्य तसेच ५०० हून अधिक प्रमुख गुणवंत कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सद्यपरिस्थिती मधील गुणवंत कामगारांचे ज्वलंत प्रश्न यावर या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार असून भविष्यामध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठीची काय करता येईल यावर यावेळी सखोल चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर गुणवंत कामगारांचे कर्तव्ये व समाजाप्रती जबाबदारी, गुणवंत कामगारांच्या समस्या,
भविष्यकालीन उपक्रम, शासनाच्या विविध उपक्रमात गुणवंत कामगारांचा सहभाग अशा विविध विषयांवरही चर्चा होणार यावेळी चर्चा केली जाणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व गुणवंत कामगारांना गौरवचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र, गौरवअंक व कोल्हापूरी फेटा बांधून सन्मानित करण्यात येणार असून असोसिएशनच्या वतीने आजअखेर राज्य व देश पातळीवर केलेल्या सर्व पत्रव्यवहारांबाबत सर्वांना माहिती दिली जाणार आहे.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन ही सर्व क्षेत्रातील कामगारांच्या उन्नती, प्रगती व न्याय हक्क मागण्यांकरीता कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पत्रकार परिषदेत राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर, महादेव चक्के, भगवान माने, शिवाजी चौगुले, अनिता काळे, संजय सासणे, संभाजी थोरात आदींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.