फुले-आंबेडकर,सत्यशोधक समाज व जातिअंत


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com.

११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती आहे तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे १५० वे वर्ष सुरू होत आहे. अमेरिकेतील विचारी मानवतावादी लोकांनी निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त केले. त्याच पद्धतीने पुरोहित वर्गाच्या बौद्धिक दास्यातून या देशातील विचारवंतांनी शूद्रातीक्षुद्राना मुक्त केले पाहिजे ही भूमिका महात्मा फुले मांडत होते. १८५५ साली महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न ‘ हे नाटक लिहिले.त्यातून त्यांनी पुरोहित वर्गाचे वर्चस्व कसे शोषण करते हे मांडले.पुढे त्यांनी १८७३ मध्ये ‘गुलामगिरी ‘ नावाचे पुस्तकही लिहिले होते. या पुस्तकातूनच सत्यशोधक समाजाचा जन्म झाला. तसेच ज्योतिबांनी पुनर्विवाह घडवून आणण्यात पुढाकार घेणे, बालकाश्रम सुरू करणे ,शिवाजी महाराजांची समाधी शोधून पोवाडा रचणे ,अस्पृश्याने हौद खुला करणे, केशवपनाविरोधी आवाज उठविणे असे विविध स्वरूपाचे कार्य अंगीकारले. इथल्या मानवनिर्मित जाती व्यवस्थेत श्रमाने जगणाऱ्या वर्गाला इंग्रज सरकारने शिक्षण द्यावे म्हणजे ते विद्या मिळवून मानसिक दास्यातून मुक्त होतील असे जोतिबांचे मत होते. ‘सारे अनर्थ एका अविद्याने केले ‘ हे त्यांचे मत होते.


इंग्रजांनी आपल्या स्वार्थासाठी का असेना पण इथे शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळेच भारतात सर्व जातीच्या लोकांना शिक्षणाची कवाडे उघडली गेली. इंग्रजांच्या अंकित झालेल्या मराठेशाहीत एक वर्ग सूज्ञ होत होता.लोकहीतवादींपासून महात्मा फुले यांच्यापर्यंत अनेकजण कार्यरत झाले होते. अशीच सुज्ञ झालेली काही मंडळी महात्मा फुले यांच्याकडे जमलेली होती. त्यांनी विविध बाबींवर सांगोपांग विचार केला. त्यातून धर्म, कर्म, व्यवहार आदी बाबत शूद्र नाडले जाऊ नयेत म्हणून ‘सत्यशोधक समाजाची’ जाहीरपणे स्थापना केली.या समाजाने काही नियम आणि कर्तव्य निश्चित केली.


सत्यशोधक समाजाच्या सभासदत्वासाठी काही महत्त्वाच्या अटी होत्या. उदाहरणार्थ( १) मी निर्मिका शिवाय इतर कशाचीही पूजा करणार नाही.(२) मी निर्मिकाने दिलेल्या शुद्ध मानवी अधिकारांना धक्का लावणार नाही. दुसरे आपल्यापेक्षा नीच आहेत असे ज्या ग्रंथात नमूद केले आहे अशा धर्मग्रंथांना मानणार नाही. आणि ज्या धर्मग्रंथाद्वारे दुसऱ्यांना नीच समजले जाते त्यांना मी सन्माननीय मानणार नाही.(३) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा यशस्वी प्रयत्न करेन.(४) सत्याचा सन्मान करेन.वृद्ध,अपंग, बालके यांना मदत करीन. मानवी अधिकार समजावेत म्हणून मुला-मुलींना पुरेशी शिक्षण देईन. (५) समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून वर्गणी देईन.(६) समाजाचा कारभार चालवण्यासाठी लोकशाही पद्धतीचे कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल.बहुमताने निर्णय घेण्यात येतील.वर्षातून चार वेळा सर्वसाधारण सभा होईल. असे काही नियम होते.


सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी सत्याचा प्रसार आणि सद्विचार लोकांमध्ये रुजवण्याचे काम करावे. मानवी हक्क आणि कर्तव्यांचा त्यांनी आपल्या लेखनातून व भाषणातून प्रचार व प्रसार करावा हे अभिप्रेत होते. अनिष्ट चालीरीतींचे निर्मूलन करणे हे समाजाच्या उद्देशातील मुख्य कलम होते. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, तुकाराम तात्या पडवळ, दादोबा पांडुरंग आदींची पुस्तके समाजाची विचारधारा म्हणून उपयोगात आणावीत असेही ठरवण्यात आले. प्रस्थापित धर्मग्रंथातील विषमतेवर व पक्षपातावर ज्योतिरावांना आसूड ओढायचे होते. सत्य काय आहे ? ते लोकांसमोर मांडायचे होते. म्हणूनच त्यांनी ‘ सत्यशोधक ‘ हे नाव धारण केले.


