जलसंपत्ती दिना निमित्ताने..

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी 

(९८ ५०८ ३० २९०)

prasad. kulkarni65@gmail.com

२४ एप्रिल हा दिवस 'जलसंपत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. जलसंपत्ती आपण योग्य प्रकारे वापरून पुढच्या पिढीकडे अधिक चांगल्या प्रकारे की सुपूर्द करायची आहे. ती कशीही उधळून टाकत तिची  वाट लावायला ती आपल्या बापजाद्यांची संपत्ती नाही.जलसंपत्तीचे योग्य नियोजन हा आज जागतिक प्रश्न बनलेला आहे. 

जलसंपत्तीचा वापर काटकसरीने व योग्य पद्धतीने करण्याची नितांत गरज आहे.भारतीय हवामान खाते पावसाचे दीर्घकालीन अंदाज  दरवर्षी एप्रिल व जून महिन्यात वर्तवत असते. त्यापैकी एप्रिलचा अंदाज तसा दिलासादायक आहे.  साधारणतः सात जूनला केरळातून  पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू व्हायला अद्याप पावणे दोन महिने अवधी आहे.येते दोन महिने पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. एकीकडे वातावरणातील तप्तता वाढत आहे. तर दुसरीकडे काही भागात पाण्याची लुप्तताही भेडसावत आहे. तसेच जलसंपत्ती दिनानिमित्त गेल्या काही वर्षात अनेकदा महापुराने जो हाहाकार माजवला तोही ध्यानात घेतला पाहिजे.त्यापासून आम्ही काही शिकणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महापूर आला तेथे सरासरीच्या दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस कांही भागात पडला होता हे खरे . पण महापुराची इतरही कारणे होती आणि ती मनुष्यनिर्मित होती. म्ह्णूनच  ती कारणे ओळखून त्यावरची योग्य उपाययोजना या पावसाळ्यात केली पाहिजे.

आपल्याकडे  लहान-मोठ्या धरणांची जास्त असलेली संख्या आणि पाण्याच्या विसर्गाचे चुकीचे नियोजन  हे मुद्दे फार महत्वाचे आहेत.शिवाय ग्लोबल वार्मिंग हे कारण तर आहेच आहे.केंद्रीय जल आयोगाने अनेक वर्षापूर्वी आणि त्यानंतरच्या अनेक अहवालांतूनही  धरणातील पाण्याबाबत काही मार्गदर्शक सूत्रे निश्चित केली आहेत. धरणात पाणी किती साठवून ठेवावे याबाबत जल आयोग म्हणतो धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत ५० टक्के, ३१ ऑगस्टपर्यंत ७७ टक्के आणि १५सप्टेंबर पर्यंत शंभर टक्के पाणी साठवावे. पण हे सूत्र आम्ही न पाळल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात.

अनेकदा टप्प्याटप्प्याने विसर्ग न करता धरणे भरण्यावरच आम्ही भर देतो.वास्तविक जुलैमध्ये पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची शेतीला आवश्यकता नसते .तरीही आम्ही धरणे भरून ठेवतो आणि त्यात सरासरीपेक्षा पाऊस जास्त कोसळल्याने महापूराची समस्या तयार होते हे ध्यानात घेतले पाहिजे. म्हणूनच  धरणातील पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय सूत्र योग्य पद्धतीने अमलात आणले पाहिजे. संकट महापुराचे असो की कोरोनाचे असो ते दैवी, नैसर्गिक  नसते  तर ते फक्त आणि फक्त मानवनिर्मित असते हे हे पक्के ध्यानात घ्यावेच लागेल. आपल्या चुकांची खापरे दुसऱ्यावर फोडण्यात आपण माहीर आहोत .पण आता ते बदलावे लागेल .कारण  ही संकटे माणूस म्हणून असलेल्या  आपल्या अस्तित्वालाच आज आव्हान देत आहेत.अर्थात ही आव्हाने आम्ही आमच्या मस्तीतून,निष्काळजीपणातुन, बेपर्वाईतून ओढवून घेतली आहेत.

आपल्या चुकीच्या विकास नीतीने पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी तीन ऋतू पैकी हिवाळा कमी कमी होत जाऊन पावसाळा व उन्हाळा अधिकाधिक तीव्र होत आहेत.हा इशारा शास्त्रज्ञ गेली दोन-अडीच दशके देत आहेत आणि आपण अनुभवही घेत आहोत. पण आमची अवस्था ‘पण’ लक्षात कोण घेतो ? ‘ अशी मुर्दाड बनली आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण वाढत आहे आणि दुसरीकडे नद्या खोऱ्यांमध्ये आमचे अतिक्रमण वाढले आहे .सर्व कायदेकानून मोडून तोडून आम्ही नदीच्या अंगणात घरे बांधत आहोत. कारखाने उभारत आहोत. ब्लू लाईन ,रेड लाइन चे सारे नियम धाब्यावर बसवत आहोत .नदी जवळील बांधकामांमुळे चार – पाच किलोमीटर अंतरावर पूर  पसरून महापुरात रूपांतरित होतो आहे .नदीची वाळू उपसून गाळ तयार होत आहे. परिणामी नदीची खोली कमी होऊन रुंदी वाढत आहे. नदीची रुंदी म्हणजे पुराची रुंदी वाढत आहे. एरवी आम्ही नदीला ओढ्या – नाल्यापेक्षाही अरुंद जागेची सक्ती केली आहे. ती सक्ती तिने झुगारून दिली कि महापूर येतो .नदीच्या अंगणात आम्ही घर बांधले  तर ती आपल्या गावातल्या घरात घुसल्याशिवाय कशी राहील  ?निसर्ग शिस्तबद्ध असतोच असतो .पण आपण दिवसेंदिवस जास्तीत जास्त बेशिस्त होत आहोत .पूर नियंत्रण रेषेचे उल्लंघन हा एका अर्थाने खुनाचाच गुन्हा मानला पाहिजे.

