इचलकरंजी पाणी प्रश्नी अभिनव आंदोलन

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदी मधून सुळकुड पाण्याची योजना प्रशासनाकडून मंजूर झाली आहे. इचलकरंजी शहराला पाण्यासाठी या योजनेची अत्यंत आवश्यकता असून, इचलकरंजी शहरांमध्ये चार ते पाच दिवसातून येणारे पाणी नागरिकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. 

सध्या कार्यान्वित असणाऱ्या योजनांच्या पाईपलाईनची परिस्थिती बिकट असल्याने वारंवार गळतीचे प्रकार घडत असतात, त्यामुळे पाणीपुरवठा शहरात व्यवस्थितपणे होताना दिसत नाही. या कारणास्तव आपल्या प्रशासनाने सुळकुडची योजना मंजूर केली आहे. परंतु या योजनेस सुळकुड गावातील व परिसरातील काही नागरिक योजनेची माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने प्रसार करून नागरिकांच्या मध्ये विरोध निर्माण करत आहेत. इचलकरंजी शहराचा उपसा ज्या ठिकाणाहून होणार आहे. ते सर्व गावांचा उपसा केंद्र झाल्यानंतर सर्वात शेवटी असून, इचलकरंजी शहराच्या उपसा केंद्राच्या नियोजित जागेपासून 300 मीटर अंतरानंतर सर्व पाणी कर्नाटक राज्यामध्ये जाते. आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील, आपल्याच महाराष्ट्र राज्यातील काही गावे, महाराष्ट्रातीलच एका शहराला पाणी देण्यासाठी विरोध करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवीअसून,  21 व्या शतकामध्ये सुद्धा एखाद्या शहराला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

            जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आपल्याकडे आल्यापासून, जिल्ह्यातील अनेक मोठे प्रश्न व नागरिकांच्या समस्या आपल्याकडून मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये शासनाच्या अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहेत. अशाच पद्धतीने आपण इचलकरंजी शहरासाठी मंजूर असणारी सुळकुड पाणी योजना लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी यासाठी आम्ही इचलकरंजी मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आपल्या कार्यालयापर्यंत जवळजवळ 30 किलोमीटर दंडवत घालत, इचलकरंजी शहरामधील हजारो नागरिकांनी सह्यांच्या मोहिमाद्वारे आपणास केलेल्या विनंतीचे निवेदन देण्यासाठी आलो आहोत. 

    तरी आपण लवकरात लवकर प्रत्यक्षपणे योजनेच्या कामास सुरुवात करावी ही नम्र विनंती.


(अधिक माहिती करिता 7972519486)

Post a Comment

Previous Post Next Post