प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१२, 'विद्येविना मती गेली' हे स्पष्ट करत 'सारे अनर्थ एका अविद्येने केले 'असे सांगणारे महात्मा फुले बुद्धीप्रामाण्यवाद आणि विवेकवाद यांची शिकवण देणारे थोर प्रबोधनकार होते.
मानवनिर्मित वर्णव्यवस्थेने लादलेल्या परंपरागत बौद्धिक दास्यातून सर्वसामान्य शोषित वर्गाची सुटका करण्यासाठी महात्मा फुले आयुष्यभर झटले. त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाचे हे दीडशेवे वर्ष आहे. सत्याचा सामना न करण्याची विकृती वाढत जात सार्वत्रिक खोटेपणाची नवी पद्धत रूढ होण्याच्या अस्वस्थ वर्तमानात महात्मा जोतिबा फुले यांचे विवेकवादी जात, पात, धर्मनिरपेक्ष सत्यशोधन अतिशय महत्त्वाचे ठरते असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला महालिंग कोळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, मूर्तजा पठाण,हणमंत कानडे,आप्पासाहेब म्हेतर,अशोक माने, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी,संजय शिंदे,श्रीकृष्ण पाटील आदींसह अनेकजण उपस्थित होते.