प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ - प्रतिनिधी:
नदीकाठी राहणाऱ्या जनतेच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या महापुराच्या विषयाचे गांभीर्य सरकारला नाही. पुर का वाढतो आहे याचे स्पष्ट उत्तर अजूनही मिळत नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने महापुराचा अभ्यास करण्याची गरज असून त्यानंतर उपाययोजना करता येतील. आंतरराष्ट्रीय आणि आंतर राज्यीय नद्यांचे नियंत्रण करणारी एक समिती असली पाहिजे. कारण राज्या राज्यामध्ये पाणी प्रश्न मोठा होत असून देशातील पाणी पेटायला लागले आहे, असे प्रतिपादन कृषी व जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांनी केले.
श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यामध्ये 'महापूर परिस्थिती व निर्मूलन उपाय' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सुधीर भोंगळे पुढे म्हणाले, धरण सोडून इतर ठिकाणी पडणाऱ्या पाण्याचे मोजमाप कसे करायचे हा प्रश्न सुटलेला नाही. या प्रश्नाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आपण धरणे कमी क्षमतेची बांधली ही आपली सर्वात मोठी चूक होती. त्या संदर्भात आपण अभ्यासच केला नाही आणि पुढचे धोरणही ठरवले नाही. धरणातील पाणी किती भरायचे, कधी भरायचे, याची सूत्रपद्धती निश्चित करण्यात आली असली तरी शासकीय स्तरावर यामध्ये एकवाक्यता नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा फटका बसतो आहे. अलमट्टीच्या प्रश्नावर शासन आणि प्रशासनामधील अधिकारी यांची दुटप्पी भूमिका अजूनही सुरूच आहे. या सगळ्या गुंत्यांचे उत्तर मिळत नाही. नदी, नाले, ओढ्यावर अतिक्रमणे वाढली असून रस्ते व पूल बांधल्यामुळे महापुराची तीव्रता वाढली आहे. नदीची मालकी कोणत्या खात्याची आहे याचा निर्णय अधिकारी घेत नाहीत. धरणातील सोडलेल्या पाण्यापेक्षा धरणाबाहेरचे पाणी जास्त आहे, त्यामुळे आपण स्वतःवर संकट ओढून घेतले आहे. पुराचा अंदाज अथवा पूर्वानुमान मांडता येतो, त्यासाठी आधुनिक यंत्रणा बसविणे गरजेचे असून महापुरावेळी माणसे आणि जनावरांच्या स्थलांतराची काळजी घेता येऊ शकते. महापुराच्या मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची कोणतीही माहिती अथवा यंत्रणा शासनाकडे नसल्याने याविषयी शांतपणे विचार करून काही ठोस भूमिका घेतल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
महाऊर्जाचे एस. ए. पाटील यांनी प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेची माहिती देताना म्हणाले, ग्लोबल वार्मिंगचा परिणाम शेती व शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊर्जेपासून परावृत्त व्हावे. सौर कृषी पंपाची मागणी करण्याकरीता शासनाच्या महाऊर्जा वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दिड महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांना सौर उर्जा कृषी पंप देण्यात येईल. शेतकऱ्यांनी विज आणि डिझेल बचत करण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम कृषी पंप योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त सौर कृषी पंप बसवून आपली शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भोंगळे यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. फळबाग क्षेत्राला वैचारिक आणि धोरणात्मक दिशा दिल्याबद्दल राष्ट्रीय फळबाग संघटना नवी दिल्ली यांचा 'कौटिल्य लोकनीती पुरस्कार' मिळाल्याबद्दल डॉ. सुधीर भोंगळे यांचा तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पाटील, व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक रघुनाथ पाटील, बाळासाहेब पाटील हलसवडे, महेंद्र बागी, शेखर पाटील, प्रमोद पाटील, दरगु गावडे माने, संजय पाटील, विजय सूर्यवंशी, शरदचंद्र पाठक, धनाजी पाटील नरदेकर, दामोदर सुतार, अशोकराव कोळेकर, मुसा डांगे, संजय पाटील कोथळीकर, अमर पाटील, मलकारी तेरदाळे, के. आर. चव्हाण, पंडित काळे, आण्णासाहेब पाटील, भालचंद्र लंगरे, वरुण पाटील, सुरेश पाटील, रावसाहेब नाईक, प्रदीप बनगे यांच्यासह ए. एस. पाटील, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.