आपण पाण्याकडे अतिशय गांभीर्याने पाहिले पाहिजे .उत्पत्ती स्थिती आणि लय या जीवसृष्टीच्या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचे महत्त्व मोठे आहे. प्राचीन भारतीय साहित्यात ,वेदवाङ्म्ययात ,पुराणात, संत साहित्यातही पाण्याचे महत्व अधोरेखित केले आहे .”तहान लागली की विहीर खोदायची” ही विकसित झालेली मानवी प्रवृत्ती असली तरी आपल्या पूर्वजांनी मात्र भविष्यात पाणी प्रश्न बिकट होणार याचे भान ठेवून काही मांडणी केलेली आहे.पुराणात सर्वात मोठा राजा म्हणजे मेघराजा, सर्वात मोठा पुत्र गाईचा म्हणजे बैल ,सर्वात मोठा दात नांगराचा असे म्हटले आहे . त्यातून आपले पाणीयुक्त कृषी जीवन अधोरेखित झालेले आहे. बृहदत्संहिते पासून विविध जुन्या ग्रंथात जमिनीखाली पाणी कसे, कुठे लागेल ?त्याबाबतच्या खाणाखुणा काय असतील ?यावर भाष्य केलेले आढळते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह आजच्या जलतज्ञ डॉ. राजेन्द्र सिंह यांच्यापर्यंत अनेकांनी पाणीप्रश्नावर मूलभूत संशोधन केलेले आहे.ते आपण या देशाचा सजग नागरिक म्हणून समजून घेतले पाहिजे.

वर्षभरातील ८७६० तासांसाठी आपल्याला केवळ शंभर तास पडणारा पाऊस पुरवावा लागतो .पण आपल्याकडे ड्रेनेजद्वारेच  ८५ ते ९० टक्के पाणी वाया जात असते .जमिनीवर आणि जमिनीखालीही सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी सक्षम यंत्रणा आम्ही सार्वत्रिक स्वरूपात उभी करू शकलेलो नाही .पाणी प्रश्न हा वास्तविक पाण्याच्या नियोजनाचा काटकसरीचा, पुनरवापराचा ,साठवणुकीचा प्रश्न आहे.

मानवी संस्कृतीचा विचार केला तर ती पाण्याच्या काठीच वाढीस लागलेली आहे .किंबहुना पाणी हा मानवी संस्कृतीचा आधार आहे .म्हणून तर संस्कृतीची ओळख सुद्धा त्या-त्या प्रदेशातील नदीच्या नावानेच करून दिली जाते. इजिप्तची संस्कृती नाईल,इराकची संस्कृती युफ्रेट्स -टायग्रीस मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती सिंधू ,चिनी संस्कृती हाँग हू, धुळे जिल्हा तापी खोरे ,नाशिक म्हणजे गोदावरी ,सांगली म्हणजे कृष्णाकाठ, ही नावे पाणी आणि मानवी संस्कृती यांच्या परस्पर एकसंघ ऋणानुबंधातुन सिद्ध झालेली आहेत. पाण्याच्या काठी वस्ती करणाऱ्या माणसाच्या शरीरात ही पाणी हाच घटक महत्त्वाचा आहे. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण ७० टक्के असते तर रक्तात ८०टक्के, मेंदूत ७५ टक्के, यकृतात ९६ टक्के पाणीच असते .म्हणजे मानवी शरीरातून पाणी काढले तर ८० किलो वजनाचा माणूस केवळ चोवीस किलोचा होईल .इतके महत्व मानवी जीवनात ,मानवी संस्कृतीत पाण्याचे आहे. भारतातील एकूण वीज उत्पादनापैकी २७ टक्के वीज पाण्यापासून तयार होते. म्हणजेच मानवी उत्क्रांतीत,विकासात पाण्याचे महत्व मोठे आहे. ‘पाणी अडवू,पाणी जिरवू,काटकसरीने पाणी वापरू ‘ हा जीवनमंत्र म्हणून स्वीकारला पाहिजे.अन्यथा तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल ही चर्चा चर्चा न राहता ते कृतीतही येऊ शकेल अशी भीती आहे.

जलसंपत्ती दिनी आपण हे गांभीर्याने लक्षात घेऊ.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post