मूळ सत्यशोधक समाज एक निर्मिक, एक धर्म ,एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. सर्वच धर्माच्या धर्मग्रंथातून सर्वांनी प्रमाण मांडण्याजोगा भाग नसल्याने सत्यशोधक समाजाला ग्रंथाचे सर्वप्रामाण्य मान्य नव्हते. अवतारवाद, मूर्तीपूजा,विभूतीपूजा त्याला मान्य नव्हती. नामस्मरणाचा भक्तिमार्गही त्याला पसंत नव्हता. परलोक व ईश्वराची साक्षात भेट त्याला अमान्यच होती. स्वर्ग व दैववाद खरा नाही. स्त्री पुरुष समान आहेत.उलट पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे अशी सत्यशोधक समाजाची भूमिका होती. सत्यशोधक समाजाला महात्मा फुले यांच्यानंतर डॉ. विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, भास्करराव जाधव,प्रा.डोंगरे, लठ्ठे, मुकुंदराव पाटील रामैया अय्यावारू, वा.रा .कोठारी, विचारे गुरुजी, मोरोबा वाळवेकर, यशवंतराव परांजपे आदी अनेकांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला.


पुढच्या काळात या चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप येत गेले.आणि सत्यशोधक समाजाची तात्विक वाढच खुंटली. सत्यशोधक समाजाचे मूळ स्वरूप लोपले. त्यातून जातीपातीच्या शिक्षण संस्था, वस्तीगृहे निघाली. शिक्षणात प्रसार झाला हे खरे पण मूळ भूमिका काहीशी बाजूला पडली. १९१८ साली केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक परिषद भरली.त्यातूनच पुढे कर्मवीर भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आज या शिक्षण संस्थेचे प्रचंड वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते. पण सत्यशोधक समाजाच्या चळवळीला महात्मा फुले जी क्षुद्रा तीक्षुद्रांची चळवळ म्हणत होते ती मूल्ये रुजली नाहीत. परिणामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिक्षुद्रांची वेगळी चळवळ पुढे उभी केली. महात्मा फुले यांना डॉ. आंबेडकर गुरु मानत होते.कारण ज्योतीरावांनीच अस्पृश्य उद्धारक चळवळीला जन्म दिला. पण त्यांच्यानंतर त्यांचे विचार व सत्यशोधक समाजाची चळवळ यात अंतर पडत गेले.व्यापक विचार मांडणारे कार्यकर्ते ,उत्कृष्ट साहित्य ,समर्थ असे दीर्घकालीन नेतृत्व न लाभल्याने सत्यशोधक समाजाची विचारधारा विस्तारू शकली नाही त्यात बहुजन समाज स्वतः परंपरी स्वभावाचा राहिल्याने प्रबोधन व परिवर्तन रुढीप्रियते पुढे पराभूत झाले. हा इतिहास असला तरी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागील मुळ व्यापक भूमिका आजही महत्त्वाचीच आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज प्रबोधनाची विविध कामे केली. त्यापैकी सत्यशोधक समाजाची स्थापना हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. अखेरच्या काळात ‘सार्वजनिक सत्यधर्म ‘हे पुस्तक अर्धांगवायूने आजारी असतानाही त्यांनी डाव्या हाताने लिहून पूर्ण केले होते.त्यांनी दाखवलेला ज्ञानमार्ग, विद्यामार्ग अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.आजच्या असत्यतेच्या बोलबाल्यात आणि दैववादाच्या विकृत फेऱ्यात अडकविणाऱ्या अस्वस्थ वर्तमानात त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी सुद्धा ‘ईश्वर सत्य है ‘ म्हणत अखेरीस ‘सत्य ही ईश्वर ‘है असेच म्हणाले होते हे ध्यानात घेण्याची गरज आहे.


महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले  ११ एप्रिल १८२७ रोजी जन्मले तर डॉ.आंबेडकर १४ एप्रिल १८८९ रोजी. त्यांच्यात तब्बल ६२ वर्षांचे अंतर होते. फुले कालवश झाले तेव्हा बाबासाहेब तीन वर्षाचे होते. या दोन्ही महामानवांच्या विचारांची झेप फार मोठी होती. समाज परिवर्तन का आणि कशासाठी करायचे याबाबतच्या त्यांच्या भूमिका पक्क्या होत्या. आज समाजामध्ये जात जाणिवा पातळ होण्याऐवजी बळकट होताना दिसत आहेत. जाती व धर्माच्या प्रश्नांना जगण्याच्या प्रश्नांपेक्षा महत्वाचे ठरवत त्यावर आधारित राजकारण केले जात आहे.हे आमच्या पुरोगामीपणाचे खचितच लक्षण नाही.इंग्रजी सत्ता, दारिद्र्य, रोगराई ,दुष्काळ ,सावकारी फास, गुलामगिरी, शेतकऱ्यांची होरपळ आदी कारणांनी पिचत चाललेल्या समाजाला महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न केला. शिक्षणापासून ते लेखनापर्यंतच्या आणि स्त्री मुक्तीपासून ते सत्यशोधक समाजापर्यंतच्या अनेक क्षेत्रात फुल्यांनी उत्तुंग कामगिरी केली.आज राजकारणापासून कलेपर्यंतची सर्व क्षेत्रे आज जात्यंध व धर्मांध विचारांनी प्रदूषित केली जात आहेत.अशावेळी या विषयाचे महत्व नक्कीच मोठे आहे .


महात्मा फुलांच्या निधनानंतर ‘यांचे सार्वजनिक सत्यधर्म ‘ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात त्यांची प्रचंड अशी वैचारिक झेप आणि मूलगामी तत्वधारा दिसते. ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांनी या पुस्तकाला ‘ भावी स्वातंत्र्याचा जाहीरनामा ‘ आणि ‘ विश्व कुटुंबवादाची गाथा ‘ अशी सार्थ विशेषणे लावलेली आहेत. सर्व प्रकारची विषमता ही मानव निर्मित आहे म्हणून ती आपणच नष्ट केली पाहिजे. व समता प्रस्थापीत करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.ही त्यांची तळमळ फार महत्त्वाची होती. जातिव्यवस्थेचा दाहकपणा समाजाचे स्वास्थ्य घालवत असल्यानेच जातीअंताची भूमिका महात्मा फुले अग्रक्रमाने मांडत राहिले .हीच भूमिका त्यांचे शिष्य व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी अधिक अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार पद्धतीने मांडलेली आहे.

डॉ.आंबेडकर हे प्रखर बुद्धिवादी विचारवंत होते. अर्थशास्त्रा पासून समाजशास्त्रापर्यंत आणि धर्मशास्त्रापासून राज्यशास्त्रा पर्यंत विविध ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांच्या विचारांना भारतीय समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी स्वतःचे आयुष्य त्यांनी खर्ची घातले.या महामानवाने देशातील कोट्यवधी जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या समाजात त्यांनी वैचारिक जागृती घडवून आणली. सामाजिक समतेचे आंदोलन प्राणपणाने लढणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे राजकीय व शैक्षणिक कार्य अतिशय व्यापक स्वरूपाचे आहे .स्वतंत्र भारताला आदर्श राज्यघटना देण्यामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे, अग्रक्रमाचे आहे. आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना समाजाची वाटचाल जातीअंताऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसत आहे.आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी काही पक्ष, संघटना जात जाणीवा बळकट करण्याची नियोजनबद्ध कारस्थाने रचत आहेत.त्यासाठी समाजाला वेठीला धरले जात आहे.हे सारे सामाजिक दृष्ट्या अतिशय हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचे जातीसंस्थेचे विश्लेषण आणि जातिसंस्था नष्ट करण्याचे मार्ग आपण समजून घेतले पाहिजेत.आणि समजून दिलेही पाहीजेत.


१९१६ साली डॉ. आंबेडकरांनी “भारतातील जातीसंस,तिची यंत्रणा ,उत्पत्ती आणि विकास ” हा लेख लिहिला होता. त्याद्वारे त्यांनी जातीसंस्थेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. जातीसंस्था ही मानवनिर्मित असून ती कृत्रिम आहे.जातीबद्ध विवाहसंस्था हा तिचा मुख्य आधार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. ‘अनुकरणाचा संसर्ग दोष’ हा सिद्धांत डॉ.आंबेडकरांनी मांडला आहे .त्यांच्या मते ,जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज होते. त्या वर्गाचा आधार आर्थिक ,बौद्धिक किंवा सामाजिक होता. समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाची घटक असते. ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता.भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्ग मुक्त राहिल्याने ते समाज परिवर्तनीय राहिले. परंतु भारतातील वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे भारतात जाती निर्माण झाल्या. जात म्हणजे बंदिस्त वर्ग होय..भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया तत्कालीन उच्चवर्णीयांनी सुरू केली.त्याचे अनुकरण इतर खालच्या वर्णानाही केले. डॉ.आंबेडकर म्हणतात ,जातीसंस्था ही मनूने निर्माण केलेली नसून ती त्याच्यापूर्वी फार वर्षे अस्तीत्वात होती. मनू हा केवळ जातिव्यवस्थेला तात्विक रूप देणारा तिचा प्रचारक होता.जातीव्यवस्था ही उपदेशातून निर्माण झालेली नाही. आणि उपदेशातून ती नष्टही होणार नाही. हे स्पष्टपणे सांगून आंबेडकरांनी जातीसंस्थेच्या उत्पत्तीत केंद्रबिंदू असलेल्या व्यवसाय ,वर्गीय संस्था, नव्या श्रद्धा, देशांतर आदी मुद्यांकडेही लक्ष वेधले आहे.


