उच्चशिक्षित तरुणाची शेळीपालन व्यवसायात यशस्वी वाटचाल

 उद्योग - व्यवसायातून दिला आर्थिक स्वावलंबनाचा धडा 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी

एमएसडब्लू पदवीचे उच्च शिक्षण घेवूनही काही वर्षे नोकरी करुन आपल्या गावाकडे परत येऊन उद्योग - व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पुंडलिक काळे या युवकाने शेळीपालन व्यवसायात चांगल्या प्रगतीची वाटचाल सुरु ठेवली आहे. त्याची ही धडपड आर्थिक स्वावलंबन बरोबरच उद्योमशिलतेचा धडा शिकवणारा ठरला आहे. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षीच आई -वडीलांचे छञ हरवल्याने पुंडलिक तुकाराम काळे या तरुणाला पहिली ते सहावी पर्यंतचे शिक्षण जयसिंगपूर येथे आश्रम शाळेत घ्यावे लागले.नात्यातील उबदार  प्रेमाची भूक ठेवून त्याने केवळ आजोळचा आधार घेऊन आपली शिक्षणयाञा सुरु ठेवली


विशेष म्हणजे आश्रमशाळेतच त्याचे बालपण गेल्याने आपोआपच त्याच्या अंगी शिस्त , चिकाटी व स्वावलंबी जीवनाची प्रखर इच्छा भिनली होती.याचाच त्याला पुढील शिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग -व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठा फायदा झाला.दरम्यानच्या काळात २००० साली तो आपल्या आजोळी म्हणजे शिवनाकवाडी येथे रहायला आला.याठिकाणची परिस्थिती देखील तशी बेताचीच असल्याने त्याने काम करतच आपले शिक्षण पूर्ण करण्याचा मनाशी ठाम निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी सेट्रींग ,बांधकामचे काम करतच आपली खडतर पण यशाच्या दिशेने  वाटचाल सुरु ठेवली.

त्यामुळेच त्याचा कष्टासोबतच शैक्षणिक प्रवास काहीसा सुसह्य होत राहिला.याच दरम्यान त्याने अकरावीच्या पुढे महाविद्यालयीन शिक्षण हे स्टार पान मसाला फॅक्टरीतील काम करतच बी.ए.इंग्लीश पदवीचे शिक्षण पूर्ण केले.यानंतरचे एमएसडब्लू पदवीचे शिक्षण कोल्हापूरातील सायबर काॅलेजमध्ये पूर्ण करुन आपल्या जीवनाच्या कक्षा अधिक रुंदावत ठेवण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरुच ठेवला.सोशल वर्कमध्ये मास्टरकीची पदवी मिळाल्याने त्याने पणजी येथे वाॅलुन्टरी हेल्थ असोसिएशनमध्ये समन्वयक म्हणून एक वर्ष ,माणगाव तालुका पंचायतमध्ये ग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून पाच वर्षे चांगल्या पध्दतीने काम करत सामाजिक क्षेत्रातील अनुभव घेतानाच स्वतःचा उद्योग -व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न त्याला काही केल्या स्वस्थ बसू देईना.त्यामुळे त्याने चांगल्या सन्मानाची व पगाराची नोकरी सोडून देत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजोळी म्हणजे शिवनाकवाडी येथे परत येण्याचा निर्णय घेत तो प्रत्यक्षात अंमलात आणला.शिवनाकवाडी येथे मामाच्या घरी आल्यानंतर २०१९ साली त्याने अवघ्या तीन शेळ्यांवर पशुपालनाचा व्यवसाय सुरु केला.तत्पूर्वी  ,१० गुंठे शेत भाडेतत्वाने घेवून त्यातच जनावरांचे शेड मारले.

त्यामध्ये विविध जातींच्या शेळीची चांगली देखभाल व प्रामाणिक कष्ट करत आणि त्याला अभ्यासाची जोड देत त्याने शेळी पालनाचा व्यवसाय वाढवत ठेवला.यामध्ये जनावरांना वैरण ,खाद्य व जनावरांची चांगली स्वच्छता व देखभाल करणे ही कामे पुंडलिक व त्याची पत्नी तेजस्विनी हे दोघे अगदी मन लावून करतात.त्याचेच फलित म्हणजे आजतागायत सुमारे ३०० शेळी व बोकडाची चांगली वाढ करत त्यांची विक्री करुन त्यातून चांगला आर्थिक नफा मिळवला आहे.आज त्याच्याकडे शेळी व बोकड असे मिळून ४५इ तकी संख्या आहे.तसेच त्यांची चांगली देखभाल होऊन त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी त्याने आपले व्यवसायिक कौशल्य पणाला लावले आहे.या कामात त्याला उच्चशिक्षित असणा-या पत्नी तेजस्विनी यांचीही खंबीर सोबत मिळत आहे.त्या बीएससी केमिस्ट्री पदवीचे शिक्षण पूर्ण केल्या असून शेळीपालनाचा व्यवसाय सांभाळत गावातील जिल्हा परिषद शाळेत मानधन तत्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पुंडलिक व तेजस्विनी या काळे दाम्पत्याने स्वतःच्या कुटूंबाच्या पलिकडे जाऊन समाजातील गरीब, गरजूंना देखील विविध माध्यमातून मदतीचा हात देत तसेच रायगड जिल्ह्यातील चेतना मतिमंद मुलांची शाळा ,अब्दुललाटचे बालोद्यान , इचलकरंजीचे नवचैतन्य आश्रमशाळा ,घोसरवाडचे जानकी वृध्दाश्रम विविध संस्थांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीची जाणीव तसूभरही कमी होऊ दिली नाही.त्यांच्या वाटचालीत त्यांना त्यांचे मामा व आदर्श शिक्षक असलेले बाबासाहेब बेडक्याळे व आजोळच्या सर्व मंडळींचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. भविष्यात शेळीपालन व्यवसायाचा अधिक विस्तार करतानाच तो सर्वांसाठी आदर्श ठरावा ,यासाठी त्यांचे नियोजन सुरु आहे.

एकंदरीत, शेळीपालन व्यवसायातून त्याने आर्थिक कमाईचे साधन शोधून काढले आहे .पण ,याही पलिकडे त्याने चांगली नोकरी सोडून आर्थिक स्वावलंबन होण्याची निवडलेली वाट ही केवळ जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर आता यशाकडे नेणारी ठरत आहे.त्यामुळेच ती धडपड श्रमप्रतिष्ठेचे महत्व अधोरेखित करत नवे काही घडवू पाहणा-यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post