प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी - ४१६ ११५
जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० )
शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ रोजी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९१ वा जन्मदिन आहे. तसेच 'गझलसाद 'या संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने या दिवशी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन मध्ये सोळा गझलकारांचा मुशायरा ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.सुरेश भट यांच्या ८६ व्या जन्मदिनी म्हणजे १५ एप्रिल २०१८ रोजी ' गझलसाद 'हा समूह स्थापन केला. कोल्हापूर, सांगली ,सातारा ,बेळगाव आदी भागातील प्रतिथयश आणि नवोदित गझलकार व रसिक यांचा हा एक समूह आहे.गझलेवर प्रेम करणाऱ्या, लिहू इच्छिणाऱ्या, गझल समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचा एकत्रित एक समूह असावा या भावनेतून या समूहाची निर्मिती झाली.
गझल हा कवितेतलाच एक प्रकार आहे. तो अतिशय लोकप्रिय काव्य प्रकार आहे. गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने सलग दहा अखिल भारतीय मराठी गझल संमेलन घेतलेली आहेत हे आपण जाणतोच.एखाद्या काव्यप्रकारावर आधारित अखिल भारतीय संमेलने होणे, त्या काव्यप्रकाराचे विविध समूह असणे, त्या काव्य प्रकारावर आधारित स्वतंत्र कार्यक्रम होणे, त्या काव्यप्रकारात लिहीणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत राहणे, त्या काव्य प्रकाराच्या रसिकांमध्ये सातत्याने वाढ होत राहणे अशी अनेक वैशिष्ट्ये मराठी गझले मध्ये आपल्याला दिसून येतात. 'गझलसाद'समूह हा गझलेसाठी सर्व काही करणारा एक सक्रिय समूह आहे.या समूहामध्ये प्रसाद कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे, हेमंत डांगे ,युवराज यादव, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. सुनंदा शेळके, डॉ.संजीवनी तोफखाने हे ज्येष्ठ गझलकार कार्यकारी सदस्य आहेत.तर गझलकार व संगीतकार प्रा. नरहर कुलकर्णी हे गझलसादचे निमंत्रक आहेत.
कालवश सुरेश भट यांना अपेक्षित असलेली परिपूर्ण आणि दोषरहित गझल लिहिण्याचा प्रयत्न करणे व त्याचा प्रसार करणे , गझलेला अनेक अंगांनी साद घालून गझलकार आणि रसिक यांच्यात दुवा निर्माण करणे, प्रतिथयश गझलकारांना एकत्र आणणे आणि नवोदितांना मार्गदर्शन करणे व त्यांना मंच उपलब्ध करून देणे, नवोदित गझलकार आणि रसिक यांच्यात गुणात्मक व संख्यात्मक वाढ करणे,गझल लेखनाच्या व गायनाच्या कार्यशाळा आयोजित करणे, गझलांचे मुशायरे आयोजित करणे, गझल संग्रह प्रकाशित करणे हा उद्देश ठेवून गझलसाद ची स्थापना झाली.
आज पाचव्या वर्धापनदिनी गेल्या पाच वर्षाची वाटचाल पाहता या उद्देशाला जागून गझल साधने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. गझलसादच्या वतीने गेल्या पाच वर्षात अनेक मुशायरे व कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. विविध संस्थांच्या सहकार्याने कोल्हापूर ,इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली ,बेळगाव, नागठाणे ,रुकडी, शिराळा,कुरुंदवाड आदि विविध ठिकाणी सातत्याने उपक्रम घेतले गेले. गझलसाद समूहातील काही मंडळी ' गझलसाद'याच नावाने स्वतंत्र कार्यक्रमही करत असतात. प्रसाद कुलकर्णी व डॉ.सुनंदा शेळके यांनी असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. प्रतिज्ञा नाट्यरंग या प्रशांत जोशी यांच्या संस्थेच्या सहकार्यानेही गझलसादने अनेक फेसबुक लाईव्ह कार्यक्रम केले आहेत. सुभाष नागेशकर यांचेही गझलसादला मोठे सहकार्य सातत्याने मिळत असते.
