आमच्या जागेत योजना नको, मोहचीवाडी परिसरातील आदिवासी आक्रमक, आमदार हि गोंधळले, ....म्हणे मला काहीच माहित नाही


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

   नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते नागरीकरण पाहता पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावामध्ये पाण्याची समस्या कायम निकाली काढण्यासाठी पाणी योजना मंजूर होऊन आज दिनांक २३ एप्रिल रोजी त्याचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर हे कार्यक्रमस्थळी आले असता त्यांना स्थानिक आदिवासी बांधवानी गराडा घातला. तर आमच्या जागेत हि योजना नको म्हणत आदिवासी बांधव आक्रमक झाले. या प्रकारामुळे आमदार देखील गोंधळले. दरम्यान आमदार थोरवे यांनी याबाबत मला काहीच माहित नाही असे म्हणत याबाबतच ग्रामस्थांना तुमच्या जागेत कोणतीच योजना होणार नाही म्हणत आश्वस्त केले. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले.

      


.

   नेरळ या मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत असलेल्या ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने १९९८ साली उल्हास नदीवरून पाणी योजना राबवली होती. तेव्हाची लोकसंख्या हि कमी होती तर आजची लोकसंख्या हि अधिक असल्याने साहजिकच नेरळमध्ये अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत नवी ४० कोटी रुपयांची पाणी योजना नेरळ शहरासाठी मंजूर झाली. याअगोदर असलेल्या पाणी योजनेच्या साठवण टाक्या आणि फिल्टर हाऊस यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध आहेत. बोर्ले येथे साठवण टाकी आणि फिल्टर हाऊस आहे. तर मोहचीवाडी येथे दोन साठवण टाक्या आहेत. अशात मोहचीवाडी येथे पाण्याच्या टाकी जवळील जागा आदिवासी राखीव असल्याचे आदिवासी बांधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे. येथील सर्वे क्रमांक २८८ ची १ हेक्टर ९८ गुंठे जागा हि ठाकूर समाजासाठी राखीव आहे. होळीचा माळ असलेल्या जागेत नव्या पाणी योजनेची टाकी बांधणार असे समजल्याने पाणी योजनेच्या भूमिपूजनाला आलेल्या प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर यांना येथील स्थानिक आदिवासी महिला व बांधवानी गराडा घालत आमच्या जागेत योजना होऊन देणार नाही अशी भूमिका घेतली. त्याचबरोबर आम्हाला आमची जागा माहित आहे. त्यामुळे पाणी योजना करत असताना आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कसा निर्णय घेता असे म्हणत जमलेले आदिवासी बांधव आक्रमक झाले. तर याबाबत हा विषय आता माझ्या समोर आला आहे. याबाबत मला काही कल्पना नव्हती. तेव्हा या जागेचा आपण सर्वे करून घेऊ इथे ग्रामपंचायतीची जागा असून त्यातच टाकी बांधली जाणार आहे. तुमच्या जागेत टाकी बांधली नजर नाही म्हणत आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदिवासी बांधवाना आश्वस्त केले. 

            दरम्यान ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भूमिपूजन होण्याआधीच मोठा वाद उपस्थित झाला होता. तूर्तास ग्रामस्थांनी नमते घेतले असले तरी आपल्या होळीचा माळ असलेल्या जागेत योजना होऊन देणार नाही अशी भूमिका आदिवासी बांधवानी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा हा वाद उफाळून येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

होळीच्या जागेत नवी टाकी बांधण्यात येणार नाही. आहे त्याच टाकीच्या जागेत ती तोडून नवी टाकी बांधण्यात येणार आहे. पण हे करत असताना आदिवासी बांधवांच्या जागेचा सर्वे करण्यात येईल. तर आदिवासी बांधवांच्या जागा निघत असेल आणि ती शासन वापरात असेल तर तसे प्रस्ताव करून त्याचा मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मात्र कुणाचे नुकसान मी होऊ देणार नाही.

: महेंद्र थोरवे, आमदार 

दोन टाक्या अगोदर आहेत तर अजून होळीचा माळ असलेल्या जागेत नवीन टाकी बांधण्यात येणार असल्याचे आम्हा आदिवासी बांधवाना समजले आहे. हि आदिवासी समाजाची जागा असल्याने येथे आम्ही टाकी बांधून देणार नाही. आम्ही आमच्या जागेचा सर्वे केला आहे. आमची १ हेक्टर ९८ गुंठे  जागा कुठपर्यंत आहे हे आम्हाला माहित आहे. आम्हाला कुठल्याही बाबतीत विचारात घेतले जात नाही. परस्पर निर्णय घेऊन मनमानी कारभार करत असल्याने आमचा आक्षेप आहे 

: अरुण पवार, आदिवासी ग्रामस्थ मोहचीवाडी 

याबाबत नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post