प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
अग्निशमन सेवांच्या दरामध्ये केलेली ५०% वाढ मागे घेण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना सादर केले.
सदर निवेदनात म्हटले आहे की,इचलकरंजी महानगरपालिकेने नुकतीच अग्निशमन सेवांच्या दरामध्ये ५०% वाढ केली आहे. या ५०% दर वाढीवर जीएसटी लागणार असल्याने ही दरवाढ जास्तच होत आहे. या दरवाढीचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. इचलकरंजी शहर व परिसर हे औद्योगिक शहर आहे. त्यामुळे येथे छोट्या - मोठ्या आगीच्या घटना घडत असतात. या आगीमध्ये उद्योजकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची गरज असते. पण महापालिकेने या सेवेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली असल्याने याचा बोजा उद्योजकांवर पडणार आहे. आगीमध्ये उद्योजकांचे न भरून निघणारे नुकसान होत असते. त्यातच ही दरवाढ झाल्याने उद्योजकांवर याचा अतिरिक्त भार पडणार आहे. याचा विचार करून ५०% केलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.तसेच उद्योजकांचे होणारे नुकसान हे न भरून निघणारे असल्याने महानगरपालिकेने उद्योजकाला हातभार म्हणून विना मोबदला सेवा देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या शिष्टमंडळात दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालक सतीश कोष्टी, सोमाण्णा वाळकुंजे व पांडूरंग सोलगे यांचा समावेश होता.