प्रेस मीडिया लाईव्ह :
गेवराई | प्रतिनिधी :
गेवराई तालुक्यातील विविध भागात आज दि,२८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आल्याचे विचित्र चित्र पाहायला मिळाले असून शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना बेजार केले आहे.
अवकाळी पावसाने शेत पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने काही भागातील झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणच्या घरांवरचे पत्रे उडाले आहेत. तसेच शेतात जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्याचे छप्पर उडाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवार व शुक्रवार सलग दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील चकलांबा, खळेगाव, माटेगाव, उमापूर, देवपिंपरी, कोमलवाडी, भोजगाव, तसेच तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाडळसिंगी या परिसरात अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, ज्वारी, बाजरी, व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे आहे. फळबागांना आलेली फळे वादळी वाऱ्याने जमीनीवर पडली आहेत. हातातोंडाशी आलेला आलेली पिके पावसाने हिरवली आहेत. शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने झाडे उन्मळून पडली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये व काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार प्रशासनाने केले आहे.