नागरिकांपासून शासन आणि प्रशासनातील सगळ्यांना निर्भय करण्याची गरज आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ७, 'इडी आप निर्भय बनो, सबके उपर कारवाई करो ' असा नारा आज इडीच्या कार्यालया समोर देण्याची गरज आहे. कारण इडी, सीबीआय,निवडणूक आयोग या सारख्या साऱ्या स्वायत्त संस्था आपल कर्तव्य विसरत चालल्या आहेत. सत्तेच्या दबावात येऊन सोयी नुसार कारवाई करत आहेत.
जनतेचे मूलभूत जीवन मरणाचे प्रश्न तीव्र होत असताना सत्ताधारी बहुसंख्यंकवादाच्या भ्रामक खेळात सर्वसामान्य जनतेला गुंतवून टाकत आहेत. त्यातून संविधानिक मूल्यांची मोडतोड होत आहे. आणि सर्वसामान्य माणूस एका भीतीच्या छायेखाली वावरत आहे. पण या हुकूमशाहीच्या विरोधात एक अंडर करंट काम करतो आहे.तो संघटित केला पाहिजे.यासाठी महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा या शुरत्वाच्या तत्त्वाचा अवलंब करून निर्भयपणे आंदोलन संघटित करण्याची गरज आहे. त्याद्वारे नागरिकांपासून शासन आणि प्रशासनातील सगळ्यांना निर्भय करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचा एकत्रित मंच म्हणजे 'निर्भय बनो!' .या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी मध्ये ' निर्भय बनो 'या अभियानाच्या बैठकीत बोलत होते.
अध्यक्षस्थानी वीज तज्ञ प्रताप होगाडे होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या बैठकी मागील भूमिका स्पष्ट केली. जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रारंभी ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी यांना आदरांजली वाढण्यात आली. या बैठकीचे आयोजन इचलकरंजी व परिसरातील सर्व संविधानवादी राजकीय पक्ष,संस्था, संघटना यांच्या वतीने आणि समाजवादी प्रबोधिनीच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,आज देशात अघोषित आणिबाणी आहे. स्वतंत्र विचार करणाऱ्या लोकांवर बंधनं लादली जात आहेत. दुसरीकडे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवला जात आहे. देशात एकच पक्ष आणि एकच नेता असे बिंबविण्याची हुकूमशाहीसदृश्य वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य जनता शेतीमालाच्या हमीभावापासून औषध आणि बियाणे, वीज दरापर्यंत शेतकरी सर्वत्र महागाईचा सामना करत आहेत. विकासाचं गुलाबी चित्र मांडलं जातं पण दुसरीकडे बेरोजगारी वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे महागाई दररोज वाढतच आहे. पुलवामात जवान मारले गेले आणि त्याचं राजकारण झालं. धर्माच्या नावावर देश विभागला जात आहे. तर अदानीच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी कोणाचे आले असा प्रश्न विचारला म्हणून विरोधी पक्ष नेत्याची खासदारकी काढून घेण्यात आली. हे सारे सुदृढ संसदीय लोकशाहीचे लक्षण नाही.
डॉ. चौधरी पुढे म्हणाले, आज नागरिकांचा आवाज दडपला जात आहे. आंदोलनं संपवली जात आहेत. कामगार व शेतकरी विरोधी कायदे केले जात आहेत.आपल्या घरात येणाऱ्या गॅस सिलेंडरचा दर काय असावा आणि पाणी नियमित व वेळेवर मिळावे की नाही हे जर राजकारण ठरवत असेल तर आम्ही राजकारणापासून दूर आहोत ही भूमिका अत्यंत चुकीची ठरते.अशा परिस्थितीत नागरिक म्हणून आपण हातावर हात देऊन बसलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.
डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या मांडणीनंतर प्रा.अशोक कांबळे,सुनील बारवाडे,इस्माईल समडोळे,डॉ.रवींद्र कोठारी,डॉ.राजेंद्र कुंभार, भाऊसाहेब कसबे, जीवन कोळी, बाबासाहेब कवठेकर ,पुरंदर पाटील,प्रकाश खांडेकर, स्वानंद कुलकर्णी ,राजन मुठाणे ,पवनकुमार चौगुले, तुकाराम अपराध, राहुल खरे ,डॉ.संजय पुजारी आधी अनेकांनी चर्चेत सहभाग घेतला. आणि सद्यस्थितीत अशा प्रकारच्या निर्भय बनो मंचाची गरज व्यक्त केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना वीजतज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या संविधान विरोधी वर्तन व्यवहाराविरुद्ध एक व्यापक भूमिका घेऊन सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन छेडण्याची गरज आहे. निर्भय बनो आंदोलनामुळे अनेक दाबले गेलेले आणि दबलेले आवाज आपल्यात सामील होतील. हे आंदोलन अधिक गतिशील करण्यासाठी आपण सर्वांजण सहभागी होऊया.त्याचे लोक चळवळीत रूपांतर करूया. यासाठीचा एक व्यापक मेळावा इचलकरंजी मध्ये आपण लवकरच आयोजित करू. या बैठकीस शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, राहुल खंजिरे ,सयाजी चव्हाण,अहमद मुजावर,अभिजीत पटवा, डॉ.चिदानंद आवळेकर ,सदा मलाबादे,संजय होगाडे,डी.एस. डोणे ,विकास चौगुले,सुनील बारवाडे, भरमा कांबळे, नुरुद्दिन काजी, राजू कोन्नुर,प्राचार्य ए.बी.पाटील,बाबासाहेब नदाफ,गणपती शिंदे,प्रा. शांताराम कांबळे,प्रा.रमेश लवटे,अन्वर पटेल,एफ. वाय. कुंभोजकर,संजय कुलकर्णी,रावसाहेब आलासे,राजू भडंगे, डॉ.तुषार घाटगे, बाळ देवधर,जगदीश काबरे, सुवर्णा कानडे ,मंगला माने, वैभवी आढाव, मुमताज माने, सावित्री हजारे,अनिल होगाडे, मुर्तजा पठाण, किरण कटके, मिलिंद कोले, गोपीकिशन दायमा, परीसा बिरनाळे,गजानन खेतमर आदी विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.