प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानासाठी बहुविध प्रकारचे काम केले.कृषी औद्योगिक प्रगतीची कास धरून त्यांनी आपले राज्य एक आदर्श राज्य बनवले. सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी महाराज आयुष्यभर झटले.सत्ता व संपत्तीचा लोकोद्धारासाठी वापर करण्याची तळमळ आणि विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्यासाठी सर्व पावले उचलण्याची क्षमता अशा अनेक गुणांनी राजर्षी शाहूंचे व्यक्तिमत्व समृद्ध बनले होते. राजांचा तो आदर्श आज लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. तर आणि तरच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची प्रस्थापना होऊन देशाचा सर्वार्थाने विकास होईल,असे मत वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी व्यक्त केले.ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृतिदिनी अभिवादन करताना ' कृतज्ञता पर्व वंदन लोकराजाला' या कार्यक्रमात बोलत होते.
समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला प्रा. रमेश लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर शंभर सेकंद स्तब्धता पाळून शाहू राजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसाद कुलकर्णी, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी,स्वरा पिसे,किरण कुलकर्णी,हेमंत जाधव,विशाल पाटील आदी अनेकजण उपस्थित होते.