डॉ.आंबेडकरांनी ‘जातीचा उच्छेद ‘ हा लेख लिहून जातीसंस्थेचे आणखी विश्लेषण केले .भारतीय हिंदू समाजातील जाती संस्थेचे परखड विश्लेषण त्यांनी केले. त्यांच्या मते, कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते हे खरे आहे. परंतु ती श्रमविभागणी श्रमिकांच्या जन्म भेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी समाज व्यवस्था नसते. जातीसंस्था ही श्रमविभागणी नसून श्रमिकांचीसुद्धा विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे.त्यामुळे हिंदू जनसमुदाय ‘ समाज ‘ या संस्थेलाच प्राप्त होऊ शकला नाही.हिंदू समाज म्हणजे विविध जातींचा एक पुंजका होय.हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्ती विकासाला आणि उत्पादन पद्धतीला मारक आहे. डॉ. आंबेडकरांचे हे विश्लेषण ध्यानात घेतले की,आज विविध मार्गानी होणारी जातीय संमेलने व जातजाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक ऐक्याला तडा देणारे आहेत हे स्पष्ट होते.


जातीसंस्थेने बद्ध झालेल्या हिंदू समाजात एका नव्या प्रबोधन चळवळीची त्यांना गरज वाटत होती.या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती. जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ.आंबेडकर पाहताना दिसतात.जातिसंस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.त्यातूनच त्यांनी धर्माची समीक्षा केलेली दिसते. त्यांनी म्हटले आहे,’ धर्म हा केवळ कायदा किंवा आज्ञा नसाव्यात.ज्या क्षणी धर्माचे रूपांतर तत्वाऐवजी कायद्यात होते, त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो.आणि असा भ्रष्ट खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’ यातूनच त्यांना हिन्दू धर्मात मूलभूत सुधारणेची गरज वाटत होती.


१९३५ साली डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजे धर्मांतर ही त्यांची भूमिका होती. डॉ.आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेचीही सखोल समीक्षा ‘ शूद्र

पूर्वी कोण होते ? ‘या ग्रंथात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले.त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्मांचा व राजकीय विचारांचा अभ्यास केला होता.साम्यवाद आणि बौद्धधर्म या दोन महत्त्वाच्या तत्त्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते. बुद्ध की कार्ल मार्क्स या लेखात आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी त्याची चर्चाही केलेली आहे.


डॉ.आंबेडकर यांनी धर्म आणि धम्म या दोन संकल्पनांची सखोल चर्चा केली आहे.त्यातील भेद स्पष्ट केला आहे .त्यांच्या मते धर्म हा वैयक्तिक असून धर्म हा मूलतः सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण व जीवनातील सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे होय. धर्म या कल्पनेत वस्तूजाताच्या आरंभाच्या साक्षात्काराला महत्त्व दिले जाते.तर धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहे .धर्मात देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड यांना स्थान असून नितिला स्थान आहे. याउलट नीती हे धम्माचे सार आहे.डॉ. आंबेडकरांनी पारंपारिक बौद्ध धर्माची नव्याने मांडणी केली. अहिंसेबाबत भाष्य करताना डॉ. आंबेडकर म्हणतात,’ बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला असल्यामुळे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही.तत्वामध्ये तुम्हाला त्यानुसार वर्णन वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, तसे नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.’

आज समाजात जातीअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षत्यापेक्षा धर्मांधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायीभाव , लोकशाही पेक्षा ठोकशाहीचे,हुकूमशाहीचे समर्थन,मिश्रअर्थ व्यवस्थे पेक्षा देशविके खाजगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असतांना महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समजून घेण्याची गरज आहे. सत्यशोधक समाजाचे दीडशेवे वर्षे साजरे करत असताना महात्मा फुलांच्या स्मृतिदिनी याचे महत्व मोठे आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post