प्रेस मीडिया लाईव्ह :
गेवराई : प्रतिनिधी
सोन्याच्या दागिन्यांची होलसेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पाथर्डी येथील सोने व्यावसायिकासह गेवराई येथील एकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मयत नितीन अर्जुनराव उदावंत (35, रा. वाघोली.जिल्हा पुणे) येथे राहत असून होलसेल सोन्याचा व्यापार करत होते.पाथर्डी शहरातील सोन्याचे दुकानदार ओम छगनराव टाक व प्रशांत छगनराव टाक यांना गेवराई येथील मध्यस्थ निलेश माळवे यांच्या मध्यस्थीने सुमारे दोन लाखांचे सोने उधार विकले होते. वर्षभरापासून टाक पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. याबाबत मयत उदावंत यांनी आपल्या नातेवाईकांना माहिती दिली होती.
25 मार्च रोजी उदावंत पाथर्डी येथे उधारी घेण्यासाठी आले होते. सायंकाळी करंजी घाटात बस मध्ये त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत उदावंत यांचा भाऊ किरण अर्जुनराव उदावंत यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली तसेच मयत नितीन उदावंत यांना विषारी पदार्थ प्राशन करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
किरण अर्जुनराव उदावंत यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात ओम टाक, प्रशांत टाक व मध्यस्थ निलेश माळवे या तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्यरंजन वाघ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.