प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी: प्रतिनिधी
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंग यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच ब्रिजभूषण सिंग यांच्यावर मोदी सरकारने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंग यांनी देशाच्या अनेक कुस्तीगीर महिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतरमंतरवर अनेक मल्लांनी दि.23 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ते धरणे आंदोलन आजही चालू आहे. मात्र मोदी सरकारने आजूनही ब्रिजभुषण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच या महिला कुस्तीपट्टूंचे म्हणणे सुध्दा ऐकून घेतलेले नाही.विशेष म्हणजे खासदार ब्रिजभुषण सिंग यांच्यावर गुन्हाही दाखल केला नाही.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी या महिला कुस्तीगीरांनी असेच आंदोलन केले होते. त्यावेळी मोदी सरकारकडून या तक्रारीबाबत एका कमिटीचे गठण करण्यात आले होते. मात्र त्या समितीने चौकशीही केली नाही आणि रिपोर्टही दिला नाही, त्या कमिटीवर भाजप आणि ब्रिजभुषण सिंग यांनी दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून या महिला कुस्तीगीरांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला आतापर्यंत सर्वच पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मोदी सरकार आणि योगी सरकार लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून देशभर मोदी सरकार आणि भाजपची स्त्रिया आणि महिलांविषयीची भूमिका जनतेत गेली पाहिजे, एका बाजूला मोदी आणि भाजपवाले म्हणतात "बेटी बचाव-बेटी पढाव"अशी घोषणा करायची आणि उलट बाजूला भाजपचे लोक, आमदार, खासदार, मंत्री मुली आणि महिलावर अन्याय करतात. मात्र त्याबाबत मोदी आणि योगी सरकार कारवाई करत नाही ,असा आरोप आज काॅंग्रेसने मोदी सरकारविरोधात केलेल्या निदर्शनावेळी केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी कुस्तीगीर महिलावर लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपचा खासदार आणि भारतीय कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष ब्रिजभुषण सिंग यांना अटक करावी. भाजपने अशा खासदाराचा राजीनामा घ्यावा. त्यांच्यावर कारवाई करावी , अशी मागणी केली.
यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शशिकांत देसाई, बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खुडे, समीर शिरगांवे,रवि वासुदेव , प्रमोद नेजे,ओंकार आवळकर, सचिन साठे, तोसीफ लाटकर,अशपाक सय्यद, मोहसीन पठाण, प्रवीण फगरे,प्रा. गंगाधर माळी, दिलीप पाटील, राजू किणेकर,अजित मिणेकर अक्षय कांबळे, रॉबिन चंदनशिवे, योगेश कांबळे, आण्णा कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.