गटारी व कचरा स्वच्छतेकडे दुर्लक्ष ; साथीचे आजार फैलावण्याचा धोका
प्रेस मीडिया लाईव्ह
इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.विशेष म्हणजे सुरळीत पाणी पुरवठा,कचरा उठाव व गटारींची स्वच्छता यामध्ये ढिसाळ धोरण दिसत आहे.गटारींची स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी साचून त्याला दुर्गंधी सुटू लागल्याने साथीचे आजार फैलावण्याचा मोठा धोका वाढला आहे.याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्याने शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा,कचरा उठाव,गटारींची स्वच्छता,रस्ते अशा विविध मुलभूत नागरी सुविधा मिळण्याची आशा पल्लवीत झाली होती.पण , महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्याकडून या कामांना म्हणावे तसे प्राधान्य दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यात संबंधित लोकप्रतिनिधी देखील याबाबत गांभीर्य दाखवत नसल्याचे आता लपून राहिलेले नाही.या सा-याचा परिणाम म्हणजे शहरातील मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड देण्याची दुर्देवी वेळ आली आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे , यासाठी देखील महापालिका प्रशासन गांभीर्य दाखवत नसल्याचे नियमित कचरा उठाव व गटारींची स्वच्छता या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षावरुन दिसत आहे.याचेच उदाहरण म्हणजे कुडचेनगर परिसरात तब्बल १५ दिवसातून एकदा गटारींची स्वच्छता करण्याचे चोख कर्तव्य महापालिका प्रशासनाचा संबंधित विभाग बजावत आहे.यातून साथीचे आजार फैलावून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.एकंदरीत , स्वच्छ शहर , सुंदर शहर या योजनेतंर्गत महापालिकेची सुरु असलेली कामे ही केवळ कागदावरच आहेत का ,असा संतप्त सवाल देखील आता नागरिकांतून विचारला जात आहे.
इचलकरंजी महापालिकेला मंजुरी आणून काही नेतेमंडळी या कामाचे श्रेय घेत आहेत.पण , महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या मुलभूत नागरी सुविधा पुरवण्याचा मात्र त्यांना विसर पडला आहे.त्यात महापालिका प्रशासन शहरातील मिळकतधारकांकडून पाणी , घरफाळा व विविध कर वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवत आहे.असे असले तरी नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या कर्तव्यात माञ चुकारपणा दिसत आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने या गलथान कारभारात सुधारणा करुन तातडीने मुलभूत नागरी सुविधा देण्याची कार्यवाही करावी , अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.