जागतिक कुटुंब दिन


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९०)

सोमवार ता.१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन आहे.हा दिवस युनेस्को च्या वतीने जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो कौटुंबिक शांतता, कुटुंब सदस्यांतील विचारांचे आणि भावनांचे आदानप्रदान करणारा दिवस म्हणून १९९४ पासून 'जागतिक कुटुंब' दिन साजरा करण्यात येतो. 

लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक कार्यकर्तीने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' चळवळीद्वारे एक दशकभर जागतिक कुटुंब दिनाच्या जगभर प्रसार केला.  'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' असा या चळवळीचा उद्देश आहे. ही भूमिका जागतिक पातळीवरील सरकारे, विविध कार्यालये, संस्था यांच्यामार्फत राबवली जावी ही त्यांची अपेक्षा आहे.वैश्‍विक कुटुंबाला जोडणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक, सामाजिक घटकांचा कुटुंबावर पडणारा प्रभाव आणि कुटुंबाविषयी इतर मुद्‌द्‌यांना विशेष प्राधान्य देण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे.जगातल्या प्रत्येक व्यक्तीने हा दिवस साजरा करावा, अहिंसा, शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज, आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी, असा व्यापक उद्देश हा दिवस साजरा करण्यामागचा आहे. एका अर्थाने वसुधैव कुटुंबकम ,जय जगतची व्यापकता या दिनाच्या मागे आहे.

या दिवसाबाबत असेही मत समजमध्यामावर व्यक्त झाले आहे की,पाश्चात्य देशांमध्ये असलेल्या कौटुंबिक व्यवस्थेमुळे त्यांना अशा प्रकारे जागतिक कुटुंब दिवसाचा ठराव आणावा लागला. कुटुंबाचे महत्त्व, कुटुंब व्यवस्था, आपली माणसे याचे अनेक आदर्श आपल्या देशात पाहायला मिळतील. मात्र, सध्याची व्यस्त जीवनशैली लक्षात घेता प्रत्यक्षातल्या भेटीपेक्षा समाजमाध्यमांतली भेट पुष्कळच सोयीची झाली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबुक’, ‘हाइक’ इत्यादी माध्यमांवर किती तरी फॅमिली ग्रुप्स ( कुटुंब समूह )तयार झालेले पाहायला मिळतात. या समूहाचा संस्थापक (एडमिन)  बहुतांश वेळा एखादी किंवा एखादा कुटुंबातला तरुण सदस्यच असतो. कुटुंबातील जमतील तेवढे सगळे सदस्य या ग्रुपमध्ये असतात. आईकडचे, बाबांकडचे, आजी-आजोबांकडचे, फक्त आई-बाबा अन् बहीण-भावंडांचा, थेट नातलग नाहीत पण नातलगांसारख्याच असणाऱ्या फॅमिली फ्रेण्डसंचाही, अशा अनेक प्रकारचे ग्रुप आज पाहायला मिळतात. घरच्याच फॅमिली ग्रुपवर सुप्रभातपासून ते क्लासहून यायला उशीर होईल, अशा दिवसभरातल्या घडामोडींची माहिती करण्यापर्यंत काहीही पोस्ट केले जाते.

जागतिक कुटुंब दिनी ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतात आता लहान कुटुंबाचा ट्रेण्ड निर्माण झाला आहे. चार वर्षांपूर्वी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून  राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अनेक मुद्यांसह कुटुंब नियोजनाचा विषय राष्ट्रभक्तीशी जोडून मांडला होता. लोकसंख्यावाढ हा देशासमोरील एक अव्वल प्रश्न होता व आहे यात शंका नाही. १९ एप्रिल २०२३ पासून तर आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलो. गेल्या काही वर्षात भारतात ‘कुटुंब लहान,सुख महान ‘ ही संकल्पना स्थिरावत चालली आहे.त्यामुळे हा प्रश्न आज देशापुढे आ वासून उभा नाही.प्रश्न अग्रक्रमावर आहे तो काम करण्यायोग्य वयातील लोकसंख्येला रोजगार मिळवून देण्याचा आणि ज्यांना रोजगार आज त्यांचा तो हिरावला जाणार नाही याची काळजी घेण्याचा.

