नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनले पाहिजे

व्यवसाय सल्लागार रवींद्र खैरे यांचे मत 

प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

 व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे. व्यवसायाची सगळी कौशल्ये आपल्या मुलांमध्ये आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये कौशल्ये रुजविण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करावेत. कृषी आणि कृषीपूरक उद्योगात प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील तरुणांनी या संधीला उद्योगांमध्ये बदलून आपले स्वप्न साकार करण्यासाठी धडपडले पाहिजे. आगामी काळात नव्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता जास्त असून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनले पाहिजे, असे मत व्यवसाय सल्लागार रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले.


    शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशन व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर एक दिवसीय उद्योजकता विकास मार्गदर्शन मेळावा 'उमंग- 23' अंतर्गत घेण्यात आला. या मेळाव्यात रवींद्र खैरे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते.

   शिरोळ तालुका व परिसरातील युवक, युवती, महिला व नवउद्योजकांनी उद्योग, व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा रोजगार निर्माण करावा या उद्देशाने मेळावा झाला. यामध्ये उद्योजकता, शासकीय माहिती, शासकीय योजना, उद्योजक कर्ज अनुदान, नवीन व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन, कृषी उद्योजकांसाठी मार्गदर्शन, आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज आदींची माहिती देण्यात आली.

   महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे म्हणाले, प्रत्येक मनुष्यात जन्मजात उद्योजकीय गुण असतात. स्वयंस्फूर्ती अथवा उद्योगाचे वातावरण तयार करून प्रत्येकाला उद्योजक बनता येते. उद्योजकीय गुणांना बाहेर काढून त्यांना योग्य दिशा देऊन यशस्वी होता येते. ध्येय निश्चिती, स्वतःशी स्पर्धा, इतरांशी स्पर्धा, नाविन्यपूर्ण कृती आणि दीर्घकाळापर्यंत स्वतःचा सहभाग या गुणामधून आपण निश्चितच यशस्वी होतो. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र साखरे यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठीच्या शासकीय योजना, कर्ज, अनुदान याची माहिती दिली. तसेच तीव्र इच्छाशक्ती, उद्योगाची माहिती, भांडवलाची आवश्यकता, प्रशिक्षण आणि वितरण यासाठी आयुष्याकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला. वित्तीय साक्षरता समुपदेशक लक्ष्मीकांत कट्टी यांनी बँकेची कार्यपद्धती, कर्ज पुरवठा, व्यवसाय अहवाल आदींची माहिती देऊन आपल्याला येणाऱ्या समस्यामधूनच नवीन ऊर्जा घेऊन, नव्या संधी शोधून जाणीवपूर्वक वाटा शोधाव्या लागतील असे सांगितले. कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनीही मनोगतात नोकरी देण्यासाठी उद्योजकीय गुण आत्मसात केले पाहिजे असे सांगितले.

    प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. गणपतराव पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत प्रतीक्षा पाटील यांनी केले. प्रास्ताविक दीपा भंडारे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सुतार तर आभार प्राचार्य पी. आर. पाटील यांनी मानले. अंबादास नानिवडेकर, अशोकराव कोळेकर, महेंद्र बागे, मुख्य शेती अधिकारी दिलीप जाधव, यशवंतराव माने, अशोक निर्मळे, पप्पू चौगुले, संजय यादव, प्रा. मोहन पाटील, चंद्रशेखर कलगी, पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी, नवउद्योजक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post