गतवर्षी गझलसाद च्या चौथ्या वर्धापनदिनी 'आमची गझलसाद' या नावाचा गझल संग्रह प्रकाशित करण्यात आला. हा संग्रह मराठी गझल विधेतील एक अनोखा व अभिनंदनीय प्रयोग आहे. डॉ.दयानंद न्यूटन काळे ,डॉ. दिलीप कुलकर्णी ,प्रा. नरहर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी ,श्रीराम पचिंद्रे ,मनीषा रायजादे-पाटील, सारिका पाटील ,प्रवीण पुजारी, डॉ.सुनंदा शेळके ,अरुण सुनगार, डॉ.संजीवनी तोफखाने आणि अशोक वाडकर या गझलकरांचा यात समावेश आहे. निखिल कुलकर्णी यांनी या संग्रहाच्या मुखपृष्ठासह एकूण मांडणी आणि गझलसादचा लोगो तयार करण्याची महत्त्वाची कामगिरी केली आहे.
'आमची गझलसाद. ' संग्रहाला मराठीतील नामवंत गझलकारा प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत म्हणतात, '..... गझलसाद समूहाचे बारा उत्तम गझलकार एकत्र येतात आणि आपला प्रतिनिधीक गझल संग्रह काढतात ही खरोखरच मराठी गझलेच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. यातील काही गझलकारांचे स्वतंत्र गझलसंग्रहही आहेत. हेही फार महत्त्वाचे आहे. काव्यसंग्रह असो की गझल संग्रह तो प्रातिनिधिक असेल, त्यात प्रत्येकी एक किंवा दोन रचना असतील तर तो कवी- कवयित्री वाचकांना कळू शकत नाही. म्हणजे त्या रचनेचा अर्थ लावून त्या कवीला सामाजिक, धार्मिक, निसर्ग कवी ,प्रेम कवी अशी बिरूदे लावून लोक मोकळे होतात पण गझलसादने जो प्रयोग केलाय तो वेगळा आहे. यात बारा गझलकार आणि प्रत्येकाच्या अकरा गझला आहेत. म्हणजे किमान त्या गझलकाराची वाचकाला त्याच्या लेखनातून ओळख होऊ शकते. यातील प्रत्येक गझलकार आणि गझलकारा यांची आर्थिक,सामाजिक ,भावनिक परिस्थिती वेगळी असेल, वय वेगवेगळे असेल. त्यामुळे या सर्व गझलांमध्ये वैविध्य आहे आणि रसिकाला पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खिळवून ठेवणारा हाच महत्त्वाचा धागा आहे...... या सर्वांची गझल कमी अधिक प्रमाणात वर्तमानकालीन सामाजिक ,राजकीय वास्तवाचा वेध घेते आणि त्या वास्तवाची अभिव्यक्ती अस्सल मराठमोळ्या स्वरूपात सादर करते.आमची गझलसाद हा प्रतिनिधीक गझलसंग्रह मराठी गझलेच्या वाटेवरचा मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.'
गझलसादचे स्वतंत्र फेसबुकपेज आहे. तसेच व्हाट्सअप समूहही आहे. त्यामध्ये वरील सर्व गझकारांसह अनंत चौगुले, डॉ. स्नेहल कुलकर्णी, चैत्र ,वैभव चौगुले, अभिजीत चौगुले, डॉ. योगिनी कुलकर्णी ,सुधाकर इनामदार, प्रशांत जोशी, चंद्रकांत कदम, डॉ. कविता गगराणी, विश्वास कुलकर्णी, किशोर महाजन ,चांदसाहेब मकानदार ,विजय मुळ्ये,सुभाष नागेशकर, प्रताप पाटील, शंकर पाटील, सुजाता पेंडसे, पुंडलिक कांबळे,समीर देशपांडे, रवी सरदार ,सीमा पाटील, शेरखान तांबट, निशांत गोंधळी, श्रीकांत भानगावकर, अ. र. देसाई, एकनाथ गायकवाड, निखिल कुलकर्णी ,प्रशांत सैलियान, स्मित शिवदास, अरुण देसाई ,अमृता देसरडा, विकास पाटील, मोहन घाडगे, किरण पंडित आदी अनेक जण सहभागी आहेत.
गझलसाद चा पाचवा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्यांना गझले विषयीची माहिती नाही त्यांना गझलेचा किमान संक्षिप्त परिचय करून देणे हेही गरजेचे आहे. म्हणून त्याविषयी थोडेसे
'गझल 'या काव्यप्रकाराला पाचशे वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही गझलेकडेच पहावे लागते. ख्यातनाम कवी माधव ज्युलियन ऊर्फ माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा शंभर वर्षापूर्वी ' गज्जलांजली 'नावाचा काव्यसंग्रह आला.त्यातील कविता उत्तम आहेत यात शंका नाही .मात्र त्या परिपूर्ण गझला नाहीत हेही तितकेच खरे आहे. मराठी मध्ये ' गझलेची बाराखडी 'लिहून शास्त्रशुद्ध गझलेची ओळख सुरेश भटांनी अर्धशतकापूर्वी करून दिली.सर्वार्थाने 'मराठी गझल विद्यापीठाचे कुलपती' असलेल्या सुरेश भटांनी आपल्या लेखणीतून मराठी गझल अतिशय समृद्ध करून ठेवली आहे.
