नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही

समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत संगमब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा याठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच या वृक्षांमध्ये  जुनी व दुर्मिळ झाडे सामाविष्ट आहेत, अशी माहितीही समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही. उलट, नदी काठच्या बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ३ हजार १४२ वृक्ष न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तर, नदी पुनरुज्जीवनाचे काम करताना जी वृक्ष काढणे अत्यावश्यक आहे, त्यांच्या बदल्यात ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्ष लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहणाऱ्या नदीच्या दोन्ही काठांवर हरीतपटा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत असताना बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत यापूर्वीही पुणे महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जी वृक्ष काढली जाणार आहेत, त्यामध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा अजिबात समावेश नाही. तर,  मुळा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा झाडांचे प्रमाण हे जास्त आहे. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करीत असताना  बाधित होणाऱ्या एकूण वृक्षांपैकी १ हजार ५३८ झाडे संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. त्यापैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ/विलायती किकर  ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच या प्रजातीमधील आहेत. हे प्रमाण एकूण काढावयाच्या वृक्षांच्या तुलनेत जवळपास ९९ टक्के आहे. तर, याशिवाय खैर २, निलगिरी २  अशी चार वृक्ष काढण्यात येणार आहेत. 

तर, बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्याचे काम करीत असताना १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहेत. यामध्येही १ हजार २५३ वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील असून अशा झाडांचे प्रमाण हे एकूण काढावयाच्या झाडांच्या ७९ टक्के आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ/विलायती किकर/विलायती चिंच ५७९ अशी एकूण १ हजार ५७२ वृक्ष संपूर्ण काढणे प्रस्तावित आहे. 

परिसंस्था सुधारण्यास होणार मदत

बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण व मोठ्या प्रमाणात नदीच्या दोन्ही काठ्यांवर झुडपांची लागवड करण्यात येणार आहे. याद्वारे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे. हे करीत असताना लावण्यात येणारे गवत व वृक्षांचे प्रकार स्थानिक असून सहजगत्या उपलब्ध होऊ शकणारे असेच असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. बाधित वृक्षांच्या बदल्यात महानगरपालिका जी वृक्ष लावणार आहेत, ती वृक्ष नैसर्गिकदृष्ट्या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी असतील हे वृक्ष हवामान बदल, पूर परिस्थिती आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती तसेच इतर सुक्ष्म बदलांना तोंड देण्यास सक्षम असतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ही वृक्ष नदीकाठाच्या संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळण्यासाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्ष्यांची घरटी, निवासस्थाने निर्माण करण्यासाठी, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचरांच्या वाढीसाठी याचाच अर्थ एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणारी आहेत.  याशिवाय, ही वृक्ष लावताना ती स्थानिक प्रजातीची, तज्ज्ञांनी सुचवलेली व नदीकाठ परिसंस्थेला सुसंगत असलेली योग्य उंचीची चांगल्या प्रतीची वृक्ष लावली जातील. या वृक्षांमध्ये आंबा, जांभूळ, करंज, अर्जुन, मुचकुंद, गुलार, कैलासपती, निम, काडंब आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांचे पुढील पाच ते सात वर्ष संगोपन करण्यात येणार आहे.

वृक्षांना लावलेल्या फलकांबाबत गैरसमज

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या वृक्षांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण करताना वृक्षांना एक फलक लावून त्यावर नंबर टाकण्यात आला होता. केवळ वृक्षांची संख्या मोजता यावी, यासाठी सर्वेक्षणाचा भाग म्हणून हे फलक लावण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र समाज माध्यमांवर या फलकांबाबत सुद्धा गैरसमज निर्माण करून देण्याचे काम सुरू आहे.  हा फलक ज्या ज्या वृक्षावर आहेत, ते सर्व वृक्ष तोडले जाणार आहेत, अशा स्वरुपाचा संदेश समाज माध्यमातून दिले जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे फलक केवळ सर्वेक्षणाचा भाग आहे. 

मुळात, पुणे महानगरपालिका नेहमीच पुणे शहराचा विकास करीत असताना पर्यावरण संवर्धनाला  सुद्धा तेवढेच महत्त्व देत असते. पर्यावरण  संवर्धन आणि विकास याचा समतोल साधण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केला आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करीत असताना सुद्धा पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी पुणे महानगरपालिका घेत आहे. त्यामुळेच नदीच्या काठापासून जवळ असणाऱ्या जुन्या व दुर्मिळ वृक्षांना वाचवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील आहेच. तसेच बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी जास्तीतजास्त वृक्षांचे पुर्नरोपण करण्यावर भर दिला जातोय. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पुणे महानगर पालिकेकडून ६ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार आहेत, अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमांवर टाकून चुकीची माहिती प्रसारीत करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून केला जातोय.  या माहितीमध्ये तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. 



कार्यकारी अभियंता (प्रकल्प)

पुणे महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post