घाणीमुळे साथीच्या आजाराचा फैलाव
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी: प्रतिनिधी
इचलकरंजी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील विविध परिसरात गटारी तुंबून व कचरा साचून डेंग्यू व मलेरिया यासारखे साथीचे आजार फैलावत आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे.यातून स्वच्छतेच्या कामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असल्याचे दिसत आहे.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने तोरणा नगर ,निवारा सहारा वसाहत , शहापूर यासह शहरातील विविध परिसरात गटारींची स्वच्छता व कचरा उठाव कामाला प्राधान्य देवून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी स्वच्छ शहर , इचलकरंजी शहर असा नारा देत महापालिका प्रशासनाने शहरातील विविध परिसरात जोरदार स्वच्छता मोहीम राबवली होती.या मोहिमेला सामाजिक संस्था,संघटना व जागरुक नागरिकांचा देखील चांगले सहकार्य लाभले होते.पण , यामध्ये आता महापालिका प्रशासनाकडून सातत्य न राहिल्याने शहरातील तोरणानगर ,सहारा निवारा वसाहत , गावभाग ,तांबे माळ ,लिंबू चौक ,कुडचे मळा , शहापूर गावभाग यासह विविध ठिकाणच्या परिसरात गटारींची तुंबून व कचरा साचून दुर्गंधी सुटल्याने डेंग्यू , मलेरिया यासारखे साथीचे आजार फैलावत आहेत .त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.यातून स्वच्छतेच्या कामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला असल्याचे दिसत आहे.
याबाबत नागरिकांकडून तक्रार होऊनही याकडे महापालिका प्रशासनाचा संबंधित विभाग म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत असून या ढिसाळ कारभाराबाबतच तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे.नुकताच राज्य शासनाच्या सर्वेक्षणात इचलकरंजी महानगरपालिका ही राज्यात ड वर्गात सर्वोत्कृष्ट ठरली असली तरी सद्यस्थितीला शहरात स्वच्छतेचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.शहरातील विविध परिसरात गटारींची नियमित स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्याने मोठी दुर्गंधी पसरुन डेंग्यू ,मलेरिया सदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत.इतकी गंभीर परिस्थिती उदभवून देखील महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेऊन धन्यता मानत आहे.याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने तोरणा नगर ,निवारा सहारा वसाहत यासह शहरातील विविध परिसरात गटारींची स्वच्छता व कचरा उठाव कामाला प्राधान्य देवून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.