भारताच्या संकल्पनेचा जो मूळ व्यापक गाभा विकसित केला आहे त्यावर आधारितच वाटचाल केली पाहिजे -ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार-



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१० समता, बंधुता ,सर्व समावेशकता या मूल्यांना बाजूला करून बहुसंख्यांकवादाची प्रतीके आणि अस्मिता आज चुकीच्या पद्धतीने सादर केली जात आहेत. सत्तेच्या राजकारणासाठी त्याचे ध्रुवीकरण व वापर केला जात आहे. राष्ट्र हे भूतकाळाचा भ्रम नव्हे तर भविष्याचे चिंतन असते.कोणत्या परंपरांचे वहन करायचे हे  जबाबदारीने ठरवावे लागते.

वर्तमाना कडे आपण कसे बघतो त्यावर आपले भविष्य अवलंबून असते.इतिहासाच्या खुणांचे गौरवीकरण करणे,कृतक नोंदी करणे फार काळ उपयोगी नसते.ब्रिटिशांच्या कूटनीतीने भारताबरोबरच पाकिस्तान निर्माण झाला. पण आज पाकिस्तानची जी अवस्था झाली आहे त्याला कारण तिथल्या शासन व प्रशासन व्यवस्थेने बहुसंख्यांकवादाचे धोरण स्वीकारले.ते राबविण्याचा प्रयत्न केला.त्यातून कट्टर धर्मवाद्यांना संरक्षण मिळाले व दहशतवाद फोफावला. यापासून बोध घेऊन आपलीही तशी अवस्था व्हायची नसेल तर वेळीच या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्वातंत्र्यलढा आणि त्यातून तयार झालेली राज्यघटना यांनी भारताच्या संकल्पनेचा जो मूळ व्यापक गाभा विकसित केला आहे त्यावर आधारितच वाटचाल केली पाहिजे,असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या सेहेचाळीसाव्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ' भारताची संकल्पना ' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर होते.

प्रारंभी राहुल खंजिरे  यांनी पाहुण्यांचे शाल,ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत केले.प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून प्रबोधिनीची गेल्या सेहेचाळीस वर्षाची वाटचाल आणि पुढील वाटचालीची दिशा विषद केली.तसेच पाहुण्यांची ओळख करून दिली व या विषयाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने श्रीराम पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला..

श्रीराम पवार म्हणाले, इंग्रज आल्यावर इंग्रजी शिक्षणाने प्रगत जगाचा आपल्याला परिचय झाला.अनेक विचारवंतांच्या वैचारिक घुसळणीतून आधुनिक भारताची संकल्पना अधिक प्रगल्भ झाली.भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी नवभारताची संकल्पना विकसित करण्यात मोठे योगदान दिले. नेहरूंच्या प्रारूपातून देशाची उभारणी झाली.नव्वद च्या दशकातील मंडल कमंडल वादात भारताच्या संकलपनेला तडे गेले. धर्मनिपेक्षतेच्या मुल्याची खिल्ली उडवून धर्मराष्ट्र हा पर्याय दिला गेला.पण धर्म संस्था व राज्य संस्था वेगवेगळ्या आहेत,असल्या पाहिजेत .आज त्याची सत्तेसाठी बेमालूम मिसळ सुरू आहे.एक पक्ष,एक नेता अतीबलिष्ठ होत जाण हे भारताच्या सर्वसमावेशी संकल्पनेपुढील मोठे आव्हान आहे.धर्मावर आधारित राजकारण नेहमीच मूठभरांचे हितसंबंध जपणारे असते.मुस्लिम व हिंदु दोन्ही मूलतत्ववादी धोकादायकच आहेत.मूलतत्त्ववादातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेदखल केले जातात. त्याची चर्चाही केली जात नसते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अशा वातावरणात सर्वार्थाने भरडला जातो.

श्रीराम पवार पुढे म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात जे नव्हते ती मंडळी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्यांचे योगदान नाकारत आहेत.भारतीय इतिहास, समाज,साहित्य, कला आदी सर्व क्षेत्रांनी सर्वसमावेशक भारताची संकल्पना मजबूत केली आहे. पण आज ती नाकारून बहुसंख्यांक वादाचे राजकारण पुढे रेटले जातआहे. दिशा भरकटली की मोठा संभ्रम निर्माण होतो. आजची संभ्रमित अवस्था दूर करायची असेल तर जनतेनेच भारताच्या संकल्पनेतील एकत्व भावना जपली पाहिजे. श्रीराम पवार यांनी आपल्या सव्वा तासाच्या मांडणीमध्ये प्राचीन काळ ,मुघल काळ, वसाहतकाळ, स्वातंत्र्य आंदोलन आणि त्यानंतरच्या गेल्या  वर्षातील वाटचालीचा आढावा घेत भारताच्या संकल्पनेचे सखोल विश्लेषण केले.अलीकडे निर्माण झालेल्या आव्हानांना नेमकेपणाने समजून घेऊन त्याला लोकपातळीवर वैचारिक विरोध केला पाहिजे. कारण आपल्याला हा समर्थ देश टिकवायचा आहे व त्याला सर्वार्थाने पुढे न्यायचे आहे हे स्पष्ट केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉक्टर अशोक चौसाळकर म्हणाले, भारताची संकल्पना ही अतिशय व्यापक आहे.पण त्याला तडे देण्यासाठी अखंड भारताची संकल्पना मांडून आक्रमक राष्ट्रवाद दिंबवण्याचा येथे प्रयत्न झाला. फोडा व राज्य करा ही इंग्रजांची नीती आजच्या लोकशाही राज्यपद्धतीची वापरली जात आहे. फॅसिस्ट शक्तींनी जर्मनी, इटली, जपानचे जे केले ते इथे होऊ द्यायचे नसेल तर भारताच्या संकल्पनेचा मूळ गाभा प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. कारण फुटीची आणि दुहीची प्रक्रिया झिरपत जात असते आणि नंतर ती फार त्रासदायक ठरते.चौदा टक्के लोकसंख्या असलेल्या समूहाला निर्णय प्रक्रियेतून वगळणे ही लोकशाहीची विटंबना ठरते. त्यांचा राजकीय सहभाग नाकारणे, मुघल काळापासून डार्विन पर्यंतचा अभ्यासक्रम वगळणे , इतिहास आणि विज्ञान यामध्ये बदल करणे

हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. या अडाणीपणामुळे पुढच्या पिढ्यांचे आपण प्रचंड नुकसान करत आहोत. अशावेळी भारताची उदात्त संकल्पना स्वीकारणे व ती विकसित करणे आपले कर्तव्य आहे. या व्याख्यानास प्रा. डॉ.भारती पाटील, प्प्राचार्या डॉ.त्रिशाला कदम, जयकुमार कोले,विठ्ठल चोपडे,राजन उरूणकर,प्रा.रमेश लवटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले.


( फोटो : समाजवादी प्रबोधिनीच्या ४६ व्या वर्धापन दिनी ' भारताची संकल्पना'या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार,मंचावर प्रसाद कुलकर्णी प्रा.डॉ. अशोक चौसाळकर आणि दशरथ पारेकर )

Post a Comment

Previous Post Next Post