मिंधे गटातील आ. थोरवे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व बेताल वक्तव्याबाबत माफी मागा

  अन्यथा तीव्र आंदोलन, सुधाकर घारे यांचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक..

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

कर्जत : - आमदार महेंद्र थोरवे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी मंत्री महोदय यांच्या उपस्थिती मध्ये बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आमदार तथा माजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी अदिती तटकरे यांना शेंबडी पोरगी असा उल्लेख केला. यामुळे राष्ट्रवादी काँगेस जिल्ह्यात आक्रमक झाली आहे. कर्जत येथे ९ एप्रिल रोजी माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे व राष्ट्रवादी कर्जत तालुका पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत या बेताल वक्तव्याचा निषेध केला आहे. तर मिंधे गटाचे आमदार यांनी बेताल वक्तव्य केले. याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा सुधाकर घारे यांनी दिला आहे.  

    


शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी कर्जत - खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हे  पोसरी येथे करण्यात आले होते. यावेळी मंचावर उपस्थित मंत्री महोदय, इतर मान्यवर व नागरिक यांच्यासमोर भाषण करताना आमदार थोरवे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असल्याचे समोर आले आहे. यावेळी बोलताना आमदार थोरवे म्हणाले की महविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार होते. तरी देखील एका शेंबड्या पोरीला पालकमंत्री केले. असा उल्लेख त्यांनी आमदार अदिती तटकरे यांच्या विरोधात केला. तर मागे देखील आमदार थोरवे यांनी अदिती तटकरे यांना मांजरीची उपमा दिली होती. सतत अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य माजी मंत्री व रायगडच्या पालकमंत्री आमदार अदिती तटकरे यांच्या बाबत केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्याबाबत आक्रमक झाला आहे.  

 या बेताल वक्तव्या बाबत कर्जत येथे ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुक्याच्या वतीने रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, ज्येष्ठ नेते अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, उक्रुळ माजी सरपंच वंदना थोरवे, कर्जत नगरसेविका भारती पालकर, युवकचे भूषण पेमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कर्जत तालुका पदाधिकारी यांनी आमदारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तर यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. घारे म्हणाले की आमदारांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा घाट घातला होता. मात्र यावेळी त्यांचा प्रयत्न सपशेल फसला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गावोगावी बस पाठवून महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला पण तोही प्रयत्न फसला. पक्षाच्या कार्यक्रमासाठी आमदारांनी शासकीय यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यांनी आमदार अदिती तटकरे यांच्यावर केलेली टीका ही अत्यंत हीन व खालच्या  दर्जाची असल्याने एखाद्या महिलेचा आदर करत येत नसेल तर अनादर करू नये असे घारे यांनी सुनावले. यासह कोरोना काळात अधिकारी वर्गाची मुदतीपूर्वी बदली करण्याचे काम आमदार महोदयांनी केले. खोपोली येथे मास्क लावला नसल्याने तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने त्या पोलिस अधिकाऱ्यांची उचलबांगडी आमदार महोदयांनी केली. यामुळे महाराष्ट्राचे बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल उपस्थित करत हे सहन केले जाणार नाही. मिंधे गटाचे आमदार थोरवे यांनी आमदार अदिती तटकरे यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तर यावेळी माघार नाहीच असा थेट इशारा सुधाकर घारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. दरम्यान आमदार थोरवे हे अनेकदा आमदार अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील दंड थोपटले असल्याने आता  आमदार महेंद्र थोरवे यांना नमते घेऊन माफी मागावी लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post