गझलेच्या प्रेरणे बाबत सुरेश भट एके ठिकाणी म्हटले आहे ,’ मनाच्या माळावर आयुष्यात पाहिलेले ,भेटलेले, भोगलेले किंवा सोसलेले अनेक अनुभव एकसारखे हिंडत असतात. त्यांचे हिंडणे माणूस संपेपर्यंत संपत नसते. कधी त्यांच्या पावलांचे आवाज ऐकू येतात तर कधी ते दिसत नाहीत. पण अवती भवती त्यांची कुजबूज चाललेली असते. कधी कधी चुकून एखादा चेहरा दिसतो ,कधीकधी स्पर्शही जाणवतो .एखाद्या वेळी एखादा अनुभव आपल्या सोबतीला इतर अनुभवांचे बारकावे घेऊन येतो आणि मग शेराला, गझलेला सुरुवात होते.’कविता आणि आयुष्य यांच्या परस्पर संबंधाबाबत ते म्हणाले होते , ‘माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता .माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा आहे. जीवन तसे अपूर्णच असते. संपूर्णते साठी जखमा अपरिहार्य असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत ते जीवनही समृद्ध नाही .कवितेचा संबंध आयुष्याची असतोच.
मराठी गझल विधेच्या समृद्धीकरणात बीज रोवण्यापासून तिची मशागत करण्यापर्यंत सुरेश भट यांचे योगदान अतुलनीय आहे.
" बाराखडीच नव्या पिढीला दिली भटांनी,
म्हणून दिसते गझल मराठी पानोपानी "
हे सार्वकालिक सत्य आहे.उत्कृष्ट रचना, तंत्रशुद्धता ,छंदोबद्धता ही गझलेची वैशिष्ट्ये ती कोणत्याही भाषेतील असली तरी फार महत्त्वाची असतात. डोळ्यांना तशी भाषा असते तसे गझलेला व्याकरण असते.बंधने असूनही बंधमुक्त आणि हळुवारपणा जपत कठोर प्रहार करण्याची क्षमता ही गझलेची खरी ओळख आहे . गझल ही जगण्याचा गंध पकडणारी तसेच काळजातुन शब्दसुत कातणारी विधा आहे.म्हणूनच ती तलम दिसते व असतेही.
" मी जगण्याचा गंध मनाशी पकडत होतो
त्याचा दरवळ गझले मधुनी वाटत होतो ,
गझला माझ्या तलम जगाला वाटत होत्या
काळजातले शब्दसूत मी कातत होतो..."
मराठी कवितेला आठ शतकांची परंपरा आहे. आख्यान काव्य ,कटाव ,पोवाडा , खंडकाव्य, स्वयंवर काव्य , महाकाव्य आदी कथालनपर काव्ये तर ओवी ,अभंग, गवळण, भारुडे , स्तोत्रे,विराणी ,पाळणे, लावणी, सुनीते ,गझल यासारखे भावकवितेचे प्रकार आहेत.अलिकडे गझल हा काव्यप्रकार सर्वात जास्त चर्चेत असतो हे दिसून येते. लोकप्रियता ,हृदय प्रियता,कर्णप्रियता आणि नयन प्रियता ही गझलेची वैशिष्ट्ये असतात.निव्वळ शब्दकृती म्हणजे गझल होत नसते. तर त्या शब्दकृतीचे विशिष्ट संकेतांना अनुसरून केलेले काव्यात्म रूप म्हणजे गझल असते.नेहमीच्या भाषेपेक्षा गझलेची भाषा वेगळी असते.
वेदना आणि संवेदना यातूनच गझल जन्म घेत असते. अपूर्णतेतच नवनिर्मितीची बिजे असतात आणि बीजाचे अंकुरणे कधीच सोपे नसते.कारण त्यासाठी त्याला आतून तडकावे लागते.गझल व तिचे शेर काळजात घुसतात याचे कारण तिची निर्मिती प्रक्रिया सहज साध्य नसते.ती प्रसववेदना सोसूनच जन्म घेत असते.गझल बाहेर येण्यापूर्वी काळजात लोणच्यासारखी मुरवत ठेवली तर ती अधिक आस्वाद देते आणि अस्सल गझलेची तीच ओळख आहे.
"गझलेचा प्रियकर होणे हे साधे सोपे नसते
एकेका शेरासाठी मी रक्त अटवले होते.."
