खाकी वर्दीतील भला माणूस : सुरेश ठाणेकर



प्रेस मीडिया लाईव्ह :

आपले काम कर्तव्य भावनेने चोखपणे बजावले की, त्यातून मिळणारे समाधान हे देवपूजेसारखे आत्मीय सुख देणारे असते.खरंतर ,

करम तेरे अच्छे है तो

किस्मत तेरी दासी है ,

नियत तेरी साफ है तो

घरमें मथुरा काशी है !

हे ज्याला समजलं त्यासारखा खरा सुखी माणूस नसावा.हे पोलिस खात्यात कार्यरत राहून अगदी प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनेने जनतेची सेवा करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री.सुरेश भागवत ठाणेकर यांच्या आजपर्यंतच्या निर्मळ जीवन वाटचालीकडे पाहून 

मनोनन पटते.शाहूवाडी तालुक्यातील सरुड गांवचे असणारे श्री.सुरेश ठाणेकर यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.पण , आई - वडीलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारामुळे ते अनेक अडचणींवर मोठ्या जिद्दीने मात करुन पोलिस खात्यात काॅन्स्टेबल म्हणून रुजू झाले.सदरक्षणाय , खलनिग्रहणाय,हे पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य सार्थ ठरावे ,अशीच त्यांची प्रामाणिक व धाडसी कार्यपध्दत राहिली आहे.त्यामुळेच त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांचे अपंग वडील कै.भागवत ठाणेकर व आई कै.हिराबाई ठाणेकर या दोघांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक चांगले धार्मिक संस्कार करत शिक्षण घेऊन सरकारी नोकरीतून जनतेची सेवा करण्यास प्रोत्साहन दिले.त्यामुळेच

पोलिस खात्यातील नोकरीच्या काळात त्यांनी कोल्हापूर, कुरुंदवाड व इचलकरंजी अशा विविध ठिकाणी

अत्यंत प्रामाणिकपणे 

 सेवा बजावली आहे.यामध्ये

घरातून मिळालेला समृद्ध वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या निष्ठेने व भक्तीने जोपासत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 

आपल्या कर्तव्यातून समाजात शांतता टिकून रहावी , गुन्हेगारांना वचक बसावा आणि सर्वसामान्यांना निर्भयपणे जगता यावे , यासाठीचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आदर्श व्यक्तीमत्वातून सार्थकी जीवनाचे दर्शन घडवणारा ठरला आहे. सरकारी नोकरी म्हणजे अमाप पैसा मिळवणे नव्हेतर जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याची भगवंताने दिलेली ती एक चांगली संधी आहे ,याच भावनेतून कार्यरत राहून त्यांनी आपल्या चांगुलपणाने जीवाभावाची खूप माणसे मिळवली आहेत, आणि हीच माझी आयुष्यभराची सुखाची खरी कमाई आहे,अशीच त्यांची प्रांजळ भावना आहे.खरंतर माणसाचं मोठेपण हे त्याच्या कर्तृत्वातून ठरत असते.यामध्ये आपण समाजाला काय देतो ,यावरुनही जगण्याची श्रीमंती ठरते.म्हणून आपल्याकडे जे काही चांगले असेल ते निरपेक्ष भावनेने समाजाला देत राहणे म्हणजे दातृत्वातून पुण्य मिळवणे असते.हीच जाणीव कधीही न विसरता श्री.सुरेश ठाणेकर यांनी पोलिस खात्यातील कामकाजाच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर हा अन्यायपिडीतांना न्याय मिळवून देतानाच चुकीच्या पद्धतीने निष्पाप नागरिकांना नाहक ञास देणा-यांना चांगलेच वठणीवर आणण्यासाठी केला आहे.म्हणूनच त्यांचे हे वेगळेपण त्यांच्याविषयी मनात आदर निर्माण करणारे ठरले आहे.मुळातच ते निर्व्यसनी असून चुकीच्या कामाला कधीच पाठिशी घालत नाहीत.म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेकजण चांगला माणूस म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत राहून अगदी सुख ,समाधानाने जीवन जगत आहेत.त्यामुळे या कार्यातून त्यांचे मोठेपण आपोआपच सिद्ध होते.पोलिस खात्यातील नोकरी करायची म्हटली की कर्तव्यासाठी कठोर व्हावे लागतेच ,पण आपल्यातील सच्चा माणूस देखील तितकाच जपायचा असतो, हे श्री.सुरेश ठाणेकर यांनी रक्ताच्या नात्याबरोबरच जोडलेली नाती जीवापाड जपून दाखवून दिले आहे.

अनेकांच्या सुख - दु:खात सहभागी होत ,गरजूंच्या मदतीला धावून जात त्यांना सोबतीचा भक्कम आधार देवून

पुढची वाट चालायला मनानं खंबीर करणं हीच त्यांची खरी विठू माऊलीची सेवा आहे. म्हणूनच त्यांच्या रुपाने अनेकांना खाकी वर्दीतील माणुसकीची प्रचिती येते.मागील काही वर्षांपासून ते इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत होते.या काळात त्यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कठोर भूमिका घेतली होती.त्यामुळेच त्यांची ही कर्तव्यनिष्ठा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.यामध्ये त्यांना कायमपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन , प्रोत्साहन व

पत्नी ,मुले व घरातील सर्वांचे

देखील पाठबळ मिळाले आहे.एकंदरीत , आपल्या ३३ वर्षाच्या पोलिस खात्यातील कारकिर्दीत त्यांनी कर्तव्य निष्ठेबरोबरच माणुसकीचा धर्म जोपासून समाजाला आदर्श कार्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.त्यांचे हे प्रामाणिक जनसेवेचे कार्य म्हणजे,

मायबाप विठ्ठला , विठ्ठला

तू माणसामध्ये दडला ,

त्याचीच सेवा करता

माझा माणूस म्हणून घडला ! 

असेच म्हणावे लागेल.असे हे आदर्श व्यक्तिमत्व बुधवार दि. ३१ मे रोजी 

आपल्या पोलिस खात्यातील प्रदिर्घ सेवेतून निवृत्त होत आहे.त्याबद्दल समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहिल आणि यापुढेही त्यांच्या हातून जनसेवेतून भगवंत सेवेचे पुण्यकार्य घडत राहो, यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा आणि त्यांना सुख , समाधान व दीर्घायुष्य लाभो , हीच भगवंतचरणी मनोभावे प्रार्थना!


- किशोर डाके

Post a Comment

Previous Post Next Post