शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती केल्यास जमिनीचे पुनर्जीवन होऊ शकते

 माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ /प्रतिनिधी:

 शेतीचा अभ्यास न करता, तंत्रज्ञान जाणून न घेता व कोणाचाही सल्ला न घेता शेती केली जात असल्याने शेतकऱ्यांबरोबरच राज्याचे व देशाचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने लागवडीखालील जमिनी कमी होत आहेत. शेतीतील उत्पन्न आणि उतारा न वाढविल्यास खाद्य अन्नाचे संकट येऊ शकते. योग्य पाणी, खते, बियाणे आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शास्त्रीय शेती केल्यास जमिनीचे पुनर्जीवन होऊ शकते, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी व्यक्त केला.

 अकिवाट येथे श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 260 एकरावर क्षारपड मुक्तीच्या कामाचा सर्व्हे शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

 पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपड मुक्त जमिनीचे काम राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. कराड- कृष्णा नदी काठावरही हा प्रश्न उद्भवत असून या ठिकाणची शास्त्रीय माहिती व सल्ला घेऊन कराड तालुक्यातही क्षारपड मुक्तीचे काम करण्यात येणार आहे. नदी क्षेत्रात पाणी उपलब्धतेमुळे सुपीक जमिनी अति पाण्याने, अति खतामुळे बाद झाल्या. त्यामुळे या जमिनी शेतीयुक्त, क्षारपडमुक्त करणे गरजेचे आहे. माती परीक्षण, खताचा वापर, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रयत्न आणि आलटून पालटून पिके कशी घ्यायची, प्रतिहेक्टर उत्पन्न वाढीसाठी कोणते प्रयत्न करावेत याचा अभ्यास शेतकऱ्यांनी करणे आवश्यक बनले आहे.

    गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपड मुक्तीच्या कामामुळे जमिनीतील क्षार बाहेर पडल्याने पडीक जमिनीतूनही चांगल्या पद्धतीचे उत्पादन येत आहे. सेंद्रिय कर्ब वाढविणे व पाण्याचे योग्य नियोजन केल्यास चांगली शेती करून उत्पन्न ज्यादा घेऊ शकतो. पत्रकार दगडू माने यांनी क्षारपडमुक्तीच्या कामाचा आढावा घेतला. प्रारंभी विशाल चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तचे व्हॉईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक रघुनाथ पाटील, भैय्यासो पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र बागे, दरगू गावडे, अकिवाट सरपंच वंदना पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड तालुका कृषी अधिकारी श्री मुल्ला, माजी कृषी अधिकारी श्री पटेल, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, हेमंत पाटील, अरुण देसाई, रावसो नाईक, सुभाष पाटील यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांनी मजरेवाडी व घालवाड येथे झालेल्या क्षारपडमुक्तीच्या कामाची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. मजरेवाडी व घालवाड येथील सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर क्षारपड मुक्तीचे काम होऊन विविध पिके घेण्यात येत असलेले पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची योजना कराड तालुक्यात राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. शेतकऱ्यांनी धाडसाने या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छाही दिल्या. यावेळी मजरेवाडी व घालवाड येथील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post