प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, ता. २९ : विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या नावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असलेल्या अध्यासनाच्या धर्तीवर पत्रकारिता विभागात 'स्मृतिशेष वरुणराज भिडे' यांच्या नावाच्याही अध्यासन सुरू करण्याच्या डॉ. गोऱ्हे यांनी केलेल्या मागणीला राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले. ही मागणी मान्य केल्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा याच कार्यक्रमात दूरध्वनी आल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
या अध्यासनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ सीएसआरची मदत घेतली जाणार आहे, व त्यासाठी सर्वांची बैठक घेऊन सुचनांचा अंतर्भाव करून अंतीम प्रस्ताव केला जाईल असे मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे असे यावेळी डॅा.नीलम गोर्हेंनी सांगितले.
आज पुणे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार २०२३’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या अध्यक्षीय स्थानावरून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी, ज्येष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे, माजी आमदार श्री. उल्हासदादा पवार, श्री. वि. अ. जोशी, श्री. अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, श्री. सूर्यकांत पाठक, श्री. प्रकाश भोंडे, डॉ. शैलेश गुजर, श्री. चारुचंद्र भिडे यांसह विश्वस्त मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि पुरस्कारार्थी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार श्री. सुरेंद्र पाटसकर(सकाळ) यांना देण्यात आला तर चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाइम्स), सुषमा नेहरकर-शिंदे (पुढारी) आणि अभिजित कारंडे (एबीपी माझा) यांना आश्वासक पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी, पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्या पुढे म्हणाल्या, 'स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाचं एक भाग म्हणून वरुणराज भिडे यांनी सहकार्य केले होते. अनेक प्रकारच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाचा वाटा त्यांनी उचलला होता. राजकारण्यांना धमक्या येणे, समाज माध्यमांवर ट्रोलिंग करणे हे प्रकार परदेशातही दिसून येतात. काही लोक मात्र मुद्दाम स्वतःला ट्रोल करून घेतात. ट्रोल करणे हे ठरवून केलेलं हत्यार आहे की काय अशी शंका येते.राजकारणात हल्ली संवाद राहिलेला नाही. संवाद केल्यास वेगळ्याच शंका उपस्थित केल्या जातात. प्रत्येकजण संवाद केल्याशिवाय जगू शकत नाही. कार्यकर्ता अस्वस्थ असल्याने प्रत्येक पक्षाचे राजकीय वातावरण गढूळ होत आहे.'
प्रत्येक भागात सामाजिक काम करणाऱ्या निवडक महिलांची एक टीम असली पाहिजे त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार प्रकाराची दखल घेतली जाईल.
"या कामात जाऊन केवळ प्रवक्ते म्हणून बोलताना असे लक्षात आले की, प्रवक्ते त्यानंतर पुढे काही प्रगतीच करू शकत नाही, म्हणून मी ते थांबवताच मी विधान परिषदेची उपसभापती झाले," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी करताच सभागृहात हशा पिकला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून पत्रकारितेवर दबाव टाकण्याचे तंत्र सुरू आहे. यामुळे मुक्त पत्रकारिता आणि मोकळा आवाज येण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. पत्रकारांना पुरेसे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे." तीनही पुरस्कार विजेते यांचीही भाषणे झाली.
प्रास्ताविक उल्हासदादा पवार यांनी केले, स्वागत अंकुश काकडे यांनी केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. शैलेश गुजर यांनी केले.