प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
दिल्लीत चालू असलेल्या कुस्तीगीर महिलांच्या न्याय हक्काच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त करीत संविधान परिवाराच्या कार्यकर्त्यांनी आज बुधवारी प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले यांना निवेदन सादर केले.
यावेळी जन आंदोलनांचे राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर म्हणाले, " कुस्ती खेळाडूंचा हा लढा आत्मसन्मान आणि न्यायासाठी असून तमाम नागरिकांनी संस्था- संघटनांनी त्याला पाठिंबा द्यावा. तसेच खेळाडूंवरील अन्यायाचा निषेध शक्य त्या प्रकारे आणि शक्य त्या माध्यमातून सर्व देशभर नोंदवला जात आहे. या प्रकरणाची न्याय्य चौकशी होण्याकरिता ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरीत अटक करुन त्यांना सर्व संविधानिक पदांवरून हटवावे ,अशी मागणीही त्यांनी केली.
सदर निवेदनात म्हटले आहे की , भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांना त्वरीत अटक करा आणि त्यांचे सर्व राजकीय व सरकारी पदभार काढून घ्यावा.हरियाणातील भाजपा सरकारचे मंत्री संदीप सिंग यांचे मंत्रीपद रद्द करून त्यांना अटक करावी.आंदोलक महिला कुस्तीगीरांना संरक्षण द्यावे.कायद्याच्या अखत्यारित न्याय्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वेळेच्या मर्यादेत चौकशी करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करावे.आंदोलक कुस्तीगीर व पत्रकारांविरुद्ध बळाचा वापर करणारे पोलिस अधिकारी आणि संबंधित पोलिस उपायुक्तांवर कारवाई करावी.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा नागरिकांचा अधिकार असून या अधिकाराचा आदर करावा. म्हणजे आत्ताच्या संदर्भात, दिल्लीतील निषेध सभेच्या जागी वीजपुरवठा सुरू करावा , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्वांना संरक्षण द्यावे.सर्व आरोपांचा तपास सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली करावा ,अशा विविध मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी रोहित दळवी, स्नेहल माळी, अशोक वरुटे, अमोल पाटील, नम्रता कांबळे, दिग्विजय चौगुले, दामोदर कोळी, उर्मिला कांबळे, ऋतिक बनसोडे, वैभवी आढाव ,साद चांदकोटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.