श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्यांनी अधिक सजग व्हावे..प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन.



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर ता.१, महाराष्ट्राला सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेच्या लढ्याची आणि समतेची उज्वल परंपरा आहे. त्या आपल्या महाराष्ट्राला आज अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. त्याची सोडवणूक केवळ अस्मिता फुलवत ठेवून,दूराग्रह बाळगून,अथवा इतरांबद्दल द्वेषभावना दाखवून होणार नाही. विकासाची फळे सर्व विभाग आणि त्यातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजेत .

आज महाराष्ट्राला सर्वार्थाने महान बनवण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे .त्यासाठी लोकशक्तीचा रेटा वापरला पाहिजे .तसेच जागतिक कामगार दीन साजरा करत असताना जागतिक संदर्भ लक्षात घेऊन भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्यापासून अनेक व्यक्तींनी आणि विविध कामगार संघटनांनी कामगारांच्या मागण्यांबाबत जो आवाज उठवला तो आज पुन्हा बुलंद करण्याची नितांत गरज आहे. आपल्या श्रमातून संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगार वर्गाने अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर ( गोकुळ) येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक शाहीर सदाशिव निकम यांनी केले. कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रसाद कुलकर्णी यांचे शाल ,श्रीफळ देऊन स्वागत. केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, एकीकडे लोकसंख्येच्या बाबत जगात आपण अव्वल स्थानी आलो असताना त्या लोकसंख्येच्या हाताला काम मिळणे आणि जगण्यासाठी किमान आवश्यक गरजांची पूर्तता करणारी धोरणे आखण्याची गरज आहे. मात्र आज नव्या भांडवलशाही व्यवस्थेत शेतकरी ,कामगार विरोधी कायदे होत आहेत. एका अर्थाने हे माणसांच्या जगण्याच्या हक्कावरचेच आक्रमण आहे.अशावेळी बिघडवण्यापेक्षा घडविण्याकडे आणि तोडफोडीपेक्षा उभारणीकडे लक्ष दिले पाहिजे.तर आणि तरच खऱ्या अर्थाने पुनर्निर्माण व नवनिर्माण होऊ शकते. प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी कामगार चळवळी पुढील आव्हाने आणि महाराष्ट्रा पुढील आव्हानांचा उहापोह केला.

गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, प्रशासन विभाग प्रमुख डी.के.पाटील, हिमांशू कापडिया, कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लक्ष्मण पाटील ,मल्हार पाटील, विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post