कन्यादान योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करा -सहायक आयुक्त विशाल लोंढे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : (जिमाका): जिल्ह्यामधील गरजू व पात्र अनुसूचित जाती (नवबौद्धासह), विमुक्त जाती, भटक्या जमाती, (धनगर वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या दापत्यांनी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेवून कन्यादान योजेनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याकरिता सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांनी पुढे येवून सामुदायिक विवाह आयोजित करुन या योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौद्धांसह विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील, जाती- जमातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये विवाह सोहळ्यामधील अनाठायी खर्च टाळून सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवून विवाहाचा खर्च कमी व्हावा व मागासवर्गीय कुटुंबे सामुहिक सोहळ्याकडे आकर्षित व्हावीत आणि यासाठी विविध संस्था पुढे येण्यासाठी सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावरुन लाभार्थी दाम्पत्य व संस्था यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना सद्यस्थितीत सुरु आहे.

अर्ज करण्यासाठी वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असले पाहिजेत, नवदाम्पत्यांसाठी वधू, वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह), विमुक्त जाती (धनगर वंजारीसह), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावेत. नवदाम्पत्यांसाठी वधू १८ व वराचे वय २१ यापेक्षा कमी असू नये. जातीचा दाखला सक्षम प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेला असावा.वधू, वर यांच्या प्रथम विवाहासाठीच या योजनेचा लाभ देय असेल, बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य, कुटुंबाकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक . तसेच आंतरजातीय विवाह असल्यास शासन निर्णयानुसार जे फायदे आहेत तेही फायदे देय असतील.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर, विचारे माळ, कोल्हापूर संपर्क क्रमांक - 0231-2651318  या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post