प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
"भावगीत, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत... अशा कोणत्याही प्रकारच्या गाण्यातील लताचा आवाज म्हणजे एक दैवी स्वर असतो. एक उच्च दर्जाची अनुभूती या स्वरातून ऐकायला मिळते. आपल्या आवाजाचा हा दर्जा लताबाईंनी अगदी ठरवून नेहमी जपला. त्यामुळेच लौकिकाच्या पार जाणारा आवाज म्हणजे लता असे निश्चितपणे म्हणता येईल" अशा आशयाचे उदगार प्रसिद्ध गायिका व संगीत अभ्यासक मृदुला दाढे जोशी यांनी काढले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 'अमरलता' हा सप्रयोग कार्यक्रम सादर करताना त्या बोलत होत्या. आपल्या अभ्यासपूर्ण कार्यक्रमात त्यांनी लता नावाच्या स्वरसम्राज्ञीच्या वाटचालीचा सुरेल प्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवला.
सुरुवातीला रोटरी प्रांत ३१७०चे पुढील वर्षीचे प्रांतपाल नासिर बोरसादवाला, कोल्हापूर यांनी उदघाटक या नात्याने आपले मनोगत व्यक्त केले. "व्याख्यानमालांची परंपरा ही अतिशय महत्त्वाची असून या माध्यमातून एक प्रकारे प्रबोधनाची वैचारिक चळवळ जपली जाते. आणि ही चळवळ चालू राहण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता आहे" असे उदगार त्यांनी काढले. त्यापूर्वी त्यांच्या हस्ते तसेच मृदुला दाढे जोशी, अतुल शहा व अमोल शहा आणि पदाधिकारी यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मर्दा फौंडेशनचे कार्यकारी विश्वस्त शामसुंदर मर्दा यांच्या हस्ते सर्वांना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अतुल शहा यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. वक्त्यांचा परिचय संजय होगाडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संतोष आबाळे यांनी केले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने ही ४५ वी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
मोगरा फुलला या ज्ञानेश्वरांच्या अप्रतिम रचनेने मृदुलाताईंनी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि मोगऱ्याच्या गंधाप्रमाणे हा कार्यक्रम शेवटपर्यंत खुलत गेला. लताबाईंच्या अत्यंत उच्च व दर्जेदार प्रतिभेचा स्वरपट त्यांनी रसिकांसमोर मांडला. अत्यंत कष्टात घालवलेलं बालपण, उच्च दर्जाचा सुरेलपणा, गाण्यांमधील अनेक हरकती, नायिकेच्या व्यक्तिरेखेप्रमाणे आवाज देणे, अशा विविध घटकांचे एकजीव मिश्रण म्हणजे लताबाई. लता एकच होती आणि एकच असेल कारण आवाजाची नैसर्गिक देणगी असली तरी त्याला रियाज, मेहनत, विचारपूर्वक सादरीकरण आणि त्यासाठी घेतलेले कष्ट व केलेले प्रयोग, यामुळेच त्या अत्युच्च दर्जाला पोहोचल्या. असे प्रतिपादन त्यांनी केले.
आपल्या कार्यक्रमात मृदुलाताईंनी मालवून टाक दीप, लग जा गले, कुछ दिल ने कहा, काटों से खिंच के ए आँचल, पिया तोसे नैना लागे रे, इत्यादी गाणी सादर करून लतादीदींच्या आवाजातील बारकावे रसिकांना सांगितले. प्रेम, आनंद, दुःख, विरह अशा नानाविध भावनांचे सूक्ष्म पदर आणि अनेक छटा लतादीदी कशाप्रकारे गाण्यातून दाखवत असत याची अनेक उदाहरणे मृदुलाताईंनी दिली. चित्रपट संगीताचा गाढा अभ्यास आणि त्याचबरोबर सुरेल गायकी असणाऱ्या मृदुलाताईंनी आपल्या गायनाचा आणि अभ्यासाचा अनुभव रसिकांनाही दिला. श्रोता म्हणून आणि माणूस म्हणूनही आपल्याला उंचीवर जायचं असेल तर दर्जेदार संगीत आवश्यक आहे. म्हणून ही स्वर संस्कृती आपण चिरंतन ठेवायला हवी, असे मृदुलाताई म्हणाल्या.
गाण्यातील स्वल्पविराम, अल्पविराम, भाव, गाण्याची शैली, अशा सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या असतात हे लतादीदींच्या गाण्यांमधून आपणास समजते. त्याचबरोबर उच्चार आणि आवाजाचे पडदे कसे वापरावेत, श्रुती विचार या सर्व गोष्टीही लतादीदींच्या गाण्यातून दिसून येतात. या सर्व घटकांची माहिती मृदुलाताईंनी अनेक गाण्यांच्या सादरीकरणासह दिली. लतादीदींची असंख्य गाणी, त्यांचा अभ्यास, त्यांचे कष्ट, त्यांना असलेली स्वरांची देणगी या सर्वातील सौंदर्य स्थळं आणि त्यांचे महत्त्व मृदुलाताईंनी अत्यंत चांगल्या प्रकारे रसिकांच्या समोर सादर केले.
आपल्या कार्यक्रमाच्या समारोप करताना त्यांनी "अभिरुचीसंपन्न रसिक आणि श्रोते घडविणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ते घडवावे लागतात. तो प्रयत्न अशा उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने करणे आवश्यक आहे" असे मत त्यांनी व्यक्त केले. शेवटी संत मीराबाई यांची 'चाला वाही देस' ही रचना सादर करून आपल्या कार्यक्रमाची भावस्पर्शी सांगता त्यांनी केली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.