ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी प्रा. डॉ. बाबा बोराडे



प्रेस मीडिया लाईव्ह :

      सांगली, दि. २८ (प्रतिनिधी) - राज्यात अग्रेसर असणाऱ्या ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी प्रा. डॉ. बाबा बोराडे यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्था पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

     ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनने राज्यातील सर्व वृत्तपत्रांच्या संपादक, पत्रकारांना एकत्रीत करुन, त्यांच्या व्यावसायीक अडीअडचणी सोडविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात समाजातील अनेक गरजू घटकांना मदतीचा हात पुढे केला आहे. साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्रीत करुन, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर असते. 

यावेळी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. बाबा बोराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ही संस्था नावारुपाला आली असून, संस्थेचे कार्य चांगले आहे. यापुढील काळात वृत्तपत्र निर्मिती प्रक्रीयेतील समस्यांचा विचार करुन, त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्या शासन दरबारी मांडून, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. सर्व संपादक आणि पत्रकारांना एकत्र घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सक्रीय राहण्यासाठी भेटीगाठींचे नियोजन करण्यात येईल. त्यानंतर लवकरच पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी राज्य अधिवेशन घेण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

   प्रा. डॉ. बाबा बोराडे यांनी सांगली येथील भारती विद्यापीठ, वारणा महाविद्यालय आणि शांतिनिकेतन अभ्यास केंद्रातून अनेक होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देऊन, त्यांना वृत्तपत्र क्षेत्राच्या प्रवाहात आणले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध प्रसार माध्यमात जबाबदारीच्या पदावर यशस्वीरित्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रांतून त्यांनी सडेतोड स्तंभ लेखक म्हणून ख्याती मिळविली आहे. त्यांनी आजपर्यंत नऊ विविध विषयांवरील पुस्तके लिहून, प्रकाशीत केली आहेत. त्यांचे ‘वृत्तपत्र व्यवस्थापन’ हे मराठीतील एकमेव पुस्तक विद्यापीठाच्या वृत्तपत्र अभ्यासक्रमासाठी अभ्यासले जाते. दागिना, गाव एक नंबरी, निर्धार आणि धस्का या मराठी चित्रपटांतून त्यांनी विविधरंगी भूमिका केल्या आहेत. राज्य शासनाच्या समता व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने निर्माण करण्यात येणाऱ्या पाच चित्रपटांसाठी त्यांनी संशोधक व समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.

     नाट्य, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात प्रा. डॉ. बाबा बोराडे यांनी गत ३५ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. माजी शिक्षण मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम आणि प्रसिध्द विचारवंत कै. प्राचार्य, डॉ. पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगली जिल्ह्यात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. अनेक होतकरु विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणून, त्यांना स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा दिली.

    यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात प्रारंभी असोसिएशनचे सचिव दिपक ढवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्याध्यक्ष संदिप लोंढे आणि ज्येष्ठ संपादक, साप्ताहिक घरप्रमुखचे संपादक धोंडिराम शिंदे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्यअध्यक्षा राणी कमलाकर, ॲड. बाळासाहेब वाघमोडे, साप्ताहिक आदेश आहिल्याचे संपादक ईश्वर हुलवान, प्रसिध्द चित्रकार, सारांशचे सहसंपादक प्रा. अनिल दबडे उपस्थित होते. शेवटी आभार अमरजित चोपडे यांनी मानले. कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील संपादक, पत्रकार, छायाचित्रकार आणि वृत्तपत्र वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post