जनगणना विभागामार्फत दरवर्षी अहवाल प्रकाशित होत असतो. अलीकडे पूर्वीसारखे अनेक अहवाल नियमितप्रकाशितच होत नाहीत. हे बरोबर नाही.२०१७ च्या अहवालात भारतात शहरी भागात जन्मदर १.७ तर ग्रामीण भागात २.४  आहे.म्हणजेच भारताचा सरासरी जन्मदर २.१ टक्के आहे.लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हा जन्मदर योग्य असतो असे लोकसंख्याशास्र सांगते.तसेच आज हिंदू धर्मियांचा  जन्मदर २.१३  मुस्लिम धर्मियांचा जन्मदर २.६२ आहे.साक्षरता वाढणे,महागाई वाढणे, कुटुंबनियोजनाची साधने वाढणे, रोजगार घटणे,शिक्षणापासून आरोग्यापर्यंतच्या सेवांचे खाजगीकरण होणे व त्या महाग होणे अशा अनेक कारणांनी जन्मदर आपोआप घटत जातो हे शास्त्रीय सत्य आहे.गेल्या काही दशकात भारतात जनगणनांचे अहवाल दुर्लक्षित करून,त्यातील सत्य नाकारून  लोकसंख्यावाढीची अतिशय चुकीची कारणे पद्धतशीरपणे  पुढे आणली जात आहेत.त्याआधारे जातीय व धार्मिक भ्रम आणि विद्वेषही पसरवला जात आहे.मात्र आकडेवारीने भारतात छोटे कुटुंब ही संकल्पना स्थिरावत आहे,आणि त्यात सर्व धर्मियांचे योगदान जवळजवळ सारखेच आहे हे स्पष्ट केलेलेआहे हे दुर्लक्षून चालणार नाही.

लोकसंख्यावाढीचा संबंध राष्ट्रभक्ती अथवा राष्ट्रद्रोहाशी नसतो तर भौतिक परिस्थितीत असतो हे शास्त्रीय सत्य आहे.आता तर जागतिक महासत्तेच्या स्वप्नात मग्न असलेली  अर्थव्यवस्था ढासळत आहे,बेरोजगारीत मोठी वाढ होत आहे,उद्योग – धंदे बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे,शेती व शेतकरी उध्दवस्त होत आहेत, सुलतानी संकटांबरोबरच आस्मानी आपत्तीतही वाढ होत आहे,मानवी विकास निर्देशांकात आपण मागे मागेच चाललो आहोत अशी अनेक अस्वस्थ वर्तमानी  वास्तवे भवताली वावरत आहेत.एकूण करोडो सर्वसामान्य माणसांना जगणेच अवघड झाले आहे. पदावर येऊन नऊ वर्षे झाल्यानंतर तरी मा.पंतप्रधानांनी  यावर भाष्य करण्याची राष्ट्राला अपेक्षा आहे.कारण या वास्तवामुळे लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असणारा आजचा जन्मदरही घटत जाण्याची शक्यता आहे.खरा प्रश्न आहे तो लोकसंख्येला सुखाचे जगणे देणारी धोरणे आपण राबविणार की नाही याचा.

देशाचा आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय विकास करणारी धोरणे आखण्याची नितांत अग्रक्रमी गरज आहे.मती गुंग करणारी भावनिक आवाहने सातत्याने करत राहून,देशभक्ती व देशद्रोही याची सोयीनुसार प्रमाणपत्रे वाटून देशात सुबत्ता येत नसते हे वैश्विक सत्य आहे. भारत हेच आपले एक कुटुंब आहे,या कुटुंबातील प्रत्येकाला सन्मानाने,आनंदाने जगण्याचा हक्क आहे.ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून तशी धोरणे आखणे व त्याची अंमलबजावणी करणे ही या देशाची अग्रक्रमाची गरज आहे.

 ————————

 (लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post