गझलेकडे या गांभीर्याने पाहिले पाहिजे.वृत्त,काफिया ( यमक ),रदीफ ( अंत्ययमक )यामुळे गझलेचा
आकृतिबंध बनतो. त्यालाच ' जमीन 'असेही म्हटले जाते. अर्थात रदीफ नसलेली म्हणजे 'गैरमुरद्दफ ' गझलही असतेच. गझल लिहू वा समजून घेऊ इच्छिणाऱ्याने व्याकरणाचा बाऊ करु नये.पण त्याचा नेमका अभ्यास केलाच पाहिजे. वृत्त वापरताना यतीभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.गझलियत, शेर ,मतला, रदीफ, काफिया समजून घेतला पाहिजे. केवळ गझलेचे तंत्र पाळून लिहीलेल्या दोन ओळी एकत्र करून शेर निर्माण होत नसतो. शेर निर्माण होण्यासाठी त्याचा परस्पर संबंध, धक्कातंत्रापासून परिपूर्णते पर्यंतच्या सर्व बाबी सांभाळाव्या लागतात. योग्य शब्दांची निवड ,आशय आणि अभिव्यक्ती यांना गझलेत अतिशय महत्त्व असते.
" नऊ रसांच्या आस्वादाने माझी भूकच नाही भागत
मीच दहावा रस होतो अन गझलेमधुनी जातो मांडत.."
हे गझलेचे वेगळेपण आहे.सुख आणि दुःख या मानवी जीवनाच्या अटळ बाजू आहेत.संपूर्ण सुखी किंवा संपूर्ण दुःखी असा माणूस नसतो.गझलकार वेगवेगळ्या अनुभवातून ,दाखल्यातून ,परकाया प्रवेशातून मानवी मनाची आंदोलने टिपत असतो. गझलकाराचे शेर हे केवळ त्याच्या काळजात वास करत नसतात.तर श्वासातुन आणि रक्तातुन वाहत असतात.कवी इतिहास आठवत, भविष्य पहात वर्तमानात जगत असतो. त्यामुळे अनेकदा त्याचे लेखन समकालीनते बरोबरच कालातीतही असते. गझल असो किंवा कविता असो, शेवटी ती माणसाच्या म्हणजेच पर्यायाने समाजाच्याच भोवती फिरते .माणूस हा नाशवंत असल्यामुळे त्याच्यात अपूर्णतेची जाणीव आहे. त्याच जाणिवेमुळे सर्व कला समृद्ध होत जातात.तसेच दिलखुलास, मनमुराद आनंद देणे व घेणे हे मानवी जीवनाचे सार आहे. ज्यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचू शकला नाही ,त्यांच्यापर्यंत तो नेण्याचे काम करणे ,तसा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे. गझलेने तो केलेला आहे,दिलेला आहे.
अलीकडे समाज माध्यमांमुळे गझल अधिकाधिक समाजाभिमुख होत आहे. मात्र त्याच वेळी ती सुमारीकरणात अडकणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. कारण समाज माध्यमानी एक मायावी व आभासी विश्व निर्माण केले आहे. माणसाशी दुरावा ठेवून यंत्राशी, माध्यमांशी जवळीक ठेवल्याने गझल निर्माण होणार नाही.माध्यमे प्रेम निर्माण करू शकतील पण त्या प्रेमात रंग भरण्यासाठी जिवंत हृदयच लागत. तो जिवंतपणा गझलेत नक्कीच आहे. गझलसाद समूह अशा परिपूर्ण गझलेसाठी कार्यरत राहणार आहे यात शंका नाही
( लेखक कवी आहेत तसेच गेली अडतीस वर्षे गझल हा काव्यप्रकार लिहीत आहेत.गझलांकित ( २००४ ),गझलसाद ( २०१० ) हे गझलसंग्रह व गझलानंद (२०१४ ) हे काही उर्दू -हिंदी गझलकार व त्यांच्या गझलांची ओळख करून देणारे पुस्तक तसेच 'गझल प्रेमऋतूची 'हा गझलनंदा यांच्यासह संयुक्त गझलसंग्रह (२०२१ ) प्रकाशित आहेत.तसेच
https://youtube.com/c/PrasadMadhavKulkarni
या यूट्यूब चॅनेल वर 'एक रविवार : एक गझल ' या उपक्रमातील दीडशेवर गझला तसेच इतरही - कविता, चित्कलायन या दीर्घ कवितेचे बारा भाग, तसेच काही गझल विषयक काही भाषणे उपलब्ध आहेत )