नदीकाठ सुधारच्या नावाखाली होणारी प्रकल्प बाह्य व बेकायदेशीर वृक्षतोड तातडीने थांबवा

 आप नेते विजय कुंभार यांची मनपा आयुक्तांकडे मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे मनपाने काही महिन्यांपूर्वीच मोठा गाजावाजा करत पुण्यातील नद्यांच्या तथाकथित पुनरुज्जीवनासाठी नदीकाठ सुधार प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सुरूवातीपासूनच वादात अडकलेला आहे. पर्यावरणवाद्यांनी अनेक शास्त्राधारित आक्षेप घेऊनही आणि आम आदमी पार्टीने विरोध करुनही आक्षेपांचे काहीही निरसन न करता मनपा बेगुमानपणे हा विध्वंसक प्रकल्प पुढे रेटत आहे.

या नदीकाठ सुधार योजनेच्या प्रकल्प अहवालातच स्पष्ट दिसते की *या प्रकल्पामुळे पुणे शहरात पूर पातळी ५ फुटांनी वाढणार आहे. नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी अंदाजपत्रकात एक रुपयाचाही खर्च दाखविलेला नाही. असे असताना केवळ तथाकथित सौंदर्यीकरणासाठी आपण पुणेकरांचे ४७२७ कोटी रुपये खर्ची घालावेत हे अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे.सध्या या नदीकाठ सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रात कॉंक्रीटच्या भिंती बांधण्यासाठी *मनपाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू केली आहे. प्रत्यक्षात प्रकल्प अहवालात मात्र वेगळंच काही तरी सांगितलेलं आहे:

_"प्रकल्प संकल्पना अस्तित्वातल्या झाडांची काळजी घेणारीच आहे.

_"अस्तित्वातली झाडे सामावून घेण्यासाठी नदीपात्रातील भिंतीचे नियोजन प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीनुरूप केले आहे."

_"पुण्यातील नदीकिनारी खूप मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. ही झाडी या प्रकल्पात सामावून घेण्यात येईल."

_"पुण्यातील नदीकाठचा हरित वारसा जपणे आणि समृद्ध करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अस्तित्वातील झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षक पिंजरे वापरण्यात येतील."असे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणि या आधारावरच सदर प्रकल्पाला शासनाने पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. *या मंजुरी मध्ये या प्रकल्पासाठी वृक्षतोड लागू नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना आता या प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडणे हे बेकायदेशीर तर आहेच परंतु ही पुण्यातील सर्व नागरिकांची फार मोठी फसवणूक ठरेल.* या वृक्षसंहारामुळे पुण्याची कधीही भरून न येणारी पर्यावरणीय हानी तर होईलच परंतु अगणित पक्ष्यांचा अधिवासही कायमस्वरूपी संपुष्टात येईल.

एक जागरुक राजकीय पक्ष आणि पुणेकरांचे प्रतिनिधी म्हणून ही वृक्षतोड आम्हास कदापी मान्य नाही. आपण पर्यावरणाचे "संरक्षक" आहात "भक्षक" बनू नका ही माफक आशा आणि अपेक्षा.जर ही वृक्षतोड आणि संलग्न काम आपण तातडीने थांबविले नाही तर आम्हाला मोठ्या प्रमाणावर चळवळ उभी करावी लागेल.



विजय कुंभार, 

राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष, 

आम आदमी पार्टी

Post a Comment

Previous Post Next Post